Primary tabs

गंंधभारलेले रंग..

share on:

सुमीत पाटील हा चित्रकार. नेत्रहीन विद्यार्थ्यांनाही चित्रे काढता, रंगवता यावीत यासाठी त्याने सुगंधी रंग बनवायला सुरुवात केली. असे ऐंशी रंग त्याने तयार केले आहेत. ते व्यावसायिकरीत्या करण्याची त्याची धडपड आहे. हाच विषय शिकवण्यासाठी तो भारतभर आणि विदेशातही जातो. त्यासाठी त्याने काय काय प्रयोग केले, हे आपण त्याच्या 'तरंग' या शॉर्ट फिल्ममध्ये पाहू शकतो.

एरवी संथपणे काही न घडता जाणाऱ्या आयुष्यात एखादा दिवस चांगलं काही देणारा जातो. शिरूर शॉर्ट फिल्म महोत्सवात परीक्षक म्हणून बोलावलं गेलं, तेव्हा कल्पना नव्हती की हा दिवस असं माणिक देऊन जाणार आहे. स्पर्धेसाठी अनेक शॉर्ट फिल्म्स आल्या होत्या. कल्पना, कथाबीज, मांडणी, सामाजिक संदेश, नुसतीच गोष्ट, आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक आशयसंपन्न आणि लक्षवेधी कलाकृती पाहिल्या. त्या सगळयांचं कौतुक आहेच. पण ज्या एका फिल्मने मन वेधून घेतलं त्याबद्दल आणि त्याच्या निर्मात्याबद्दल लिहावंसं वाटतं आहे.

डॉ. सुमीत पाटील हे मूळचे मुंबई, दादरचे रहिवासी आहेत. त्यांना शाळेपासूनच चित्रकलेची जाण आहे. चित्रकलेच्या दोन्ही परीक्षांत ते महाराष्ट्रातून प्रथम आले आहेत. इयत्ता दहावीत असताना 'बालश्री' या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती. पूर्ण देशातून पंचवीस मुलं निवडली जातात. सहा दिवस दिल्लीत राहवून त्यांच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. एकूण वावर, व्यक्तिमत्त्व आणि कला सगळयांच्या समन्वयातून विजेते निवडले जातात. सुमीतला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. ''मोठेपणी तुला कोण व्हायला आवडेल?'' या त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सुमीतने ठाम उत्तर दिलं, ''सुमीत पाटील व्हायला आवडेल!'' हा आत्मविश्वास त्याला जिंकवून गेला. त्याचं चित्र कलामसरांनी जपून ठेवलं. त्याच्याशी पुढे संपर्कही ठेवला. आयुष्याला असे अनमोल ठेवे मिळाले की जगायला बळ येतं.

यानंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाले. शाळेत असताना आणि ज्युनियर कॉलेजमध्ये त्याने चित्रकलेच्या शिकवण्या घेतल्या. यातूनच त्याने रचना महाविद्यालयातून स्वत:चं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं.

बालश्री स्पर्धेत त्याच्यासह एक नेत्रहीन विद्यार्थिनी होती. ती महाराष्ट्रातून गाण्यासाठी निवडली गेली होती. स्पर्धेतील एक महत्त्वाचा भाग होता एक पूर्ण भिंत रंगवणं आणि विषय होता आकाश, सूर्य असा. यात सुमीतने मासे रंगवले होते. त्याचं वर्णन ऐकून या नेत्रहीन मैत्रिणीने चित्राचं कौतुक केलं. यासाठी सुमीतला शाबासकी तर मिळालीच, तसंच पुढच्या आयुष्यातील कार्य दिसलं. यांनासुध्दा चित्र काढता व रंगवता आली पाहिजेत या विचाराने त्याला पछाडलं.

रचना संसद इथे शिकतानाच सुमीतने या दिशेने काम करायला सुरुवात केली. त्याची एक वैयक्तिक आवड इथे कामी आली. सुमीतला स्वत:ला चाफा फार आवडतो. तो नेहमी चाफ्याचं अत्तर वापरतो किंवा फुलं जवळ ठेवतो. एकदा वर्गातल्या मुलींनी त्याला या गंधावरून ओळखलं. वर गमतीने विचारलं की, ''सर, तुम्हाला चाफा इतका का आवडतो? तुमचे डोळे पिवळे आहेत का?'' हाच तो नेमका क्षण, जेव्हा सुमीतला गंध व रंग यांची सांगड घालण्याची कल्पना सुचली.

नेत्रहीन व्यक्ती चित्र काढतात, रंगवतात. पण त्यांना यासाठी कुणाची तरी मदत लागते. त्यांना स्वत:चं स्वत: हे करता यायला हवं. साधारणत: गंध ओळखण्याची व लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता अधिक असते. ते वासावरून माणसं ओळखतात, लक्षातही ठेवतात. आवडीप्रमाणे विशिष्ट अत्तर, परफ्यूम लावतात. त्यांच्या गुणाचा उपयोग करून घेण्याचं सुमीतने ठरवलं. त्याने रंगात वेगवेगळी अत्तरं मिसळली. रंग व गंध यांच्या समन्वयातून हे अनोखे रंग शोधले. आता चित्र काढताना नेत्रहीनांना कुणाच्या साहाय्याची गरज उरली नाही. हिरवा हवा म्हंटलं की त्या तुळशीच्या वासाचा रंग घेतात आणि भराभरा कागदाच्या आसमंतात श्रावण उभा करतात! झाडांवर जांभळया रंगाचे आणि जांभळाच्या वासाचे घोस लटकतात. चाफ्याच्या रंगाचा पिवळाधम्म सूर्य आशेचे किरण पसरतो!

सध्या सुमीतने या रंगांचं उत्पादन सुरू केलं आहे. वॉटर, ऍक्रायलिक आणि पोस्टर या प्रकारचे सुगंधी रंग तो बनवतो.  त्यांच्याकडे याचं पेटंट आहे. असे एेंशी रंग तयार केले आहेत. ते व्यावसायिकरीत्या करण्याची त्याची धडपड आहे. हाच विषय शिकवण्यासाठी तो भारतभर आणि विदेशातही जातो. त्यासाठी त्याने काय काय प्रयोग केले, हे आपण 'तरंग' या त्याच्या शॉर्ट फिल्ममध्ये पाहू शकतो. याचं संगीत व इतर निर्मिती साहायक असे मिळून सव्वीस नेत्रहीनांचा ही शॉर्ट फिल्म बनवण्यामध्ये सहभाग आहे. अवश्य पाहा. या निमित्ताने त्यांनी नेत्रदानाचं आवाहन केलंय. शक्य असेल त्यांनी तेदेखील करावं.

गांच्या गंधाबरोबर छटांमुळेही दिव्यांगांना कसा फायदा होतो, हा त्याचा पुढील अभ्यासाचा विषय आहे. शांत रंग त्यांना कसे शांतवतात, त्यातून त्यांना उत्पन्न कसं मिळू शकेल, त्यांच्या पालकांना यातून काही साहाय्य तसंच मदत होऊ शकेल, असा खूप विचार सुमीतने केला आहे. त्याचं एक निरीक्षण इथे नोंदवण्यासारखं आहे. सहसा मुलं किंवा थोरदेखील स्पर्धावृत्तीचे असतात. पण दिव्यांगांना तुम्ही चित्र काढायला दिलं की स्वत:चं काम पूर्ण होईपर्यंत इकडेतिकडे बिल्कुल बघत नाहीत. स्वत:चं काम पूर्ण झालं की इतरांना मदत करतात. किती कौतुकाचं आणि शिकण्यासारखं आहे हे!

तरुण पिढीचं हे चित्र आशादायक आहे. देव असा कुणाकुणाच्या मनात आणि रूपात उभा राहतो. मग तो नाही असं म्हणवत नाही. सुमीतला त्याच्या या कार्यासाठी अनेकानेक आशीर्वाद आणि शुभेच्छा.

सुचरिता

 

लेखक: 

No comment

Leave a Response