Primary tabs

नवतरूणांची समाजकारणात यशस्वी वाटचाल

share on:

जागतिकीकरणाच्या जमान्यात करिअरला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल असताना देखील काही अवलिया माणसं वेगळीच वाट शोधतात. अशीच वेगळी वाट शोधली आहे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी. डोंबिवलीत राहणारा हा २७ वर्षाचा तरुण, ‘शिवनलिनी प्रतिष्ठान’ या सामजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींसाठी काम करीत आहे. आर्थिक परिस्थितीशी झगडत काम करण्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत आणि अशा परिस्थितीतही काम करता येते, असे अनिरुद्ध कुलकर्णी यांचे मत आहे. त्यांच्या ध्येयाचा आढावा घेणारा हा लेख...

एका चाळीच्या छोट्याशा घरात राहणार्‍या कुलकर्णी यांनी परिस्थितीची जाण ठेवत वयाच्या १७ व्या वर्षात रस्त्यावर डस्टर विकण्याचे कार्य सुरू केले. हलाखीची परिस्थिती असल्याने कुलकर्णी यांनी पहाटे उठून पेपर टाकणे, दुधाच्या गाडीवर हमालीचे काम करणे, अशी कामे केली व यातून मिळणार्‍या पैशातून मंदिराबाहेर बसणार्‍या गरीब मुलांना गोळ्या, चॉकलेट, कपडे वाटण्याचे कार्य त्यांनी केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असल्याने कुलकर्णी यांनी शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी २०१५ साली ‘शिवनलिनी प्रतिष्ठान’ संस्थेची स्थापना केली. फायर फायटिंग, सेल्फ डिफेन्स, डिझास्टर मॅनेजमेंट, योगा यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी शिक्षण घेतले असून या शिक्षणाचा फायदा नागरिकांना व्हावा यासाठी सध्या विविध उपक्रमांतून ते नागरिकांना मोफत प्रशिक्षणही देतात. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे औचित्य साधून ‘शिवनलिनी प्रतिष्ठान’तर्फे ठाणे प्राथमिक शाळेत झेंडावंदनासह तेथील लहान लहान मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येते.

आंबेडकर जयंती, गांधी जयंती अशा महान आदर्शांचा अभ्यास मुलांमध्ये खोलवर रूजावा याकरिता विविध उपक्रम शाळांमध्ये प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येतात. शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे शहरातील विविध वृद्धाश्रमांमध्ये वेळोवेळी खाऊ, कपडे यांचे वाटप करण्यात येते. तसेच वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींसाठीही काम केले जाते. महापालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे यांसारख्या कार्यालयात नागरिकांना काही ना काही कामास्तव सतत फेर्‍या माराव्या लागतात व अपुरे ज्ञान असल्यामुळे नागरिकांमध्ये शासकीय प्रक्रियेबाबत चीड निर्माण होते. सामान्य नागरिक व शासकीय विभाग यांच्यातील दरी मिटविण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांचे वेळोवेळी सेमीनार भरवून शासनाच्या प्रक्रियांविषयी माहिती प्रतिष्ठानद्वारे देण्यात येते. तसेच न्यायालयाच्या प्रक्रियेचा खर्च व वेळ अधिक असल्याने सामान्य माणसाला न्यायालयाची पायरी चढणे मुश्किल होते. मात्र न्याय मिळविण्यासाठी वंचित असलेल्या गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेले विविध पर्याय नागरिकांना प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात येतात. उदा. नालसा, सालसा, लिवाल अ‍ॅड कमिटीसारख्या सुविधांबाबतही या संस्थेच्या वतीने मदत केली जाते.

समाजात चालणार्‍या अनिष्ट रूढी-परंपरा तसेच अंधश्रद्धा यांपासून नागरिकांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने पीडितांचे समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गाबाबत मार्गदर्शन प्रतिष्ठानद्वारे करण्यात येते. तसेच बलात्कारपिडित, घरगुती हिंसाचाराने पिडीत महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्यायिक लढ्यासाठी सहकार्य करण्यात येते.

महाविद्यालीन शिक्षणानंतर सामाजिक कार्य करण्यासाठी उत्तम मार्ग पत्रकारिता असल्याने कुलकर्णी यांनी आपल्या शिक्षणाचा मार्ग पत्रकारितेकडे वळविला. पत्रकारिता डिप्लोमा पूर्ण करून मनपा वृत्त, गुन्हेशोध, कालीगंगा, दै. ‘मुंबई तरुण भारत’ सारख्या वृत्तपत्रांमध्ये कार्य केले. सामाजिक आवड व देशहिताचे कार्य करण्याची आवड असल्याने निःस्वार्थपूर्ण सामाजिक कार्य ते करीत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असतानादेखील समाजोपयोगी कार्य करण्याची जिद्द त्यांनी ठेवली. मात्र सामाजिक कार्याला संस्थेची जोड असल्यावर कार्य करण्यास अधिक मार्ग उपलब्ध होतात. यासाठी त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले जाते.

अंबरनाथमधील कोकळे गाव हे ८० टक्के आदिवासी असून या गावात पाण्याची भीषण समस्या आहे, ही समस्या सोडविण्यासाठी आ. गणपत गायकवाड यांच्याद्वारे मदतीचा हात पुढे करण्यात आला. तसेच गावकर्‍यांना शासकीय योजना व रोजगाराबाबत मार्गदर्शनही करण्यात आले व या गावात विविध रोजगार राबविण्याचे कामही केले जाते.

आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक तरुण हा पैशांमागे धावत आहे. गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या ओघात आजच्या पिढीला समाजासाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र आपण या देशाचे, समाजाचे देणे लागतो ही बाब प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवून दिवसातला काही वेळ समाजासाठी दिला पाहिजे. गरिबी, बेरोजगारी अशिक्षितता यांमुळे न्यायापासून व सुखसुविधांपासून वंचित असलेला समाज आपल्या आधाराची आणि आपल्या सहकार्याची वाट पाहत आहे, याची जाण ठेवून किमान दिवसातला काही काळ अशा समाजासाठी दिला पाहिजे. सोशल मिडियावर येणार्‍या बातम्या वाचून सरकार, न्यायव्यवस्था यांना नावे ठेवण्यापेक्षा आपण काही करू शकतो का? याचा विचार आजच्या तरुणांनी करणे गरजेचे आहे. माता भगिनींच्या प्रती आदर बाळगून त्यांना समान दर्जा कसा देता येईल यासाठी तरुण पिढीने झटले पाहिजे, कारण आजचा तरुण हा उद्याचे भविष्य आहे, हे विसरता कामा नये, असे कुलकर्णी सांगतात. स्वतःसाठी जगताना आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टीवर गप्पांच्या माध्यमातून तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वच राग व्यक्त करतात, पण त्यात सहभागी होऊन आजच्या पिढीने काम करणे गरजेचे असल्याचेही ते सांगतात. आजची गरज ही ग्लोबलायझेशन बरोबर बदलण्याची असली तरी स्वतःतली माणुसकी संपता कामा नये, असा संदेश ते तरुणांना देतात.

अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष किशोर बोकील, डोंबिवली शहर अध्यक्ष अमोल काकडे, विधी विभागप्रमुख अ‍ॅड. प्रदीप बावस्कर, विधी महिला सल्लागार अ‍ॅड. प्रतीक्षा बर्वे, अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष नरेश गायकर, कल्याण शहर सतीश सोनावणे या संस्थेचा कार्यभार पाहत आहेत. सदस्य एकजुटीने या कामासाठी आर्थिक जुळवाजुळव करतात.
 

- रोशनी खोत

content@yuvavivek.com  

 

लेखक: 

No comment

Leave a Response