Primary tabs

मुलुंड वाणिज्य महाविद्यालयात रंगले पहिले "युवा संमेलन "

share on:

विवेक साहित्य मंच (विवेक व्यासपीठ), मुलुंड वाणिज्य महाविद्यालय आणि साहित्य संकृती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०१९ रोजी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयात “युवा संमेलन“ आयोजित केले होते.

साहित्याच्या क्षेत्रात युवकांच्या साहित्याला केंद्रस्थान मिळावे आणि त्यांच्या साहित्यिक जाणीवेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रथमच युवकांसाठीचे ‘युवा संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष लेखक, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्यासोबत लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अरुण करमरकर आणि प्रा. विद्या पाटील हे देखील उपस्थित होते. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पेडणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात संमेलनाध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांच्या भाषणाने झाली. ‘मुक्त संवाद हे केवळ औपचारिक भाषण न होता एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाणींचे मंथन व्हावे’ अशी इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

‘आम्ही काय वाचतो?’ या परिसंवादात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचनविषयक युवा पिढीची मते आपल्या शोधनिबंधातून मांडली. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान युवा पिढीचे प्रतिनिधी आणि जाणकार या नात्याने लेखक, पटकथाकार अभिराम भडकमकर यांनी भूषवले.

विद्यार्थ्यांना ‘मुलाखत’ हा साहित्य प्रकार आहे आणि त्याकडे करिअरच्या दृष्टीने पाहता येते, याची जाणीव होण्यासाठी सदर संमेलनात मुलाखतीचे सत्र घेण्यात आले. या सत्रात मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभिनेत्री तितिक्षा तावडे हिची प्रकट मुलाखत घेतली. या रंगतदार मुलाखतीनंतर स्वरचित काव्यवाचनाचे सत्र विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने कौशल इनामदार यांच्या उपस्थितीत यशस्वी केले. संमेलनाची सांगता अभिनेता, गायक अमोल बावडेकर याच्या गाण्याने झाली.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन, सूत्रसंचालन, पाहुण्यांची व्यवस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली होती. पहिल्यावहिल्या संमेलनाला विद्यार्थ्यांनी सकाळपासून उपस्थिती लावली होती. युवा पिढीचा हा सळसळता उत्साह साहित्यक्षेत्राला नक्कीच उभारी देईल, असे आशादायी चित्र या संमेलनाच्या रूपाने उभे राहिले.      

 

No comment

Leave a Response