Primary tabs

गानतपस्वी मास्टर दिनानाथ मंगेशकर

share on:

अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी आणि निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान असे अनेक गुणविशेष लाभलेले शास्त्रीय गायक, संगीतनाटक अभिनेते असणाऱ्या मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोमंतकातील मंगेशी येथे झाला. 

रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गायनाचे  घेतले. बाबा माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गुरु होते.

१९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वत:ची गंधर्व नाटक मंडळी स्थापन केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळीत बालगंधर्वांच्या जागी दिनांनाथांना प्रवेश मिळाला. तेथे ते साधारण चार वर्षे होते. दिनानाथ मंगेशकरांना श्री. कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली.

१९१५ मध्ये 'ताजेवफा' या हिंदीनाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांना मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नाविन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा 'बलवंत संगीत मंडळी' नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. या कंपनीने महाराष्ट्रभर फिरून नाटक गावागावात पोहोचवले. गडकरींनी भावबंधन हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले होते. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या.  उग्रमंगल नाटकात दीनानाथांनी ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर नृत्य केले होते. हा ठुमरी नृत्य त्याकाळचे फार मोठे आकर्षण ठरले होते. त्यांनी ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रम्हकुमारी’मध्ये तपोधन अशा पुरुषांच्या भूमिका केल्या पण त्यांच्या ध्येयवादी, आक्रमक आणि स्वतंत्र बाण्याच्या स्त्री-भूमिका विशेष गाजल्या.  

दिनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. ज्योतिष आणि संगीत या विषयावरील ग्रंथ त्यांनी लिहिला मात्र दुर्दैवाने तो छापून प्रसिद्ध होण्याआधीच गहाळ झाला.

दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नावाने, स्मारके, सभागृहे, उभारली गेली.त्यांच्या स्मरणार्थ पंडित दिनानाथ मंगेशकर संगीत नाट्य मोहोत्सव साजरा केला जातो. तसेच त्यांच्या नावाने दिनानाथ स्मृती-पुरस्कारही दिला जातो. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीवर ‘स्वरमंगेश’ नावाचा माहितीपट आहे.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ही दीनानाथ व त्यांच्या द्वितीय पत्नी माई यांची अपत्ये होत. या सर्वांच्या गळ्यात ‘दीनानाथांचा सूर’ आहे. २४ एप्रिल १९४२ रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकरांचे निधन झाले.

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response