Primary tabs

मराठमोळी ‘डूडल गर्ल’

share on:

वय वर्ष तेरा, पण आपल्या खगोलशास्त्रातील आवडीमुळे गुगलची ‘डूडल गर्ल’ ठरलेल्या पिंगला मोरे या मराठमोळ्या मुलीची ही अनोखी कहाणी...

गुगल हे सध्या पाण्यासारखं झालं आहे, जसं आपण पाण्याला ‘जीवन’ म्हणतो, तसंच काहीसं गुगलचं आपल्या आयुष्यातील स्थान... आणि गुगल म्हटलं की ‘डूडल्स’ ही आलीच. ‘डूडल’ म्हणजे गुगलचे दर्शनीचित्र. केवळ चित्रांच्या भाषेत गुगलकडून वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना मानवंदना देण्यात येते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे डूडल आपल्या नजरेसमोर असतात. गुगलही आपल्या युजर्सची नस ओळखून विविध प्रकारच्या डूडल्सचा नजराणा पेश करत असते. पण, गुगलचा जेवढा सकारात्मक उपयोग होतो, तेवढाच त्याचा दुरुपयोगही होतो. कारण, सध्या मोठ्यांपेक्षा लहान मुले गुगलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. पण, याच गुगलच्या मदतीने आजवर अनेक लोक जागतिक स्तरावर नावारुपाला आली. अशीच काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मुंबईची मराठमोळी ‘डूडल गर्ल’ पिंगला मोरे. मुंबईच्या जे. बी. वाच्छा हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकणारी १३ वर्षांची पिंगला ही तिच्या बालदिनानिमित्त गुगलवर झळकलेल्या डूडलमुळे एकाएकी प्रसिद्ध झाली. पिंगलाने नुकत्याच पार पडलेल्या ‘गुगल फॉर डूडल’ या ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि तिचे डूडल थेट गुगलच्या पेजवर झळकले आणि काही मिनिटांत ती प्रसिद्धी झोतात आली.

पिंगलाने यावर्षीच्या ‘गुगल फॉर डूडल’ या मोहिमेत भाग घेतला. ही मोहीम विशेषत: जगातील लहान मुलांच्या कलाकृतीला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे म्हणून आयोजित केली जाते. पिंगलाने खरंतर या मोहिमेत भाग घेतला, तो या मोहिमेसाठी देण्यात आलेला विषय पाहून आणि चित्रकलेवर असलेल्या प्रेमामुळे. “यावर्षी ’माझे प्रेरणास्थान’ या विषयावर डूडल करायचे होते. यासाठी मी खूप विचार किंवा विशिष्ट तयारी वगैरे केली नाही. मी फक्त माझ्या आवडत्या विषयावर म्हणजे अंतराळ संशोधन या विषयाला माझे प्रेरणास्थान मांडले,” असं अगदी सहजपणे म्हणत पिंगला हिने आपले भावविश्व या डूडलच्या माध्यमातून साकारले. विशिष्ट प्रकारची काही मेहनत न घेता पिंगलाने आपलंच असं एक लहानसं विश्व रेखाटलं. या चित्रात तिने अवकाशाचा दुर्बिणीतून वेध घेणारी एक लहान मुलगी रेखाटली आणि तिच्या नजरेतून अवकाशात दिसणाऱ्या आकाशगंगा, ग्रह आणि अवकाशयाने यांची अशी रचना केली की, ज्यातून ‘गुगल’ ही अक्षरेही दिसतील. हे असं भावविश्व एखाद्या लहान मुलीचंच असेल, असे त्या दर्शनीचित्राकडे प्रशमदर्शनी अजिबात वाटत नाही. कदाचित यामुळेच जगभरातील ७५ हजार मुलांमध्ये पिंगलाने पहिला क्रमांक पटकावला. तेही ऑनलाईन मतांच्या जोरावर. या स्पर्धेसाठी जगभरातून मते घेण्यात आली होती. यात पिंगलाला सर्वात जास्त म्हणजे तीन लाख मते मिळाली.

शाळेत अभ्यासात कमी आणि चित्रकलेत पिंगलाचा जास्त कल असतो. त्यातच अवकाश, अंतराळ, चंद्र, तारे हे तिचे आवडते विषय. याच विश्वात ती सतत रमते. तिला रंगाची जाण आहे आणि तिची नजर भेदक आहे, जी थेट कॅनव्हासवरील चित्रात दिसते. हे पिंगलाच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी ओळखले होते. त्यामुळे शाळेत अभ्यासाच्या तासाला कमी आणि चित्रकलेच्या वर्गात तिचं जास्त लक्ष असतं. तिच्या आई-वडिलांनी कधीच रोखलं नाही. “आज गुगल कुणाला माहीत नाही!! मला आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांकडूनच या स्पर्धेविषयी समजले आणि मी तयार झाले. पण, जिंकेन असं अजिबात वाटत नव्हतं,” असं म्हणत असताना पिंगलाला तिची ओळख अंतराळ क्षेत्रात निर्माण करायची आहे, असंही म्हणते. जो विषय मुलांना शाळेत अजिबात आवडत नाही, अशा खगोलशास्त्रात पिंगलाला भरपूर रस आहे. त्यामुळे फावल्या वेळेत ती अवकाश, चंद्र, तारे, खगोलशास्त्र यासंबंधी अधिकाधिक वाचन करत असते. मुख्य म्हणजे, केवळ अभ्यास करून पुस्तकी किडा तिला कधीच व्हायचे नाहीये. यामुळेच तिला अवांतर वाचनाची सवय लागली. “घरातल्यांनाही वाचनाची आवड असल्यामुळे ती आवड मलाही लागली. त्यामुळेच कदाचित माझ्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या असतील,” असं तिला वाटतं.

गुगलच्या या डूडलमुळे तिला केवळ प्रसिद्धी मिळाली आहे असे नाही, तर गुगलच्यावतीने तिला पाच लाखांची शिष्यवृत्ती आणि दोन लाखांचे टेक्नॉलॉजी पॅकेजही मिळाले आहे, ज्यामुळे पिंगला तिच्या कलागुणांना वाव देऊ शकेल. याचबरोबर अमेरिकेतील गुगलच्या ऑफिसची सैरही पिंगला आपल्या कुटुंबीयांसमवेत करू शकते. असं म्हणतात की, मुलांना चित्राची भाषा जास्त कळते. पण, चित्रकला या विषयात आपल्या मुलाला आवड आहे, असं समजलं की पालकांची मात्र नाकं मुरडली जातात. त्यामुळे पिंगलाची ही चित्रकला या विषयाकडे असलेली ओढ ही केवळ तिच्या वयातील मुलांसाठीच नाही, तर सर्व पालकांनाही उत्तेजित करणारी आहे. त्यामुळे यापुढे भावविश्वात रमणारी मुलं यापुढे जास्त दिसतील अशीच आशा...

- प्रियांका गावडे 

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response