Primary tabs

स्मृतीत राहणारी स्मिता...

share on:

आपल्या निखळ सौदर्याने आणि सक्षम अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आजही आठवणींच्या रूपाने राज्य करणाऱ्या स्मिता पाटील यांचा आज स्मृतिदिन.

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ पुण्यात झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी होते, तर त्यांची आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून कामाची सुरुवात केली होती. श्यायम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. १९७७ हे वर्ष स्मितासाठी कलाटणीचे ठरले. कारण पहिल्या सिनेमात चांगला अभिनय केल्यानंतर श्याम बेनेगल यांचेच ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ हे दोनही चित्रपट त्यांना मिळाले. या दोनही चित्रपटातील भूमिका चांगल्याच गाजल्या. ‘भूमिका’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९७८ साली ‘जैत रे जैत’ या मराठी चित्रपटासाठी आणि ‘चक्र’ या सिनेमातल्या अम्माच्या भूमिकेसाठी त्यांना १९८० साली ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाले. त्यांच्यावर चित्रित झालेली सर्व गाणी एक से बढकर एक होती.

आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी दलित, शोषित, पिढीत स्त्री, तसेच आत्मसन्मान जपणारी बंडखोर स्त्री अशा अनेक सक्षम भूमिका साकारून त्या अजरामर केल्या आहेत. त्यांनी साधारण ७५ चित्रपटांमध्ये कामे केले. हिंदी आणि मराठी दोन्हींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी मंथन, मिर्च मसाला, मंडी, नमक हलाल, शक्ती, उंबरठा, सामना, अर्धसत्य हे काही चित्रपट आहेत. स्मिता पाटील या चांगल्या अभिनेत्रीबरोबरच एक चांगल्या व्यक्तीदेखील होत्या. त्यांना सामाजिक भान होते. त्यांची आई समाजसेविका आणि वडील राजकारणी असल्याने त्या देखील सामाजिक बांधिलकी जपून होत्या. स्मिता पाटील यांनी १९८६ मध्ये चित्रपट अभिनेता राज बब्बर यांच्याशी विवाह केला. १३ डिसेंबर १९८६ रोजी म्हणजेच मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला. आणि चित्रपट सृष्टीने एका हरहुन्नरी अभिनेत्रीला कायमचे गमावले.

स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ इ.स.२०१२ पासून पुण्यात दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव होतो. तसेच स्मिता पाटील यांच्या नावाने एक ‘स्मृती पुरस्कार’ आणि ‘कौतुक पुरस्कार’ दरवर्षी दिला जातो.

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response