आपण एखादी सेवा पैसे देऊन विकत घेतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्या गरजांची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, त्या अपेक्षांची पूर्तताच झाली नाही तर? मोबाईल आणि त्यातील सेवा पुरवठादार आज आपले २४ तासांचे सोबती झाले आहेत. पण, या सेवा पुरवठादार कंपन्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, त्यांनी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी, ग्राहकाला आवडेल त्या कंपनीची सेवा घेण्यासाठी भारतात २०११ साली मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अर्थात ‘एमएनपी’ सेवा सुरू करण्यात आली.
म्हणजेच एखाद्या ग्राहकाला विशिष्ट कंपनीची सेवा आवडली नाही तर तो दुसऱ्या कंपनीची सेवा आपला जुनाच मोबाईल क्रमांक तसाच ठेऊन घेऊ लागला. न परवडणारे रिचार्ज प्लॅन, नेटवर्कमधील अडचणी, कॉल फेल, इंटरनेटचा वेग आदी कारणे त्यामागे होती. पण आता ही सेवाच बंद होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते.
जानेवारी २०१८ मध्ये ‘ट्राय’ने एमएनपीचा दर १९ रुपयांवरून ४ रुपये म्हणजे तब्बल ७० टक्क्यांनी कमी केला. खरे म्हणजे पोर्टेबिलिटीसाठीचे १९ रु. शुल्क हे काही फार जास्त नव्हते, पण ग्राहकांना थोडासा लाभ देण्याच्या ‘ट्राय’च्या निर्णयापायी एमएनपी सेवा देणाऱ्या कंपनीलाच नुकसान झाले. ‘ट्राय’च्या या एका निर्णयामुळे एमएनपी सेवा पुरवठादार इंटरकनेक्शन टेलिकॉम सॉल्यूशन्स आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी कंपनीला तोटा झाला व त्यामुळे या कंपनीने ही सेवाच बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, न्यायालयामध्ये यासंबंधीची याचिकाही दाखल करण्यात आली. ४ जुलैला त्यावर सुनावणीही होणार आहे. मात्र, त्यावर तोडगा न निघाल्यास ही सेवाच बंद पडू शकते. २०१७ मध्ये रिलायन्स जिओने टेलिकॉम बाजारात प्रवेश केल्यानंतर पोर्टेबिलिटीसाठीच्या अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तसेच इतर कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा लागली. सध्या मे महिन्यापासून देशभरात एमएनपीसाठीचे २ कोटी अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत, पण आता पोर्टेबिलिटीची सेवा देणाऱ्या कंपनीने ती सेवाच न देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे नेमके काय होणार, याची माहिती कोणालाही नाही. एमएनपी सेवा बंद पडली तर, त्याचे सर्वाधिक नुकसान ग्राहकांनाच सोसावे लागणार आहे. म्हणजे एखाद्या कंपनीची सेवा कितीही रद्दड असली तरी ग्राहकांना पदरी पडले पवित्र झाले, या न्यायाने त्या सेवेलाच आपलेसे करावे लागेल. ग्राहकांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असून आता न्यायालयात तरी यावर काही तोडगा निघतो का, हे पाहणेच त्यांच्या हाती आहे.
- महेश पुराणिक
No comment