Primary tabs

संकल्प सिद्धीचा बट्ट्याबोळ

share on:

दरवर्षी संकल्प करायचा हे नेहेमी ठरवले जाते पण संकल्प सिद्धीस नेला जातो का? यावरच पवन जोशी यांनी लिहिलेला हा मजेशीर लेख!

दुपारचे जेवण भरपूर झालं होतं. तासभर असाच निघून गेला. डोळ्यावरची सुस्ती गप्प बसू देत नव्हती. कुठलं ही काम न करता कॉम्पुटरचा माउस स्रोल करत करत मेल चेक करण्याचे नाटक चालू होते. सोबत बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवण्याचे कामदेखील पराकोटीचे कष्ट घेऊन चालले होते. डेडलाईनचे कुठलं अर्जंट काम नसल्याने ऑफिसातली इतर मंडळी पण आळोखे-पिळोखे देत बसली होती. गप्पा मारायला कुठलातरी भारी टॉपीक काढला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं होतं, पण कोणीच काही बोलत नव्हतं. आपण कामात आहोत हे भासवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू होता. तोवर काहीतरी आठवल्यासारखा चेहरा करून चमत्कारिक नजेरेने विपुल कुमार उदगारले, ”अरेss नवीन वर्ष आलं! काहीतरी संकल्प केला पाहिजे रे!

“हा होय होय...!! काहीतरी करायला पाहिजे रे“
सगळ्यांना काहीतरी विषय पाहिजे होता गप्पांना, आता चर्चेला एकच उधाण आलं. लगेच आपापल्या जागा सोडून एका कॉर्नरला जमून गप्पाचा ओघ सुरू झाल्या. प्रत्येकजण कोणता संकल्प करावा याचा विचार करू लागला. आपली कोणती गोष्ट रोज चुकते किंवा कुठली गोष्ट रोज पाळली पाहिजे याचे मंथन चालू झाले.तेवढ्यात कोपऱ्यातून एकाने गडबडीने सांगितले. “आले रे आले आपले पूज्य बॉस आले! चला जागेवर!!” सगळी चर्चा तिथंच थाबली. पटापट मंडळी आपापल्या जागेवर पळाली.कोण काय काय काम करतंय हे बघत
साहेबांची स्वारी माझ्याकडे आली.
“काssय ..!! किती मेल चेक केले.”
“हो...झाले..!..झाले!...मेल चेक करून झाले. आता पुढचे टास्क प्रायोरिटीवर घेतोय”
भेदरलेल्या नजरेने कसेतरी उत्तर देऊन त्या पुढच्या टास्कची बोलणी करायला दुसऱ्या फ्लोअरकडे पळालो. तशी संकल्पांची सुरुवात डिसेंबर महिन्यातच होते आणि नवीन वर्षाची उत्सुकता वाढू लागली. सर्वजण नवीन संकल्प करण्याचे विषय ठरवू लागले. विपुल आपल्या सुटलेल्या पोटाकडे बघून म्हणाला, “निदान या पोटासाठी तरी तरी रोज न चुकता जिमला जाण्याचा संकल्प मी करायचा ठरवतोय.”, राघवने आपल्या कामातल्या चुका कमी कशा करता येतील याबद्दल,रितेशने ऑफिसला रोज वेळेत येण्याचा संकल्प केला, आमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये दिव्या फक्त अशी मुलगी होती की दर वर्षीचा तिचा ठरलेला संकल्प न चुकता पूर्ण करायची. तिचा संकल्पसुद्धा नावाप्रमाणे दिव्य असाच होता. तो म्हणजे ‘नवीन वर्ष नवीन बॉयफ्रेंड’. असे एकापेक्षा एक सरस असे संकल्प ऐकून वाटलं आपण सुद्धा कोणता तरी संकल्प सोडला पाहिजे. भले तो पूर्ण
केला नाही तरी काय बिघडतंय, संकल्प सोडून बघू या, सिद्धीस जातोय का नाही ते नंतर बघू. मग आपण सुद्धा कोणता तरी संकल्प का करू नये असा विचार माझ्या डोक्यात घोळू लागला. पण कोणता तरी म्हणजे कुठला संकल्प करावा याचा विचार करू लागलो. 

एकदम डोक्यात आलं चहा बंद करावा का? कधीतरी होणारी डोकेदुखी आणि पित्त हे या चहामुळे होते. चहाचे बरेच दुष्परिणाम असतात असं ऐकलं होतं. त्यात हाडे ठिसूळ होतात. आम्लपित्त, अल्सर, हृदयविकार किंवा निद्रानाश असं काय काय होतं. चहाचं आवड नसणारे काही मित्र आणि घरच्याच काही डॉक्टरनी चहा कसा चांगला नाही तो केव्हाही
सोडलेला बरा!! हे बऱ्याचदा पटवून सांगितलं होतं आणि सगळ्यात हाइट म्हणजे एक वाचलेले वाक्य आठवले की ‘चहा हा दारूपेक्षा जास्त घातक आहे. पण दारू बदनाम आहे चहा नाही’ या वाक्याने तर एकदम मी ठरवूनच टाकले की चहा न पिण्याचा संकल्प करू या. पण हे शक्य होणार का? कारण चहा आपला ‘जीव की प्राण.’ झोपेतून उठल्यावर, झोपताना, जेवणाआधी, जेवणानंतर, कुणाकडे गेल्याचं निमित्त, कुणी आल्याचं निमित्त, मिटींगा, गप्पा अशा सगळ्या वेळी घोटभर चहाचं, तरतरी आणणारं टॉनिक हे आपल्याला लागतच. कुणीही कधीही
विचारावं.”काय घेणार का अर्धा “ त्यावर कधी नाही म्हणल्याचं मला आठवत नाही.
चहा हा तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण दर ३-४ तासांनी आपल्याला चहाची तलफ येणार. मग काहीही करून ती तलफ आपण भागवणार, १ - २ जणं गोळा करून ऑफिसचे ३ जिने खाली उतरून येणार. शेजारचा शंकरभैया किंवा थोडं लांब जाऊन येवले यांच्या दुकानच्या पायऱ्या चढणार. कितीही गर्दी असली तरी ‘असुदे’ म्हणून थांबून पण घेणार आणि मग त्या ‘अमृततुल्याचे’ घोट घेत-घेत इकड-तिकडच्या गप्पा मारत बसणार. अशा या रोजच्या महत्त्वाच्या कामाला कशी काय बंदी करायची हा विचार सारखा डोक्यात यायचा. शेवटी मनाशी पक्कं केलं आणि एकदाचं ठरवलं दोन संकल्पांची सिद्धी करायची, काहीही असो की आता  नवीन संकल्प ठरला की चहा बंद. आणि त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करायची हा दुसरा संकल्प.
नाही म्हणायला वर्षाचे पहिले काही दिवस असेच गेले. संकल्प केला होता आणि अंमलबजावणीही सुरू झाली. कसेतरी ते दिवस बिनाचहाचे काढले. पण एक दिवस नेहेमीप्रमाणे ऑफिसला गेलो आणि नेमकी त्या दिवशी मोठ्या क्लायेंंटची मिटिंग लागली. त्या दिवशी कामाला सुरुवात दहा-साडेदहाला झाली. ढीगभर काम करायचं होतंं आणि टेन्शन वाढत होतंं तेवढ्यात चहा आला. सर्वांना एक-एक कप देऊन झाल्यावर. चहावाला माझ्याजवळ आला. मग कप घेताघेता एकदम ठरलेला संकल्प आठवला.
“नाही नको मला.”
“काय रे काय झालं आज चहा नको?”, शेजारच्यानं विचारलं.
“अरे माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे ना चहा न घेण्याचा”
“अरे बापरे हा संकल्प केल्यास आणि तू, पण तो पाळणं तुला जमणार का? एवढे काम आहे आणि टेन्शन आहे, चहाशिवाय कसं निभावणार रे तू?”
टेन्शन असले की चहा हा लागतोच क्लायेंंटसोबत घ्यावाच लागतो हेही त्यानं माहीत होतेच. त्यांचा  माझ्याविषयीचा त्याचा हा कॉन्फिडन्स बघून मला वाटलं ही अशी नकारात्मक सुरुवात झाल्याने संकल्प पुढं कसा टिकणार असं वाटलं. पण पुढच्याच क्षणी त्याच्या बोलण्याला न जुमानता मी चटकन सांगितले.
“हे काय म्हणून तर घेतला नाही ना आत्ता!!!”
अशाप्रकारे पहिली सकाळची तर चहाची हुलकावणी टाळली आणि कामात व्यस्त झालो. 

मिटिंगला सुरुवात झाली. अजेंड्याप्रमाणे सगळे टॉपीक कव्हर होऊ लागले. मिटिंग अगदी रंगात आली होती आणि जवळच्या किचनमधून कपांचा खळखळाट ऐकू आला. मनात म्हटले, हां!! आला आला!! चहा आला वाटतं इथला!! पण मानगुटीवरचं भूत असल्यासारखं दुसरं मन तिथं कडमडलं आणि म्हणू लागलं “आपला संकल्प लक्षात आहे का मिस्टर... “.५ मिनिटांनी
तिथे कपांचं वाटप चालू झालं. माझी वेळ आल्यावर मी अॅसिडीटीचं कारण सांगून चहा नाही घेत असं सांगितले. मग तिथले एक सिनियर सर माझ्याकडे बघून म्हणू लागले. “अरे तुमच्यासारखे तरुण, युवक असे जर चहाला नाही म्हणू लागले तर कसं रे! एक कपाने अशी काय कमी होणार आहे असिडीटी!! त्याला व्यायाम करा व्यायाम...!!!” आणि असे म्हणत चहाचा कप मला द्यायला लावला. मग ‘प्रेस्टीजचा प्रश्न’ या शब्दांखाली तो कप घेऊ का नको घेऊ करत करत, माझा हात शेवटी पुढे सरसावला. सकाळपासून ज्या हातांनी कटाक्षाने चहाचा संयम केला होता तेच हे हात हा प्याला कसा काय उचलत आहेत असा प्रश्न मनात आला. असुदे आता एक कपाने काय होतंय, सरांनी सांगितलंय. मोठ्या लोकांचं ऐकावं. अशी मनाची समजूत घातली. हा शेवटचा कप, पुन्हा घ्यायचा नाही असं म्हणत त्या हातातल्या चहाचे घोट घेतले. थोडं बरं वाटलं. सकाळपासून असलेली एक प्रकारची उदासीनता जरा दूर झाल्यासारखं वाटलं. चहा पिण्याची सुरुवात होऊन आणि संकल्पाची मोडता घालून क्लायंटच्या मिटींगची समाप्ती झाली. 
पाच वाजायला आले होते. ऑफिस सुटलेच होते. मोजकेच लोक जायचे राहिले होते. हे लोक म्हणजे चहाप्रेमी ग्रुपची मंडळी होती. ते आता चल म्हणून मागे लागणार त्याच्या आत मी
घाईघाईने माझे डेस्क आवरून जायच्या तयारीत होतो.
“अरे आजपासून आपला एक मेंबर फुटला बररं का आपल्या ग्रुपचा”

“नाही नाही येणार येणार...! यायला पाहिजे. हा आपल्या रोजच्या कामाचा भागच आहे. तो कसा काय चुकवेल. त्याचा संकल्पच चुकीचा आहे.”
“नाही रे जावा तुम्ही. मी काय नाही येत आता” मनाच्या कठोर निश्चयाने मी सांगितले.
“बरं ठीक आहे नुसतं चल, आम्ही घेतो चहा तू नुसता तरी चल“
“ठीक आहे चला! येतो....”
नाईलाजाने त्या सगळ्यांबरोबर ऑफिस शेजारच्या शंकरभैय्याच्या दुकानात गेलो. तिथल्या गॅसवर एक पितळी पातेलं चहानं भरलं होतं. त्यात चहावाल्याने वेलची पूड टाकून चहाचा वास अधिक फुलवला आणि चहा ढवळू लागला. मग वाटलं घ्यावा का एक कप काय करावं? पण नको म्हटलं मगाशी एक झाला आहे. मी असा चहाकडे एकटक बघत असलेलं पाहून विपुल म्हणाला, “बघ विचार कर असं चहा सोडून काय होत नसतंय.घे..!घे..! दुसरा कुठला तरी संकल्प कर”
“नको रे...मगाशी क्लायंटकडे घेतला तो एकच कप “
“मग झालं की मगाशी तिथला आता इथला..!! बघ बाबा...आता ऑफिस सुटलंय...दिवसभर कामामुळे डोकं वैतागलंय. अशा संध्याकाळच्या वेळी जरा कसं हलकंहलकं वाटतं एका कपानं. एकदमच ही चहाची बंदी कशाला....” असे तो म्हणतोय तोपर्यंत तिथल्या माणसानं रोजच्या सवयीप्रमाणं समोर एक फुल कप वाफाळलेला चहा एक क्रीम रोल ठेवला. त्याचं बोलणं ऐकून आणि समोरचं दृश्य पाहून मला मोह आवरला नाही. मग तो कप उचलला आणि बिनधास्तपणे चहा पिऊ लागलो. त्यावर त्या सगळ्यांचा एकच हशा पिकला. आणि म्हणू
लागले. ”काय संकल्पवाले अंमलबजावणी कमी पडली वाटतं.”
मी म्हणालो, “तुमच्यासारखे नको त्या बाबतीत आग्रही असणारे बरोबर असले की संकल्पसिद्धीचा बट्ट्याबोळ व्हायला काय वेळ लागतोय.” मग चहाप्रेमी ग्रुपच्या मेम्बर्सनी माझ्याकडे बघत रोजचे ठरलेले वाक्य एका सुरात म्हटले. ”चहाला वेळ लागत नाही पण वेळेला चहा लागतोच” हे सगळं ऐकत चहाचे सुट्टे पैसे देत तिथून बाहेर पडलो. आणि त्या वेळी एक नक्की संकल्प ठरवला आणि तो व्यवस्थित पाळतोय तो म्हणजे “रोज न चुकता चहा पिण्याचा !”

No comment

Leave a Response