Primary tabs

माझ्या पॅलेटवर रंग – भाग २

share on:

लहानपणापासून वासुदेव कामत यांना चित्रकलेची आवडघराच्या भिंती हाच त्यांचा पहिला चित्रप्रयोगाचा कॅनव्हास. त्यांच्या कुंचल्याला जे.जे. मध्ये रीतसर कलाशिक्षणातून अधिक पैलू पडले. सॉफ्ट पेस्टल्सऑईल पेस्टल्स आणि अॅक्रॅलिक्समध्येही त्यांनी भरपूर काम केलं. पणपोर्ट्रेट्समध्ये त्यांचा हातखंडा. पौराणिक कथानकांवर आधारित त्यांच्या सगळ्याच कलाकृती या वास्तववादी शैलीतल्या. पाहता क्षणीच मनाला भुरळ घालणाऱ्या... तेव्हाचित्रकलेच्या आवडीपासून ते आज एक ख्यातनाम चित्रकार म्हणून वासुदेव कामत यांच्या जीवनाचा त्यांच्याच शब्दांत रेखाटलेला हा कलाप्रवास...

एकदा सरांच्या प्रात्यक्षिकात चेहऱ्यावरील नाकावर हायलाईट द्यायचा होता आणि त्यांच्या हातात जाड १२ नंबरचा ब्रश होता. त्यातील पांढऱ्या रंगाचा ओघळ खाली आला होता,त्याचाच स्पर्श कॅनव्हासवर इतक्या झटकन आणि अलगद केला की, त्या हायलाईटची अचूक जागा सरांनी चेहऱ्यावर मिळवली होती. ते पाहताच आम्हा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे‘वाह!’ अशी दाद दिली. ही संपूर्ण एकरूपता आणि एकाग्रता त्या प्रात्यक्षिकांत आम्ही अनुभवली. जे.जे.त शिकत असताना ज्याला ‘क्रिएटिव्ह पेंटिंग’ म्हणतात, त्यात मात्र मी जरा बॅकफूटवर होतो. मला बरोबरीच्या विद्यार्थ्यांचे अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आवडायचे, परंतु मी जे करीत असे, ते मात्र कधी इलस्ट्रेटिव्ह किंवा निसर्गचित्राच्या धर्तीचे होत असे. एकदा मी मृगांक जोशी सरांनाही विचारले की, ‘‘माझे नेमके काय चुकते ते सांगा.” त्यावर सर म्हणाले की, “पहिले तुम्ही मनातला हा विचार काढा की, चुकते आहे. जे काही तुम्ही करत आहात ते तुमच्या रक्तात आहे. त्यालाच वाट मोकळी करून द्या.” आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कॉलेजच्या लायब्ररीत काही पुस्तके चाळत असताना साल्वेदोर दालीची चित्रे पाहिली आणि वाटले की, मी काहीसा या अंगाने माझी क्रिएटिव्ह पेंटिंग करू शकतो. अगदीच अमूर्त किंवा केवलाकारी रचना करण्यापेक्षा थोडी स्वप्नाळू किंवा अतिवास्तववादी शैलीतून मी माझे विचार साकार करू शकेन, याचा आत्मविश्वास वाटू लागला आणि त्याच शैलीने मी रंगविलेल्या ‘ड्रीम’ या चित्राला वार्षिक प्रदर्शनातले ‘सुवर्णपदक’ प्राप्त झाले.

शेवटच्या डिप्लोमाची परीक्षा देण्याअगोदर जे.जे.च्या लॉनवर आम्ही सर्व विद्यार्थी निरोप समारंभासाठी बसलो होतो. आमच्याबरोबर प्रा. मृगांक जोशी सर बसले होते. अनेकजण आपापले विचार मांडत होते. कुणी कवितावाचन करीत होते. अशावेळी मी सरांना एक प्रश्न विचारला, ‘‘सर, हा हा म्हणता ही पाच वर्षे या वास्तूत आम्ही अत्यंत आनंदाने काढली. आता यापुढे काय? घरच्यांची आमच्याकडे दृष्टी लागून राहिली आहे. आता पुढे आम्ही उपजीविका म्हणून काय करू शकतो?,” यावर सर म्हणाले, “तुम्ही आता पूर्ण चित्रकार झालात. तुम्ही पेंटिंग करत राहा. आनंदी राहा. उपजीविकेसाठी तुम्ही काहीही करू शकता. उदा. एक ट्रक ड्रायव्हर आहे. तो उपजीविकेसाठी ट्रक चालवतो. पण तो शायर आहे. कविता करतो, शायरी लिहितो. तेव्हा त्याला सर्वजण उत्तम कवी म्हणून ओळखतात.” मला मात्र हे उत्तर समाधान देत नव्हते. मनात आले की, शायरी करायला कोऱ्या पानाची एक वही आणि पेन मिळाले की झाले. पण एक पेंटिंग करायला रंग, कॅनव्हास आणि ब्रश हे डायरीच्या किमतीत मिळत नाहीत. असो. मी काही पुढे वाद घातला नाही. पण एक मोठ्ठा यक्षप्रश्न माझ्यापुढे भेसूर होऊन येत होता, हे मात्र मला जाणवू लागले होते.

१९७७ ला जी. डी. आर्ट उत्तीर्ण झाल्यावर काही महिने जे. जे.मध्ये फेलोशिप केली. परंतु, १५० रु. महिना फेलोशिपवर दिवस ढकलणे कठीण होते. ज्या वर्गावर मी फेलोशिप करीत होतो, त्या वर्गाचे लवाटे सर माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, “वासुदेव, कुठेतरी नोकरीचे पाहा. इथे वेळ दवडण्यासारखी तुझी घरची स्थिती नाही.”मी इथून तिथे माझ्या कामाचा पोर्टफोलियो, परीक्षेची सर्टिफिकेट्स आणि दोन गोल्ड मेडल घेऊन नोकरीसाठी वणवण फिरलो. जो तो दुसरीकडचा पत्ता आणि शिफारसपत्र देई. काही कळेना. मानसिक स्थिती कमकुवत होऊ लागली होती. “फाईन आर्ट करून भीक मागणार का?” असे कुत्सितपणे बोललेले शाळा मास्तर आठवू लागले होते. माझा इतका चांगला रिझल्ट लागून ही स्थिती, तर बाकी विद्यार्थीमित्र काय करत असतील?, या विचारानेच आणखी विषण्ण होऊ लागे आणि शेवटी आमच्या एका नातेवाईक मित्रांच्या ओळखीने‘फॉर यू’ या पाक्षिकात ‘इलस्ट्रेटर कम कमर्शियल आर्टिस्ट’ म्हणून नोकरी लागली. ज्या कमर्शियल आर्टिस्टचा गेली पाच वर्षे मी दुःस्वास केला, त्याच विषयाची नोकरी करावी लागणार होती. त्या ‘फॉर यू’ मध्ये आर्ट डायरेक्टर व्ही. एस. वागळे यांनी चांगले प्रेम आणि मैत्री दिली. पाक्षिकाचे संपादक विक्रम व्होरा हे देखील दिलखुलास होते. इथल्या नोकरीत मी सारे काही शिकून घेतले. कधीकधी माझ्यातल्या फाईन आर्टिस्ट जागा होई. हे मी काय करतोय, असे वाटून मी ती नोकरी सोडली. आन्नांच्या ओळखीत दोन-तीन पोर्ट्रेटची कामे मिळायची. पोर्ट्रेट किंवा इलस्ट्रेशन, जे काही येईल ते काम मी घेऊ लागलो. या दिवसांत मला एक गोष्ट पक्की समजली, ती म्हणजे आपल्याकडे आलेले काम पूर्ण समाधानाने करून द्यायचे. पुढची प्रसिद्धी आपले कामच करून देत असते.

शेवटी जे.जे.मध्येच कलेचा इतिहास मराठीतून शिकविण्यासाठी असिस्टंट लेक्चररची हंगामी नोकरी चालून आली. साधारणपणे दोन अधिवेशने मी काम केले. पुढे मित्र व्ही. एस. वागळे यांच्या कृपेने हॉकिन्स प्रेशर कुकर कंपनीत त्यांच्या होम मॅगझिनसाठी ‘इलस्ट्रेटर कम व्हिज्युलायझर’ची चांगली नोकरी लागली. १९८० ते १९८४ पर्यंत या नोकरीत रेखांकन ते पेंटिंग, इलस्ट्रेशन, फोटोग्राफी प्रिटिंग आणि एकंदरीत व्यावसायिक कलेचे पूर्णांश मी शिकून घेतले. फाईन आर्ट आणि कमर्शियल आर्ट यांच्यामधील दगडी भिंत गळून पडली आणि या दोन्ही विभागांतले काम एकमेकांस कसे पूरक ठरू शकते, यांची शिकवण मिळाली. १९७९ मध्येच लग्न झाल्याने सांसारिक जबाबदारी वाढली होती. सुप्रसिद्ध एस. एस. शेख यांच्यासाठी ‘पीस वर्क’ करू लागलो होते. शिवाय बॉम्बे आर्ट सोसायटी, स्टेट आर्ट, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक प्रदर्शनात स्पर्धेतील पोर्ट्रेटला चांगली पारितोषिके मिळाली होती. घरी करत असलेला चित्रकामांना पत्नी भारतीची चांगली साथ मिळत होती. तिलादेखील फोटोग्राफी, डार्करूमचे काम शिकविले होते. विशेष म्हणजे, माझ्या सर्व कामाचा गोशवारा ती सांभाळू लागली होती. ते तिचे व्रत अजूनही अखंड चालू आहे. शिवाय तिची आणि माझी कन्या अमृताची मी अनेक पोर्ट्रेट केली. त्यांना चांगली बक्षिसे मिळाली आहेत.

इतके झाल्यावरही पूर्णवेळ स्वतंत्र चित्रकार म्हणून जगण्याची इच्छा वारंवार उचंबळून येई आणि ती वेळ आली. हॉकिन्समधील ‘फोर सीझन्स’ हे मासिक बंद पडले आणि पूर्ण आर्ट डिपार्टमेंट त्यांनी जाहिरातीसाठी वापरण्याचे ठरवले. इथे मात्र मी नाखूश झालो आणि नोकरी सोडण्याचा निर्धार केला. तरीदेखील तीन तीन मातब्बर ज्योतिषांचा सल्ला घेतला. प्रत्येकाने ही वेळ योग्य नाही, असे सांगितले. पण, या ज्योतिषांमुळे मन आणखी डळमळू लागले. फार पूर्वी कधीतरी आन्नांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली, जगत्गुुरू आदि शंकराचार्य एकदा म्हणाले होते की, “प्रत्येक प्राणी आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो, परंतु मनुष्य हा एकमेव जीव असा आहे की, तो आपले प्रारब्ध बदलू शकतो.” या विधानाने मला इतके बळ आले की, मी सरळ नोकरीचा राजीनामा दिला. १९८४ साली राजीनामा दिल्याबरोबर जहांगीर आर्ट गॅलरीत मी स्वतःच्या पेंटिंगचे पहिले एकल प्रदर्शन भरवले.कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून ८४ पर्यंत केलेल्या अनेक पोर्ट्रेटसपैकी निवडक चित्रे आणि रेखाचित्रांचे प्रदर्शन होते. यात सर्व चित्रे मित्र आणि परिवारातल्या व्यक्तींची पोर्ट्रेटस असल्याने त्यातील एकही विकले जाणार नाही, याची खात्री होती. परंतु, आपल्या कामाची ताकद रसिक प्रेक्षकांना निश्चित कळेल, हा आत्मविश्वास होता. त्यामुळे यापूर्वी आपण आपला पोर्टफोलिओ १० ठिकाणी घेऊन फिरण्यापेक्षा या प्रदर्शनी रोज दीडदोनशे रसिक आपले काम पाहतील, तर काम निश्चित मिळेल, असा माझा तर्क होता आणि खरोखरीच या पहिल्या प्रदर्शनातूनच मला अनेक कामे मिळाली आणि त्याची लिंक नंतर अनेक वर्ष लागून राहात असे. माझ्या या प्रदर्शनाला प्रसिद्ध कलामहर्षी एस. एम. पंडित आणि चित्रकार रवि परांजपे सर आवर्जून आले होते. त्यानंतर १९८६ साली परत प्रदर्शन भरवले. त्यात काही पोर्ट्रेटस आणि निसर्गचित्रे होती. त्यावेळी आमच्या एका मित्राने सुचवले की,असं मिक्स प्रदर्शन नको करूस. एकतर पोर्ट्रेट्स लावा किंवा निसर्गचित्र. त्यावर मी त्याला उत्तर दिले की, “मला जे जे जमते, ते मी सर्व प्रदर्शनातून मांडणार.” तेव्हा तो मित्र म्हणाला, “जशी तुझी मर्जी, परंतु प्रदर्शन हे तुला काम जमते, ते दाखविण्यासाठी नाही, तर तू काय दाखवू इच्छितोस, काय सांगू इच्छितोस, त्यासाठी आहे. बघ विचार कर.” हा फार मौलिक सल्ला मला त्याने दिला आणि माझी प्रदर्शनामागची व्यावसायिक हेतूची भूमिका हळूहळू गळून पडली.

निसर्गचित्रण हा देखील पोर्ट्रेटसारखाच माझा आवडता विषय. जे. जे.च्या शेवटच्या वर्षात शिकत असताना वर्गात जायच्या अगोदर मुंबईतल्या वेगवेगळ्या जागी बसून रोज एक तर चित्र रंगवून जात असे. याकरिता मी स्वतः आणि माझे मित्र विनय सप्रे अशी आमची जोडी होती. खरेतर निसर्गचित्राचा रीतसर अभ्यासक्रम कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये शिकविला जात नाही. तेव्हा विनय सप्रे हाच माझा गुरू. त्याने मला स्पॉटवर लॅण्डस्केप कसा रंगवायचा, याचे धडे दिले. कॉलेज संपल्यावर १९७७ ते १९८४ पर्यंत मात्र कधी निसर्गचित्रण प्रत्यक्ष जागी बसून रंगविण्याचा सराव झाला नव्हता. १९८८ साली मी आणि माझी पत्नी स्कूटरवरून रोज मुंबईत वेगवेगळ्या जागी बसून निसर्गचित्रे रंगवायला सुरुवात केली आणि अशा चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत भरवले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही चित्रे विकली गेली, तेव्हा ठरवले की आता आपण अशीच एकेका प्रांत प्रकाशाची निसर्गचित्रे रंगवायची. १९९० मध्ये आम्ही सरळ अंदमानला गेलो. आमचा मित्र गोरखनाथ बैले तिथल्या केंद्रीय शाळेत कलाशिक्षक होता. त्यांच्या मैत्रीमुळे इतक्या लांब गेल्यावरही एकाकीपणा वाटला नाही. १५ दिवसांच्या अंदमान वारीत ४० चित्रे रंगविली. त्याचेही प्रदर्शन बजाज आर्ट गॅलरीत भरवले. विक्रीतून आलेली रक्कम पुढच्या प्रवासासाठी राखून ठेवली. प्रदर्शनात आमच्या एका समीक्षक मित्राने विचारले की, “आणखी किती काळ लॅण्डस्केप रंगविणार?” म्हणजे मी हे थांबवून काही तरी क्रिएटिव्ह (अॅबस्ट्रॅक्ट) करावे,असे त्याला सुचवायचे होते. मी म्हटले, “मला अजूनही स्पॉटवर बसून काम करायला आवडते. ही आवड आहे तोपर्यंत मी करत राहणार.”

खरे तर फोटोवरून लॅण्डस्केप मी कधी करीत नाही. प्रत्यक्ष स्पॉटवर त्या वातावरणात जो अनुभव आपल्या रोमारोमात जाणवतो, त्याची मूर्त साक्ष म्हणजे ते तयार झालेले चित्र असते. अशा प्रकारे निसर्गचित्रणाकरिता मी लेह-लडाख, चारधाम, हेमकुंड, हिमालयातील वेगवेगळी शिखरे मी रंगविली. एकदा तर कर्नाटकातील मंगळूरपासून किनाऱ्या-किनाऱ्याने कन्याकुमारीपर्यंत व तेथून चेन्नईपर्यंत निसर्गचित्रे रंगवित प्रवास केला. तयार झालेला चित्रसंच म्हणजे प्रवासाची जणू डायरीच असे. या काही चित्रांची प्रदर्शने झाली किंवा अशीच विकलीदेखील गेली. नेपाळमधील काठमांडू - पोखराचा प्रवासदेखील असाच चित्रमय होता. खरं तर नोकरी सोडली म्हणून कधी निराशा किंवा उपजीविकेत खंड पडला नाही. जपानमधील नारा येथील त्सबोसाका डेरा टेंपलमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित चित्रे रंगविण्याचे काम मिळाले. त्यानिमित्त तेथे चाळीस दिवसांचे वास्तव्यदेखील झाले. १९८८ साली मी पहिले विपश्यना शिबीर केले आणि माझ्या कलानिर्मितीला एक वेगळी कलाटणी मिळाली. दहा दिवसांच्या त्या शिबिरात मौन राहून आपल्या मनोव्यापाराचे तटस्थपणे निरीक्षण करताना जाणवले की, आपण बहिर्मुख राहून जे काही अनुभवतो, त्यापेक्षा आपल्या अंतर्मनात भलेमोठे विश्व सामावले आहे. त्याच्याकडे आपले कधीच लक्ष गेले नव्हते. त्यांना आपण आपल्या कलेच्या द्वारे दृश्य जगतात प्रकट करू शकतो. आतापर्यंत जे दिसते, त्यातून जाणवणारे चित्र रंगवित आलो आणि अजूनही करतोच आहे, तरी आता यापुढे आपल्या अंतर्मनातील संचित अनुभूतीचा विषय घ्यायचा आणि त्यांची मालिका रंगवायची. त्यानुसार ‘प्रतिभा’ हा विषय घेऊन मी प्रदर्शन भरविले. त्यानंतर अशा अनेक विषयांची मालिकाच साकार घेऊ लागली. ‘आई आणि मूल’, ‘बालपण’, ‘आपले सहजीवी’, ‘गजराजे’ ‘बुद्ध’, ‘कृष्ण’, ‘कालिदासानुरुपम’, ‘मोगरा फुलला’, ‘मर्यादा पुरुषोत्तम’, ‘उपनिषत्सु’, एकंदरीत आतापर्यंत २५-३० प्रदर्शने झाली असतील. जेव्हा निसर्गचित्रांचे प्रदर्शन भरवित असे, त्यावेळी रसिकांचा प्रश्न असे की, “आता यापुढे कुठे प्रवास?” पण, या संकल्पना चित्रप्रदर्शनानंतर रसिकांचा प्रश्न असतो की, “पुढला विषय कोणता?” मला खरोखरीच कृतकृतार्थ वाटते- प्रदर्शनातील चित्रांचा रसिक आस्वाद घेत असताना त्यांच्याशी संवाद साधण्यातदेखील एक वेगळाच आनंद असतो. ज्या विचाराने एखादे चित्र साकार होते, तेच चित्र रसिकांशी मूक संवाद करीत असताना त्याची अर्थ व्याप्ती आणखी रुंदावते,असा माझा अनुभव आहे. खरं तर सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे खूप काही आहे. अशी वैचारिक चित्रे गेली काही वर्षी रंगवित असूनही माझ्यावर असलेला ‘पोर्ट्रेट पेंटर’ हा शिक्का काही पुसट झालेला नाही आणि मला त्याची अजिबात खंत नाही, कारण अजून मी पोट्रेट्स रंगवितो ते अगदी आवडीने. जशी मी माझ्या मित्रपरिवारांची पोर्ट्रेट रंगवितो,तशीच काही महनीय व्यक्तींची पोर्ट्रेट्स समोर बसवून रंगविली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे, राम नाईक, विलासराव देशमुख, माजी राष्ट्रपती महोदया प्रतिभाताई पाटील, राज ठाकरे अशी अनेक नावे आहेत.

परंतु, आजच्या आधुनिक कलेच्या, नवकलेच्या झंझावातात पोर्ट्रेट पेंटिंगला आणि वास्तववादी कलेला जी सापत्न वागणूक दिली जाते, याची खंत आम्हा कलाकारांना आहे. अमेरिकेत ‘पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका’ ही संस्था या पोर्ट्रेट कलेला प्रोत्साहन देण्याकरिता जागतिक स्तरावर चार दिवसांची परिषद भरवते. त्यात प्रात्यक्षिके, लेक्चर्स आणि जागतिक स्पर्धादेखील असते, हे वाचून मला कुतूहल आणि जिज्ञासा उत्पन्न झाली की, आपणही यात सहभागी व्हावे. २००६ साली मी अमेरिकेत डलास येथे या कॉन्फरन्समध्ये सहभागी झालो आणि स्पर्धेत भागही घेतला. त्यात माझ्या पत्नीचे पोर्ट्रेट पाठविले होते.जगभरातून जवळजवळ १२०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून १२ चित्रांची निवड झाली होती आणि त्या १२ चित्रांत मी एकटा पहिला भारतीय होतो. तिसऱ्या दिवसाच्या बँक्वेटमध्ये निकाल लागला, त्यावेळी सर्व बक्षीसे जाहीर होताना सर्वोच्च ‘ग्रॅण्ड प्राईस’ माझ्या पोर्ट्रेटला जाहीर झाले. टाळ्यांच्या कडकडाटात निर्णयाचे स्वागत झाले. क्षणभर मला काही सुचेचना, कारण माझे म्हणून तिथे कुणीच नव्हते. मी एकटाच असल्याची भावना उचंबळून मन सद्गदित झाले. हे बक्षीस घेणारा मी चित्रकार वासुदेव नसून मी भारतीय पोर्ट्रेट पेंटिंग करणाऱ्या चित्रकारांचा इथे जणू प्रतिनिधी असल्याची भावना मनात दाटून आली. आनंद, हर्ष असूनही मी माझ्या टेबलाजवळून मंचावर बक्षीस घेण्यास जाताना ओठांवर ‘जन-गण-मन’ राष्ट्रगीत गुणगुणू लागलो. तो रोमहर्षक दिवस आजही काल झाल्यासारखा मला भासतो.अशा कितीतरी घटनांची स्मृतिचित्रे आज चाळताना ‘गेले ते दिन गेले...’ असे अजिबात वाटत नाही. कारण, आजची वर्तमानातली आणि भविष्यातली प्रत्येक नवनिर्मिती या गत अनुभूतीच्या पायांवर भक्कम उभी आहे. हे ‘मी’ आणि ‘माझे’ म्हणून जे काही सांगितले, ते केवळ निमित्तमात्र. खरे तर हे सर्व जे काही सांगितले ते आमचं आणि तुमचं सर्वांचं आहे. शेवटी सर्व केल्यावर ‘इदं न मम’ म्हणण्याची सुसंस्कृत परंपरा आहे.

- वासुदेव कामत

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response