Primary tabs

पु. ल. :  व्यक्ती की आनंदयात्री?

share on:

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली

असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलीकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना.सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात "सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात" असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. 

निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने 'पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला!' असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं. 

सतीश सोहनी हा मराठी युवक चिनी युद्धाच्या वेळी संरक्षण खात्यात वायरलेस ऑपरेटर कम मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्या वेळी एक महत्त्वाची बातमी पोहोचवण्याच्या विशेष कामगिरीवर तो होता. मात्र कामगिरी आटपून परत येताना तो शत्रूच्या गिळंकृत प्रदेशात अडकला. त्या वेळी १७ ते २४ नोव्हेंबर १९६२ या काळात त्याचं पोषण झालं ते पु. ल. देशपांडे यांच्या 'दीपावली' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या 'माझे खाद्यजीवन' या लेखावर. कोल्हापूरच्या कर्नल जाधवांनाही हिमालयातील एकाकी वास्तव्यात पुलंच्याच वाङ्मयाने साथ दिल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तर 'व्हायरल इन्फेक्शस पॉलिन्युरॉसिस' या आजारामुळे मज्जायंत्रणा कोलमडून पडलेल्या उदय फाटक यांना पुलंचच्या कथाकथनांनी नवसंजीवनी दिली आणि चार महिन्यात तो खडखडीत बरा झाल्याचं पत्र त्यांच्या आईने पुलंना पाठवलं होतं. 

ढवळे प्रकाशन संस्थेतर्फे आयोजित ग्रंथजत्रेच्यावेळी आलेल्या वाचकांची पाहणी करून त्यांचा सर्वांत आवडता लेखक कोणता हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्या वेळी पुलंना अव्वल दर्जाचं स्थान मिळालं होतं. इतकंच नाही तर बालशिक्षण आणि मानसशास्त्र यात रमलेल्या राणी उपाध्ये यांनी बोर्डी, वसई, पार्ले, माटुंगा आणि परळ या भागातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन प्रक्रियेची पाहणी केली आणि जवळजवळ सर्वच म्हणजे ७७८ मुलांनी पुल हे आवडते लेखक असल्याचं नमूद केलं. दिल्ली बोर्डाच्या मराठी विषयाच्या पुस्तकांमध्येही आठवीत 'बटाट्याची चाळ'मधील 'उपास' तर नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना 'विठ्ठल तो आला आला' ही एकांकिका अभ्यासाला आहे आणि वैयक्तिक अनुभव असा आहे की या सगळ्या इयत्तेतील मुलं हे दोन धडे शिकताना प्रचंड उत्साही असतात, त्यातील विनोदांना बरोबर दाद देतात. अगदी अमराठी विद्यार्थ्यांनाही हे दोन धडे समजून घेताना कुठेही अडचण येत नाही. 

पुलं या व्यक्ती इतकंच त्यांच्या वास्तव्याने मुंबईतील विलेपार्ले, टिळक मंदिर, ५ अजमल रोड ही मंतरलेली स्थळं बनली आहेत. आजही पार्ल्यात आलेली व्यक्ती या ठिकाणी दिलेल्या नुसत्या भेटीनेही भारावून जाते.
राष्ट्रीयीकृत एक बॅंक पुलंचं आपल्या शाखेत खातं आहे हे पाहून त्यांना सौजन्याने एक पत्र पाठवते, "आपलं आमच्या शाखेतलं खातं आम्ही पैशाचं मानीतच नाही. ते आमच्या आनंदाचं खातं आहे. आपण वेळोवेळी शाखेला भेट देऊन त्यात सातत्याने भरच टाकीत असता." हे फक्त पुलंच्याच बाबतीत घडू शकलं.

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङ्मय  भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङ्मय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु.ल. देशपांडे. पु.ल. देशपांडे प्रतिष्ठानने निरनिराळ्या लोकोपयोगी कामांना लक्षावधी रुपयांची मदत दिली. याशिवाय खाजगी पातळीवर उत्स्फूर्तपणानं सहजासहजी केलेली आर्थिक मदत प्रतिष्ठानच्या हिशेबात कधीच दिसून आली नाही. यात एखाद्या साहित्यिकाची आर्थिक अडचण, त्याच्या बायकोचं बाळंतपण, आजारपण अशा अनेक वेळी पुल आणि सुनीताबाई यांनी भक्कम आधार दिला.

"मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दाची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावं अशी माणसं हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात," व्यक्ती आणि वल्ली या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातल्या सखाराम गटणेच्या प्रकरणातील ही वाक्यं. 

खरंतर आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत आपल्याला सर्वांत जास्त आनंद दिला तो संगीताने असं पुलंचं मत होतं. वाचकांना मात्र पुलंच्या व्यक्तिचित्रांनी सर्वांत जास्त आनंद दिला. इतकंचं नाही पुलंचं सर्वात दीर्घायुषी साहित्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. अंतू बर्वा, सखाराम गटणे, नंदा प्रधान, नारायण, चितळे मास्तर या व्यक्तिरेखा मराठी वाचक विसरणं शक्यच नाही. यातील अनेक  व्यक्तिचित्रे पूर्णतः काल्पनिक. त्यात रंजकता आणण्यासाठी कुठेही ओढूनताणून विनोदाचा वापर नाही. तरीही या व्यक्तिरेखा प्रयोगरूपाने रसिकांसमोर आल्या. आधी मराठी रंगभूमीवर आणि काही काळापूर्वी हिंदी मालिकेच्या रूपात.  हीच त्या व्यक्तिरेखांची जादू आहे.

व्यक्तिचित्रांबरोबरच मराठी वाचकांना पुलंच्या प्रवासवर्णनांनी भुरळ घातलेली दिसून येते. एक नवीन जग पुलंनी वाचकांसमोर उलगडलं. खरंतर ते जग जुनं होतं, पण पुलंच्या नजरेनं आणि शैलीने त्यांना नवत्व बहाल केलं. पुलंच्या या प्रवासवर्णनांची 'अपूर्वाई' म्हणूनच अजूनही कमी झाली नाही, ती कदाचित याच कारणामुळे.

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही 
दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुद्ध
कधी काजळला नाही
पुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जर आज असतं तर ते १०० वर्षांचं झालं असतं. पुलं जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या साहित्यातून ते अजरामर झाले आहेत. आज समाज माध्यमांवर पुलप्रेमींनी एकत्र येऊन त्याच्याच नावाने अनेक ग्रुप तयार केले आहेत. फक्त पुलंच्याच साहित्यावर आधारित हे ग्रुप आहेत. अनेकदा एखाद्या घटनेवर भाष्य करताना जर पुलं असते तर त्यांनी काय म्हटलं असतं हेसुद्धा अनेकदा समाज माध्यमांमध्ये फिरताना दिसून येतं. याचाच अर्थ आजच्या पिढीलाही पुलं तितकेच आवडतात जितके ते आधीच्या पिढ्यांना आवडत होते. 'भाई : व्यक्ती की वल्ली'सारख्या चित्रपटामुळे नवीन पिढीलाही पुलंबद्दल जाणून घेता आलं, त्यातून त्यांच्याबद्दल अधिक समजून घेता आलं. या चित्रपटामुळे पुलंचं साहित्य वाचायला सुरुवात केलेले अनेक विद्यार्थी मला जवळून पाहता आले. महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या पुलंना मराठी अभ्यासक्रमात ज्ञानेश्वर दोन गुणांसाठी असताना आपलं साहित्य किती गुणांसाठी आहे हे विचारण्याची हिंमत झाली नव्हती. पण काळाच्या ओघात पुलंचं साहित्य आणि पुलं आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनात तितकेच जिवंत आहेत.

 

- आराधना जोशी

लेखक: 

No comment

Leave a Response