Primary tabs

वेगळी वाट धुंडाळणारी 'पीनट बटर'

share on:

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कायमच महिलांना चाकोरीबद्ध आयुष्य जगायला भाग पाडले आहे. रूढी परंपरांचे पालन करणारी स्त्री म्हणजे चांगली असा एक क्रायटेरिया आपल्याकडे तयार झाला. आणि सरसकट सगळ्याच स्त्रिया या चौकटीत अडकून राहू लागल्या. कालांतराने स्त्रियांनी शिक्षण घेतले, त्यांचा सर्वच क्षेत्रातील वावर वाढला. त्या स्वतंत्र विचारांच्या, स्वतंत्र बाणा असणाऱ्या रणरागिणी बनल्या. प्रत्येक आघाड्यांवर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले. एक स्वतंत्र महिला स्वावलंबी आयुष्य जगू लागली. पण एक स्वतंत्र महिला स्वतंत्रपणे स्वतःच आयुष्य जगत असताना काही निर्णय इतरांचा विचार करूनच घेत असते. तेव्हा मात्र तिचा तो बाणा गळून पडतो.

म्हणतात नं, “कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे तिचं ‘आई’ होणं. पण तिचं आई जर अविवाहित असेल तर? तिच्या मनाची काय अवस्था होत असेल?

म्हणजे ती स्वतंत्र विचारांची असेल, कमावती असेल, बिनधास्त विचारांची असेल, तरीही तिला प्रश्न पडतोच की, 'क्या कहेंगे लोग?'

पण समजा हीच अविवाहित असणारी, होऊ घातलेली आई, आपलं मुलं अबोर्ट करण्यासाठी डॉक्टरकडे निघाली आहे आणि अचानक तिचं न जन्मलेल मुलंच तिच्यासमोर आलं तर? अशीच एक वेगळी कथा घेऊन आपल्या समोर येते ही 'पीनट बटर' नावाची शॉर्टफिल्म.

प्रिया माथूर नावाची एक 28 वर्षांची तरुणी. बँकर आहे. दिसायला देखणी आणि यशस्वी देखील आहे. तिच्याच ऑफिसमधल्या गौतमसोबत ती डेटला जाते. भावनेच्या भरात ती गौतमच्या फारच जवळ जाते. त्याचाच परिणाम म्हणजे ती प्रेग्नेंट होते. आता काय? हा यक्ष प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. अर्थात तिला या क्षणाला हे मूल नको असतं. एक तर सिंगल मदर होणं म्हणजे अनेक प्रश्नांना आमंत्रण, त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोक काय म्हणतील? हा प्रश्नही तिला सतावत आहे. ती डॉक्टरांना भेटायला निघाली असताना इतक्यात तिच्या दाराची बेल वाजते. ती दार उघडते तर एक 18 वर्षांचा मुलगा तिला दारात उभा दिसतो. त्याला पीनट बटर हवं असतं.

आता हा मुलगा कोण आहे? तो पियाकडे का आला आहे?, त्याला पियाबद्दल सगळंच कसं काय माहिती? या सगळ्या प्रशांची उत्तरे आपल्याला ही शॉर्टफिल्म पहिली की मिळतीलच.

या फिल्ममध्ये एक प्रसंग आहे, जेव्हा प्रिया त्याला सांगते, “की आपल्याकडे महिला असणं एक अडचण आहे, त्यात दुसरी अडचण म्हणजे ती सुंदर आहे, तिसरी अडचण म्हणजे ती यशस्वी देखील आहे आणि ती सिंगल मदर आहे.”

यावर तो रोहन तिला सांगतो की, "जर तू तुझ्या निर्णयावर ठाम असशील, तर कोणाचीही औकात नाही की, कोणी माझ्याकडे बोट करेल".

आपले निर्णय आपणच घ्यायचे आणि अत्यंत खंबीरपणे ते निर्णय निभावायचेही असतात. पळवाटा शोधणारे खूप असतात, पण आपल्या निर्णयांच्या परिणामांना समोरे जाणारे अगदी बोटावर मोजता येतील एवढेच असतात. कारण त्यासाठी फार ताकद लागते. हाच संदेश ही 19 मिनिटांची फिल्म आपल्याला देते.

प्रिया झालेल्या गौहर खानने काबिले तारीफ म्हणावा असा अभिनय यात केला आहे. रोहन झालेल्या धीरजने ही तितकीच उत्तम साथ तिला दिली आहे. मनु चोबेची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही अफलातून.

वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम नसणाऱ्यांनी ही शॉर्टफिल्म नक्की पाहावी. कदाचित तुमचा निर्णय बदलो वा न बदलो पण त्याकडे पाहायचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.

('पीनट बटर' https://youtu.be/nWFFbu2az_U)

- अश्विनी धायगुडे - कोळेकर

dhaygudeashvini@gmail.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response