Primary tabs

भागीदारी - रविराज गोसावी

share on:

 

भागीदारी 

स्वतःच्या व्यवसायात पडल्यावर अनेकांना एक किंवा अनेकांबरोबर भागीदारी करायचा मोह आवरत नाही. समोर दिसणाऱ्या कोणत्या तरी मोहजाळाला भुलून अशी भागीदारी करायची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आहे. एकापेक्षा जास्त भागीदार व्यवसायात असतील तर काम करायला जास्त बळ मिळेल, वेगवेगळ्या पद्धतीनं विचार होईल, सगळ्या भागीदारांच्या मदतीनं व्यवसायवृद्धी करणं लवकर शक्य होईल, जबाबदाऱ्या वाटता येतील; तत्सम काही विचार भागीदारी करण्यामागे असतात, जे चुकीचे नाहीत. पण दीर्घ काळ टिकावी अशी भागीदारी करायची असेल तर त्याला काही गोष्टी नैसर्गिक असाव्या लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे. 

 

एक म्हणजे तुमचा भागीदार तुम्हाला अंतर्बाह्य, नखशिखांत माहीत हवा. नुसता त्याच्या कामात कसा आहे हेच नाही तर त्याची आवड-निवड, सवयी, स्वभाव, कुटुंब, घरातलं वातावरण, आत्तापर्यंत केलेले व्यवहार, त्याची संगत, त्याचे विचार सुद्धा. आता मुळात इतक्या खोलवर माहीत असलेली एखादी व्यक्ती तुमचा जिवलग मित्र असू शकतो, आई/वडील असू शकतात, किंवा तुमचा जीवनसाथी. 

 

आपण सगळे आज भेटलो; दोन-पाच दिवसांत काही विचार विनिमय केला आणि आठ दिवसांनी कागदोपत्री कायदेशीर भागीदारी केली; तर ही भागीदारी किती दिवस टिकेल, किती स्तरापर्यंत टिकेल हे कोणीच सांगू शकत नाही. 

 

'आपण कागदोपत्री भागीदार आहोत म्हणून आपला आजपासून एकमेकांवर विश्वास आहे' असं नाही होत ना! कागदावर ऍग्रीमेंट झालं तरी मनावर ऍग्रीमेंट होतंच असं नाही. पण हो आपण गेले खूप वर्ष घट्ट मित्र आहोत, एकमेकांना आतून बाहेरून ओळखतो आहोत, मग आपली भागीदारी नैसर्गिक असतेच ती कागदोपत्री होणं ही फक्त औपचारिकता राहते.

 

भागीदारी ही राजन-सजन मिश्रा, पेस-भूपती, युवराज-धोनी किंवा अजय-अतुल सारखी असावी. ऐकणाऱ्याला राजन गात आहेत की साजन हे कळतही नाही. समोरून आलेला शॉट कोणी परतवायचा या प्रश्नासाठी पेस-भूपती मध्ये काही खाणा-खूणा होत असतील असं वाटत नाही किंवा या शॉटनंतर दोन धावा पाळायच्या हे शॉट मारल्या मारल्या एकाच वेळी दोघांच्याही मनात येतं ते युवराज-धोनी. 

 

गोची तिथे होते जिथे एक कोणीतरी ठळक व्हायचा प्रयत्न करायला लागतो. मग त्यांचा जतीन-ललित होतो, किंवा सलीम-जावेद होतो. वेगळे झाले आणि दोघेही जोरदार आपटले कारण एकत्रच ते पूर्ण होते.  

 

माझ्या जुन्या ऑफिसमधला एक प्रसंग आठवतोय, आमच्या ऑफिसचे दोन डायरेक्टर आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी सर आणि आर्किटेक्ट देशपांडे मॅडम हे एकमेकांबरोबर अनेक वर्ष काम करत होते. एकदा एक क्लायंट,आम्ही आणि मॅडम एका प्रोजेक्टसाठी एकत्र बसलो होतो. त्या प्रोजेक्टचा प्लॅन आम्ही असा काही केला होता की मॅडमचं म्हणणं होतं "या प्लॅनला एलिव्हेशन वेगळं करायची गरजच नाही, नुसतं असंच्या असं बांधत गेलात तरी बिल्डिंग चांगली दिसेल" हे त्यांनी क्लायंट समोर बोलूनही दाखवलं. त्यावर अजून काही मोघम चर्चा झाल्यावर अचानक सर आले. सर ते सगळं प्रोजेक्ट, तो प्लॅन  पहिल्यांदाच पाहत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरांनी सुद्धा तंतोतंत तेच उद्गार काढले; अगदी रेकॉर्ड केल्यासारखे!! तेव्हा एवढं आश्चर्य वाटलं नव्हतं कारण एकमेकांबरोबर समरस होऊन काम करण्याचं महत्व कळायची मॅच्युरिटी तेव्हा नव्हती कदाचित. पण आज कळतंय की विचार जुळणे म्हणजे काय! 

 

तर असंय की विचार जुळून मग भागीदारीत पाडायचं का, पैसे खेचण्यासाठी विचार जुळल्याचं कागदोपत्री दाखवायचं हा निर्णय मात्र आपला आपण घ्यायचा! 

 

...रविराज गोसावी

 

 


I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.

लेखक: 

No comment

Leave a Response