Primary tabs

वाटेवरचे कुणी ....

share on:

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात-जातात. त्यातल्या काही व्यक्ती आपल्या लक्षात कायम राहतात ते त्यांच्यातल्या वेगळेपणामुळे!  अश्या व्यक्तींचे प्रसाद कुलकर्णी यांना आलेले स्वानुभव त्यांच्याच शब्दात...

 

आमच्या घरापासून सात आठ मिनिटांच्या अंतरावर माझ्या फुलवाल्याचं म्हणजेच सदुभाऊंचं दुकान.  अर्थात त्याला दुकान म्हणणं तितकसं संयुक्तिक नाही ठरणार,  कारण महानगरपालिकेची गाडी आली की हे so called फुलांचं‌ दुकान एक दिवसापुरतं नाहीसं व्हायचं.  दुसऱ्या दिवशी मात्र नेहमीप्रमाणे त्याच जागेवर ते फुलांनी बहरलेलं दिसायचं.  अगदी  नेमकं सांगायचं तर १९९५ पासून म्हणजे गेली चोवीस पंचवीस वर्ष मी सदुभाऊ कडून फुलं घेतोय.  आमच्या प्रभासच्या पहिल्या वाढदिवसाला सदुभाऊनी अगदी मनापासून फुलांची सजावट केली होती.  भिंतीवर फुलांमध्ये गणपती बनवला होता.  आणि पुढे प्रभास मोठा झाल्यावर कधी माझ्याबरोबर त्यांच्या दुकानात आला की त्याच्या हातात एक छानसं फूल देऊन "तुझ्या पहिल्या वाढदिवसाची सजावट मी केली होती" हे त्याला नेहमी सांगायचा. 

सदुभाऊलाही एक मुलगा आणि एक मुलगी होती. आपल्या संसारासाठी खूप मेहनत करायचा तो.  रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मी सकाळीच जायचो ताजी फुलं घ्यायला.  सात वाजता डोक्यावर एक मोठाली टोपली आणि खांद्यावर मोठी पिशवी सावरत येताना दिसायचा.  दुकान मांडण्यापूर्वी मला ताजी फुलं काढून द्यायचा.  कधी मुलांची चौकशी केली की मुलं नियमित शाळेत जातात , मुलगा हुशार आहे, मनापासून अभ्यास करतो म्हणून सांगायचा.  मध्येच कधीतरी दोन दिवस गावाला जायचा आईला भेटायला.  एवढीच मला सदुभाऊ बद्दल माहिती होती. 

मध्ये काही वर्ष गेली अणि एक दिवस त्याने आपल्याच दुकानासमोरच्या इमारतीमध्ये ब्लॉक घेतला.  मला हे ऐकुन नाही म्हटलं तरी धक्का बसलाच.  आमच्या भागातील जागेचे भाव ऐकून  छातीत धडधड वाढणाऱ्या आम्हा नोकरदारांना एक किरकोळ फुलविक्री करणारा फुलवाला त्याच भागात स्वतःचा  मालकीचा ब्लॉक घेतो हे पचवणं जरा जडच गेलं.  मी सदुभाऊचं मनापासून अभिनंदन केलं.  त्यालाही आता दुकानाच्या समोरच आल्यामुळे धंदा सांभाळणं सोपं जाऊ लागलं.  धंदा हा सदुभाऊचाच शब्द.  एव्हाना त्याचा मुलगाही कॉलेजमध्ये जायला लागला होता.  आणि हां हां म्हणता त्याच्या मुलाने  'माहिती आणि तंत्रज्ञान ' यामध्ये शास्त्र शाखेची पदवी घेऊन पुढे त्यामध्येच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.  अर्थात हे सगळं मला सदुभाऊ कडूनच कळत होतं.  परंतु हे सगळं सांगण्यामध्ये कोणताही अभिनिवेश नसायचा.  त्यालाही आपला मुलगा आजवर आपल्या घराण्यात कोणीही शिकला नाही एवढं काहीतरी शिकतोय इतकंच समजत होतं.  पुढे कॅंपस इंटरव्ह्यू मध्ये एका चांगल्या आयटी कंपनीत निवड होऊन त्याचं पोस्टिंग झालं दिल्ली ऑफिसला.  सदुभाऊची बायको आता मुलाचं लग्न  उरकून टाकण्यासाठी नवऱ्याच्या मागे लकडा लावू लागली.  आणि सदुभाऊ मुलाच्या मागे लग्नाची भुणभुण करायला लागला.  दुकानात गेल्यावर सांगायचा "साहेब बायको म्हणते मुलाचं लग्न करून टाकुया.पण हा ऐकतच नाही , थांबा थांबा म्हणतो.". मी पण गंमतीने म्हटलं "सदुभाऊ जुळवलं असेल कुठे त्याने." त्यावर अगदी सहजपणे नकारार्थी मान हलवत म्हणाला , "नाही हो साहेब,  असं नाही करणार काही तो. खूप सरळ मुलगा आहे आमचा".  आता याला काय सांगणार सरळ खालमुंडी मुलंच हे सगळं करून बसतात.

दिवस जात होते.  आता माझ्या घराजवळच एक फुलवाला बसू लागला होता.  आणि मी सुद्धा पुढे जाणं टाळून त्याच्याकडेच फुलं घेऊ लागलो होतो.  परंतू कधी पूजा असली किंवा अधिक फुलांची गरज असली की मी सदुभाऊ कडेच जायचो.  तो लगेच म्हणायचा "काय साहेब हल्ली येत नाही?"  त्यावर मी "हो !नाही जमत यायला" असं म्हणून वेळ मारून नेत होतो.   असाच एकदा खूप दिवसांनी त्याच्या दुकानात गेलो असताना सहज मुलाची चौकशी केली , तर म्हणाला "सध्या अमेरिकेत आहे.  नवीन कंपनीने वर्षभरासाठी पाठवलाय त्याला".  सदुभाऊच्या बोलण्यात तिचं अभिनिवेश विरहित सहजता होती.  मी ही मनापासून त्याचं अभिनंदन केलं आणि मुलालाही फोन आला तर माझ्या शुभेच्छा कळवायला सांगितलं.  मान हलवत तो ही धन्यवाद म्हणाला. मी  म्हटलं," तुझ्या मेहनतीचं मुलाने चीज केलं.  कधीतरी मुलाला जवळ बसवून त्याच्या यशामागे तुझ्या मेहनतीचा आणि या फुलांचा वाटा केव्हढा मोठा आहे ते त्याला समजावून सांग".  यावरही तो मान हलवत म्हणाला ,"कशाला सांगायला पाहिजे साहेब , त्याला माहितीय की सगळं".  अर्थात हे खरं असावं कारण पूर्वी मी त्याच्या मुलाला सदुभाऊ नसताना रस्त्यावरच्या त्या टपरी दुकानाची लाज वाटून न घेता विक्री करताना पाहिलं होतं.  

फुलांच्या किरकोळ धंद्यावर आपल्या मुलाला उच्च शिक्षण देणारा बाप आणि बापाच्या मेहनतीचं चीज करणारा पोरगा दोघंही ग्रेट. 

एक फुल उमलण्यासाठी मेहनत घेणारा आणि दुसरा ते कोमेजू न देण्यासाठी.

प्रसाद कुलकर्णी 

 

No comment

Leave a Response