Primary tabs

भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे – गांधार

share on:

प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत, भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे गांधार. आपली यात्रा आता अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करते.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा उत्तरेकडील सीमावर्ती प्रदेश म्हणजे गांधार. गांधार प्रांतातील काही गावे आहेत कुभा (काबुल), कापिशा (बेग्राम), तक्षशिला (तक्षिला), पुष्कलावती (चारसदा) आणि पुरुषपूर (पेशावर), तर नद्या आहेत कुभा (काबुल), सुवास्तू (स्वात) आणि सिंधू. ॠग्वेदात गांधार प्रांताचा उल्लेख आहे, गांधार प्रांतातील गावांचा तसेच नद्यांचा उल्लेख आहे आणि त्यांच्या सौंदर्याचे वर्णनसुध्दा आहे.

रामायणात भरताच्या पुत्रांनी गांधारमध्ये दोन नगरी वसवल्याचा उल्लेख आहे. महाभारताची एक नायिका गांधारची राजकन्या होती. भीष्मांनी राजपुत्र धृतराष्ट्रासाठी गांधारच्या राजकन्येला मागणी घातली होती. गांधारच्या राजाला वधुशुल्क देऊन गांधारीला घेऊन भीष्म हस्तिनापूरला आले. गांधारीचा भाऊ शकुनी हा पाठरखा म्हणून तिच्याबरोबर आला. अंध धृतराष्ट्राशी विवाह झाल्यावर जन्मभर डोळयाला पट्टी लावणारी, कौरवांची माता, खलनायक दुर्योधनाची आई आणि सिंध-सौवीरचा राजा जयद्रथाची सासू होती - गांधारी.

सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर, साधारण इ.स.पूर्व सहाव्या शतकात दुसरे नागरिकीकरण झाले. या दरम्यान मोठी शहरे उदयास आली. या काळात भारतात 80हून अधिक जनपदे/लोकवस्ती होती. त्यापैकी 16 जनपदे 'महाजनपद' म्हणून ओळखली जात. कुरू, पांचाल, मगध इत्यादींपैकी एक महाजनपद होते गांधार. भारतातील पश्चिमेचे महाजनपद. प्राचीन बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकायमध्ये महाजनपदांचा उल्लेख येतो.

गांधारमध्ये बोलली जाणारी प्राकृत भाषा होती गांधारी. संस्कृतशी जवळीक साधणारी ही भाषा. अनेक बौद्ध ग्रंथ गांधारी भाषेत लिहिले गेले. पाकिस्तानमधील पेशावरपासून चीनमधील खोतानपर्यंत गांधारी भाषेतील ग्रंथ दिसतात. कुशाण राजांचा व्यवहारदेखील गांधारी भाषेत होत असे. मात्र हळूहळू बौद्ध ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले गेले आणि कालांतराने साहित्यनिर्मितीसाठी गांधारी भाषेचा वापर बंद झाला.

गांधारमध्ये लिखाणासाठी ‘खरोष्टी’ लिपी वापरात होती. गांधारमधील मन्सेरा, कंदाहार व शहाबाझगढी या ठिकाणी सम्राट अशोकाचे शिलालेख खरोष्टी लिपीमध्ये आहेत. या लेखांमधून अशोकाने अहिंसेचा संदेश दिला आहे. शिकारीसाठीच काय, खाण्यासाठी सुध्दा प्राणी मारू नयेत असे सांगितले आहे. स्वधर्माचे स्तोम व इतर धर्मांची अप्रासंगिक निंदा करू नये असे अशोकाचा लेख सांगतो. निंदेसाठी निंदा केल्याने आपल्या धर्माला कमीपणा येतो, असे लिहिले आहे आणि तो स्वत: सर्व धर्मांना आश्रय देतो असे सांगण्यासाठी हिंदू व बौद्ध धर्मगुरूंना मान देतो, असे लिहितो.

इ.स.पूर्व पाचव्या/सहाव्या शतकात गांधार प्रांतावर पर्शियाचे राज्य होते. त्यानंतर मौर्य, यवन, शक, कुशाण यांनी गांधारावर राज्य केले. या प्रांतात पर्शियन, ग्रीक, भारतीय, मध्य आशिया येथील विविध धर्मांच्या वेगवेगळया देवतांची पूजा करणारे लोक होते. अग्नी, सूर्य, मित्र, वरुण, आहुर माझ्द, झरतुष्ट्र आदींचे उपासक होते. आलेक्झांडरच्या स्वारीनंतर गांधारमध्ये ग्रीक (यवन) मंदिरे व देवता आल्या आणि अशोकाच्या काळापासून गांधारमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार झाला.

बौद्ध कलेमध्ये आधी बुद्धाचे चित्रांकन केले जात नसे. बुद्धाचे अस्तित्व चिन्हांमधून दाखवले जात असे. गांधारमध्ये बौद्ध धर्मीयांवर यवनांच्या मूर्तिपूजेचे संस्कार झाले असावेत. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात कुशाण राजा कनिष्कने बौध्द परिषद भरवली होती, जी चौथी संगीती म्हणून ओळखली जाते. या संगीतीपासून महायान पंथाचा प्रसार झाला. बुद्धाचे चित्रांकन होऊ लागले व बुद्धाच्या अतिशय सुंदर मूर्ती गांधारमध्ये तयार झाल्या.

गांधारमध्ये निर्मिलेल्या शिल्पांचा आशय भारतीय आणि अभिव्यक्ती यवन (ग्रीक) होती. मानवी शिल्पांचे कपडे, त्यावरील निऱ्या, दागदागिने, त्यांच्या हातातील इतर वस्तू ग्रीक, तर शिल्पाची कथा भारतीय होती. या शिल्पांमध्ये जातक कथा व बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांचे अंकन केले आहे. गांधारमध्ये विकसित झालेली ही शैली 'गांधार शैली' म्हणून प्रसिध्दीस आली.

गांधारी कला, गांधारी भाषा आणि गांधारी लोकांचा हा गांधार प्रदेश. कुशाणांनंतर हिंदू शाही राजांनी आकराव्या शतकापर्यंत गांधारवर राज्य केले. पुढच्या लेखात तेरावे शतक आणि त्यानंतरच्या गांधारमध्ये काय झाले ते पाहू.

गांधारमधील हे शिल्प दुसऱ्या शतकातले आहे. शिबी राजाची जातक कथा यामध्ये चितारली आहे. ही जातक कथा सांगते -

शिबी नावाचा एक न्यायी राजा होता. एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याकरिता एक देव कबुतराच्या रूपात उडत उडत राजाच्या दरबारात आले. दुसरा देव, कबुतराच्या मागोमाग ससाणा होऊन आला. कबुतराने आपला जीव वाचवण्यासाठी राजाकडे आर्जव केले. शिबी राजाने कबुतराला आश्रय दिला. मग ससाणा म्हणाला, ''मी जर आज ही कबुतराची शिकार केली नाही, तर माझी मुले भुकेने मरून जातील. न्याय कर राजा!'' त्यावर राजाने असा तोडगा काढला की. ''मी कबुतराला जीव वाचवण्याचे वचन दिले आहे. कबुतराच्या बदल्यात मी तुला त्याच्या भारंभार माझे मांस देतो.''

त्यावर शिबी राजाने एक तराजू आणवला. एका पारडयात कबुतर ठेवले. दुसऱ्या पारडयात आपले मास काढून घातले. पण कबुतराने आपले वजन वाढवले. आणखी मास घातले, तरी ते कबुतराच्या वजनाइतके होईना. शेवटी राजा स्वत: पारडयात बसायला निघाला, तेव्हा दोन्ही देव त्याच्या न्यायी बुध्दीवर प्रसन्न झाले.

कबुताराचे प्राण वाचवणारा हा राजा म्हणजे बुद्धाचा पूर्वजन्म होता, असे ही जातक कथा सांगते. जातक कथांमध्ये काही पौराणिक कथासुध्दा येतात, तशीच ही महाभारताच्या वनपर्वातील शिबी राजाची गोष्ट आली आहे.

- दीपाली पाटवदकर

content@yuvavivek.com 

 

लेखक: 

No comment

Leave a Response