Primary tabs

साहित्य संमेलन - एक नवीन अनुभव

share on:

विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व आयोजित साहित्य संमेलन नुकतेच पुण्यात पार पडले. या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या दीपा गायतोंडे यांचे संमेलनाविषयीचे मत त्यांच्याच शब्दात! 

यावेळचे साहित्य संमेलन विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. पहिल्या दिवसाची सुरवात झाली ती सरस्वतीची पालखी या नाट्य अभिवाचनाने. प्रसिध्द लेखिका अरूणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकातील नायिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनचं बदलला. विनीता तेलंग यांनी त्याचं नाट्यरुपांतर केलं होतं तर दिग्दर्शन केलं होतं विक्रम भागवत यांनी . सादरी करण करणारे कसलेले कलाकार होते विनीता तेलंग, अमृत सामक, मुग्धा देशपांडे, अनुपमा कुलकर्णी, प्राची रेगे, मोनिका जोशी आणि निर्मोही फडके.

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याबद्दल माहिती देणारी सुंदर चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर अरुणाताईंची मुलाखत डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी स्त्री लेखिकांच्या लिखाणामध्ये आणि परिस्थितीमध्ये कसा बदल घडत गेला हे उलगडून सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार चांगल्या लेखकाला स्तुती आणि पुरस्कार यांची अपेक्षा नसते. त्यांना आपल्या लिखाणाचा आशयरुपी विठ्ठलाच्या पायापाशी पोहोचायचं असतं आणि भाषा त्याचं माध्यम आहे . तसचं या मुलाखतीत अरुणाताईंचा लेखनप्रवासही समजून घेता आला.

त्यानंतर डॉ. स्वातीताई धर्माधिकारी, अभिषेक बेल्लरवार, अभय नवाथे, आभा मुळे ,विनय मोडक आणि विक्रमकाकांनी विविध नुक्कड कथांचे अभिवाचन इतक्या सुंदररीत्या केले की ते प्रसंग डोळयासमोर उभे राहीले. मेधा मराठे यांनी ची स्वत:ची कोंकणी कथा चाफो फुललो सादर केली. नुक्कडकथांवरील चर्चेत प्रेक्षकांनी आपली मते मांडली. संजीवनी शिंत्रे यांनी नुक्कड कथांच्या परिक्षणाचे निकष आणि त्यांची मते समजावून सांगितली.

नुक्कड कथांचं वैशिष्ट म्हणजे सकारात्मक कथा, विषयाच् वैविध्य, भाषा कथेला अनुरुप, योग्य निवेदन आणि शेवटपर्यंत सुत्र धरून ठेवायची हातोटी. त्यांच्या काही अपेक्षाही त्यांनी सांगितल्या जसे की, काही कथांचा विकास होण्याची संधी होती. कथानकापेक्षा कल्पनेला जास्त महत्व देण्यात आलं.

साहित्यनिर्मितीमध्ये उत्स्फूर्तता आणि कारागिरी या दोन्हींचा समतोल साधणे अपेक्षित असते. कथा प्रगल्भ होण्यासाठी अधिकाअधिक वाचन करणे आवश्यक असते. त्यानंतर नुक्कडचा बक्षिस समारंभ पार पडला. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गजानन बहिरट, आणि पूजा अवचट यांनी सुरेल गाणी सादर केली. अदिती दाते, सायली शिगवण, मानसी झोरे, ऋचा सरपोतदार, दिव्या शिवतारे यांनी नृत्य सादर केले. लावण्याने तबलावादन केले. प्राजक्ता बेंद्रे यांनी कोकणी भाषेतील नाट्यछटा सादर केली तर श्रीपाद एडकेने त्याच्या खास सोलापुरी भाषेत नाट्यछटेचे सादरीकरण केले.

दुसऱ्या दिवशीच्या सुरवातीला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यावरची चित्रफीत दाखवण्यात आली. त्यात त्यांच्या सुंदर हस्ताक्षराचा नमूना पहायला मिळाला. त्यानंतर त्यांची मुलाखत प्रिया जामकर यांनी घेतली. श्रीनिवास कुलकर्णी सरांनी खुमासदार शैलीमध्ये प्रश्नांची उत्तरे देत त्यांचा जीवनपट उलगडला. त्यांच्या मतानुसार लेखनाच्या कुठल्याही फॉर्मला सोईसाठी नाव दिलं जातं. ते लेखन आहे हे जास्त महत्वाचं असतं.

कविता ही आकाशासारखी आहे. ती खालून दुरुस्त नाही करता येत. काहीवेळा एखादी कविता लिहूनही जे सांगायचं आहे ते पुर्ण सांगून होत नाही अशावेळेला लेख लिहिला जातो. परिष्करण हे नेमक्या शब्दाचा शोध असतो. आपलं लेखन संपल्यावर त्याच्याकडे तटस्थपणे पहाता येणे हे गरजेचे असते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काही कविता सादर केल्या. तसंच त्यांच्या डोह या ललितलेखसंग्रहातील दादा हे त्यांच्या वडिलांचे व्यक्तिचित्रण वाचून दाखवले.

त्यानंतर काव्य संमेलन झालं. त्यात नवोदित कवी अभय नवाथे, सुरेश राठोड, मनोज वराडे, सौरभ देशपांडे, गौरव कुलकर्णी, स्वप्नील हसबनिस, प्रतीक जाधव, रश्मी मर्डी आणि दीपाली वारुडे यांनी भाग घेतला. त्यांनी अभंग, गजल अशा वेगवेगळया फॉर्ममधील कविता सादर केल्या. यावेऴी अध्यक्षपद भूषवलं प्रसिद्ध गीतकार वलय मुळगुंद यांनी.

त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रोशन दळवी यांची मुलाखत निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी घेतली. त्यांनी त्यांच्यासमोर आलेल्या केसेस आणि त्यांची उकल त्यांनी कशी केली याचं वर्णन केलं. त्या अनुषंगाने भारतीय कायद्यांची थोडीफार ओळखही झाली. यावेळेला प्रेक्षकांनीही त्यांना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

एक संमेलन उभं करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ना!. संमेलन पार पाडण्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार. संमेलनाच्या निमित्ताने जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. नवीन मैत्रिणी मिळाल्याही. या संमेलनाने खूप काही दिले आणि नवीन शिकायलाही मिळाले.

दीपा गायतोंडे 

No comment

Leave a Response