Primary tabs

लागीरंं

share on:
 

To

CcBcc

लागीर

पळशी म्हणुन पारनेर तालुक्यातील एका गावातला हा जुना पेशवेकालीन वाडा...रामचंद्र कांबळे म्हणुन होळकरांचे दिवाण, त्यांची ही वास्तू.. वाड्याच्या प्रथम दर्शनाने अंगावर रोमांच न उठतील तर नवल..लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजातून माझं पहिलं पाऊल वाड्याच्या उंबऱ्यात घोटाळतंय. इथल्या घरधणीनीनं आपल्या सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल.

शेणसडा टाकलेल्या अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल त्या मंगल क्षणाची..

आता तो सगळा दिमाख ओसरलेला... सापाच्या बेवारस कातीसारखी लोखंडी कडी दरवाजाला धरून आहे बस्स..

 

मी आत प्रवेशते.

मोठ्ठा चौक. चौकात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. माझे डोळे, मन त्याच्या पोटातल्या अंधाराला भेदू शकत नाहीत.. 

तगमग..तडफड..

त्या रांजणात असलेल्या अंधाराच्या पोटात, आता कुठल्याशा कृष्णविवरात जाऊन पडलेले या वाड्यातले चैतन्यस्वर..

मी चोहोबाजूंनी न्याहाळतेय त्या वास्तूला... त्यातल्या नक्षीदार खांबांना, छताला... 'त्याच्या' तळव्यावर माझं नाव शोधण्याइतक्या उत्सूकतेनं... शरीरमनाची एक वेगळीच तरल तरल अवस्था. जणू माझ्या आस्तित्त्वाचा अणुरेणू विघटुन तत्क्षणी त्या इतिहासाला उराउरी भेटणार होता...

कोनाड्यातलं देवघर...बंद दरवाजा असलेलं. दरवाजाच्या सांदीतून आत डोकावले तर मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात आश्वस्त करणारी, पितळी मूर्त.. नजरबंदी झाल्यासारखी मी तिथेच खिळून.. काही वेळ.

वरचा मजला शेवटचा श्वास घेत असलेला... तो काळाच्या कराल जबड्यात लूप्त होण्याआधी पापण्यांवर कोरून ठेवायचाय... वरच्या सज्जातून कितीतरी काजळमाखल्या नजरा मला बघताहेत कदाचित... कदाचित चौथ्या मितीतून... कुठल्याशा गूढ, समांतर जगातून...

तिथेच असलेल्या एका खोलीतून वेडावाकडा चित्कार ऐकायला येतोय. गर्ती बाई ...वेड लागलेली.. त्या खोलीत बंद आहे. मी थर्रारत थोडीशी भानावर येते. त्या चेटूक करणाऱ्या वास्तूपासून स्वतःला सांभाळून ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न करते..

'त्या' खोलीशेजारून जाणाऱ्या अरूंद जिन्यात पाऊल टाकते.

त्या अंधाऱ्या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पहात अगतिक धावले असतील? हो ना? नक्कीच.

तिथल्या गवाक्षांतून पाहाताना वाटलं, किती वैभव यांनी पाहिलं असेल?? कणाकणातून जुन्या वैभवाची साक्ष पटते आहे. परत मी लागीर झाल्यागत चारीदिशा नजरेतून धावते आहे..

माझ्याही नकळत मी या भिंतींचा कानोसा घेतला तर इथले आनंदाचे चित्कार, इथले एकुटवाणे हुंदके ऐकू येतील का मला?

छत्रपतींच्या पायाशी वफादार अशा जुन्या पराक्रमी सरदारांचे आत्मे नंतरच्या मराठेशाहीच्या पडझडीवर उसासे टाकत असतील का? त्यांच्या मनगटातलं सळसळतं पौरूष आजही गनीमाची खांडोळी करण्यास शिवशिवत असेल का?

या वाड्याची घरधणीन धुक्यासारख्या तरल रूपात आपल्या घराच्या भिंतीवरनं तिचा चुडाभरला अमानवी हात फिरवत असेल का?

वाड्याच्या भिंतींतून दिसणाऱ्या चौकोनी आकाशाच्या तुकड्यावर ती अजूनही तितकंच प्रेम करत असेल का?

कालकुपीत दडलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरं इतिहासपुरूषा तुला माहीत असतील ना रे? नक्कीच.

इतिहास नसानसांतून धावतो आहे... त्याच शूर पूर्वजांचं रक्त माझ्याही धमन्यांत खेळतं आहे... त्या वास्तूच्या दगडांना हात लावला तर अंगी शहारा येतो आहे... तिथली धूळ मस्तकी लावून रडावसं वाटतं आहे....अशी अवस्था..

काही वेळ काळाचा पडदा बाजूला करून इतिहासात डोकावल्यानंतर तरीही अजून अतृप्त मनानं, जडशीळ पावलांनी, मनाला साखळदंडासारख्या लोंबकळत असलेल्या अनुत्तरीत प्रश्नांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय.

 

अजून काय बोलू?

इतिहासपुरूषा!!!

दंडवत!!!

- डॉ.क्षमा शेलार

लेखक: 

No comment

Leave a Response