Primary tabs

नटसम्राट काळाच्या पडद्याआड !

share on:

विसाव्या शतकातील मराठी रंगभूमीचे नटसम्राट  कोण? असा विचार जरी मनात आला तर डॉ. श्रीराम लागू यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नाही. अभ्यासू वृत्तीने अनेक पात्रांचे मनोविश्लेषण करून आणि त्यामध्ये आपली प्रतिभा ओतून मराठी रंगभूमीवर त्यांनी सजवलेल्या भूमिका पाहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच असायची. दुर्दैवाने असा हा नट सम्राट १७ डिसेंबर २०१९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. अशा या अवलिया बद्दल शशिकांत किणीकर यांनी लिहिलेला हा लेख.

श्रीराम बालकृष्ण लागू यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यभामा होते. पण त्यांचे शिक्षण मात्र पुण्यात झाले. त्यासाठी त्यांनी भावे स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काही वर्षे शिक्षण घेतल्यावर डॉक्टर बनण्यासाठी ते बी.जे.मेडिकल महाविद्यालयामध्ये गेले.

शिक्षण सुरु असतानाच भालबा केळकर यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ मधून त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी प्र.के.अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’ या नाटकात भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. सतत बारा-तेरा वर्षे ते भालाबांच्या हाताखाली ‘बेबंदशाही’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘ वेड्याचं घर उन्हात’ अशा अनेक नाटकात भूमिका करत राहिले. १९६४ साली विजय तेंडूलकर यांच्या ‘ मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकात त्यांनी भूमिका केली. विजया मेहता यांच्या ‘रंगायन’ या संस्थेने ते नाटक सदर केले होते. त्या संस्थेत दोन वर्षे काम केल्यानंतर थिएटर युनिटमध्ये त्यांनी ‘आधे अधुरे’ व ‘ययाती’ ही नाटके केली. ‘ गिधाडे’ या नाटकाच्या वेळी त्यांची दीपा बसरूर या अभिनेत्रीशी जवळीक निर्माण झाली आणि २४ जुलै १९७१ रोजी दीपा बसरूर दीपा लागू झाल्या. या दोघांनी ‘रूपवेध’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी १९७४ ते १९८९ या काळात चार नाटके सदर केली. त्यानंतर त्यांनी १९७४ व १९९५ साली ‘प्रतिमा’ व ‘क्षितिजापर्यंत समुद्र’ ही दोन नाटके रंगमंचावर आणली. पण हा सारा नात्यासंसार प्रायोगिक रंगभूमीवरील वाटचालीचा होतं. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक भूमिका केल्या. ‘इथे ओशाळला मृत्यू’पासून त्याची सुरुवात झाली. त्यांनी १९६९ साली ते नाटक सादर केले. त्यानंतर ‘ वेड्याचं गहर उन्हात’, ‘गिधाडे’,’काचेचा चंद्र’,’नटसम्राट’,’हिमालयाची सावली’ अशी अनेक नाटकांतून भूमिका करून डॉ. लागूंनी मराठी रंगभूमीवर स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले.

व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२) या चित्रपटाद्वारे डॉ.लागू यांनी चित्रपटात पहिले पाऊल टाकले. यात त्यांनी वठवलेली शिक्षक ते तमाशाच्या फडवाराचा एक उपरा पुरुष ही प्रवाही भूमिका लक्षणीय आहे, याचा प्रत्यय आजच्या चित्रपट रसिकांनाही येतो. ‘पिंजरा’ पाठोपाठ ‘सामना’, ‘सिंहासन’,’सुगंधी कट्टा’,’मुक्त’,देवकीनंदन गोपाळा’,’झाकोळ’, कस्तुरी’,सोबती’,पांढर’, ‘मसाला’ वगैरे चित्रपटांत त्यांनी साकार केलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयामुळे लक्षात राहिल्या आहेत. अभिनयातील प्रगल्भता, भूमिकेला अभिप्रेत असणारा संयमीपणा, भावप्रकटीकरणातले वैविध्य, संवादफेकीतील कौशल्य या अभिनयातला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींचा तरतमभाव साधत व्यक्त होणारे त्यांचे पडद्यावरचे रूप प्रेक्षकांना कमालीची मोहिनी घालत असे, याचा प्रत्यय त्यांच्या सर्वच चित्रपटातील सर्वच भूमिका पाहताना आलाय्वाचून राहात नाही, हे विशेष.

‘घरोंदा’, ‘किनारा’, ‘इमान धरम’, ‘एक दिन अचानक’ वगैरे हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. डॉ. लागू यांनी ‘गिधाडे’, ‘नात्साम्रात’, ‘किरवंत’ वगैरे काही नाटके दिग्दर्शित केली, तर ‘झाकोळ’ (१९८०) या एकमेव मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. १९५१ पासून सुरु झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षांत डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यामध्ये ‘संगीत नाटक अकादमी’तर्फे तत्कालीन उपराष्ट्रपती जी.एस.पाठक यांच्या हस्ते १९७४ साली मिळालेल्या पुरस्काराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्याखेरीज भारत सरकारतर्फे १९७४ साली ‘पद्मश्री’, महाराष्ट्र शासनातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, २००० साली मिळालेला ‘पुण्यभूषण’ पुरस्कार यांचाही उल्लेख करायला हवा. मराठी चित्रपटांसाठी त्यांना ‘सुगंधी कट्टा’, ‘सायना’, ‘भिंगरी’ या चित्रपटातील अभिनयासाठी ‘फिल्मफेअर’ पारितोषिकांनी गौरवले होते, तर ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांना साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होतं.

विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात चित्रपटसृष्टीतून स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारून डॉ.लागू मुंबईहून पुण्याला आहे व सध्या तेथे निवृत्तीचे जीवन जगात होते.वयाच्या ९२ वर्षापर्यंत त्यांचे अविरत वाचन आणि चिंतन चालू होते. १७ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आणि चित्रपट सृष्टीतील एक अवलिया हरपला. अशा या अवलियाला भावपूर्ण श्रद्धांजली!    

  शशिकांत किणीकर 

No comment

Leave a Response