Primary tabs

वाटेवरचे कुणी - प्रदीप धोंड

share on:

मुंबापुरीत अनेक व्यक्ती विविध व्यवसायात, अनेकविध क्षेत्रात व्यस्त आहेत.  मी स्वतः एका विदेशी बँकेत वीस वर्ष  चांगल्या पदावर काम केलं.  आपण ज्या क्षेत्रात रोजीरोटी कमावतो त्या कामाला पूर्ण न्याय देतो का? आपल्या कामात तनमनाने सामावून जाणं फारच थोड्यांना जमतं.  

कलेच्या प्रांतातही आज हेच चित्र दिसतंय. चटकन पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापायी कलेमधला आत्माच हरवून जातोय आणि कलाकार ओरड करतात 'रसिक आम्हाला स्वीकारत नाहीत'; परंतु कलेशी प्रामाणिक राहून काही केल्यास रसिक त्याचं स्वागत मनापासून करतात हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे.

हे सगळं लिहिण्याचं कारण असं की अशा एका हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतातील ज्येष्ठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात येण्याचं भाग्य मला लाभलं आहे. 

माझ्या वडिलांना असलेली वाचनाची आवड कुटुंबात साऱ्यांमधेच निर्माण झाली.  वडिलांकडे विविध प्रकारच्या मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील दिड ते दोन हजार पुस्तकांचा संग्रह आणि व्यासंग होता. नोकरी सांभाळून थोडं लेखन, काव्य तसच संगीत कार्यक्रमाचं संहिता लेखन निवेदन हा माझा छंद होता आणि अजूनही आहे.  

एका संगीत कार्यक्रमाचं निवेदन करत असताना प्रदीपजीना जवळून पाहण्याचा योग आला. दुसऱ्या दिवशी मला फोन आला' मी प्रदीप धोंड, आपल्याला भेटायचंय. कधी याल? मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर अनेकदा भेटत राहिलो, इतकंच नव्हे तर त्यांच्या संगीत परिवारात मिसळून गेलो. 

संगीतनिष्ठा म्हणजे काय हे मला प्रदीपजींकडे गेल्यावर समजलं. दिवसाचे अक्षरशः चोवीस तास संगीत हा विषय डोक्यात असणारा हा कलावंत मनापासून रमतो आपल्या संगीत परिवारात. सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास लागलेल्या या व्यक्तीला, त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी काही काळ जावा लागतो.  दहिसरस्थित प्रदीप धोंड हे एक संवेदनशील संगीतकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.  संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्यांनी सन्मानित झालेल्या प्रदीपजीना नामवंत गुरूंचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. अथक रियाजाबरोबर गोड आणि सुश्राव्य गळ्याची देणगी लाभलेल्या प्रदीपजींची ख्याल गायकी रागांची नेमकी बांधणी स्पष्ट करत अप्रतिम सौंदर्याचं रूप घेऊन रसिकांसमोर येते. परंतु प्रदीपजींचं वेगळेपण मला जाणवलं ते त्यांच्या संगीत परिवारातील सहकारी, शिष्यांना पुढे घेऊन जाण्याच्या विचारामुळे.  त्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. व्यासपीठावर येताना काही वेगळ्या संकल्पनेसहं त्यांनी रसिकांसमोर यावं या विचारातून ते अनेक संगीत कार्यक्रमांची बांधणी करत असतात. 'साद निसर्गा' या निसर्गाचे विविध भाव दाखवणारा तसच संहितेमधून पर्यावरणासारखा महत्त्वाचा विषय मांडणारा संगीत कार्यक्रम आठ ते सोळा वयोगटातील बाल कलाकारांना घेऊन त्यांनी सादर केला. विविध प्रचलित मराठी निसर्गगीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला मुंबईत रसिकांचा सुंदर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'साद विधात्या' या कार्यक्रमातून प्रतिभावान कवींची अप्रचलित गीतं जी प्रदीपजींच्या संगीत प्रतिभेने सजली होती अशा भाव, भक्तीगीतांना एका संकल्पनेत गुंफून हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी  रसिकांसमोर आणला.  अप्रचलित गीतं असल्यामुळे हे एक धाडसच होतं. पण प्रदीपजी निश्चिंत होते.  रसिकांनी या ही कार्यक्रमाला मनापासून उपस्थिती आणि दाद दिली.  या दोन्ही कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि निवेदन करण्याचं भाग्य मला मिळालं.  प्रदीपजींनी संगीतबद्ध केलेल्या अनेक ध्वनिफिती प्रसिद्ध कंपन्यांनी प्रदर्शित केल्या आहेत. 

परंतु या साऱ्याचा मुकुटमणी शोभावा असा प्रदीपजींच्या संगीत आणि गान प्रतिभेची साक्ष देणारा एक कार्यक्रम गेली अनेक वर्ष मुंबईत आणि मुंबई बाहेरही अनेक ठिकाणी सादर होत आहे , 'गीतगीतामृत '.  भगवद्गीतेचा गीतमय आविष्कार असा हा  संगीत कार्यक्रम पाहाणं आणि ऐकणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद आहे.  कॅनडास्थित कविवर्य ना.भा. दातार यांच्या 'गीतगीता' या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम अप्रतिम चपखल शब्दरचना, कर्णमधुर संगीत आणि अजोड सादरीकरण यामुळे रसिकांच्या मनावर कायमचा कोरला जातो यात तिळमात्र शंका नाही. तीन तास आपल्या भावपूर्ण आणि गोड गळ्यातून भगवद्गीतेसारखा थोडा क्लिष्ट विषय रसिकांसमोर सादर करताना प्रदीपजींच्या चेहऱ्यावर दिसणारा अलौकिक भाव मी निरखला आहे. या अप्रतिम कार्यक्रमासाठीही सुसंवादन करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. भावपूर्ण गायन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी संगीत साधकांना प्रदीपजींचा हा कार्यक्रम एक वस्तुपाठ आहे.

संगीत कलेकडे प्रदीपजीं पैसा मिळवण्याचं साधन म्हणून पाहत नाहीत.  कार्यक्रम उभे करताना स्वतः आर्थिक झीज सोसून इतर कलाकारांना मोबदला मिळावा म्हणून ते प्रयत्नशील असतात.

संगीत कलेला जीवन मानणाऱ्या प्रदीपजींना आपल्या परिवारातील सहकारी, शिष्यांना घेऊन गप्पांचे फड जमवण्याची, निसर्ग संनिध्यात फिरायला जाण्याची आणि खावैयेगिरी करण्याची मनापासून आवड आहे. प्रदीपजींचे गुरू चंद्रकांत पारकर यांनी स्थापन केलेली स्वरसाधना विद्यालय ही संस्था १९९१ सालापासून अगदी आजपर्यंत साधकांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची संथा देत यशस्वीपणे उभी आहे.

कोकणातल्या कुडाळमधील पिंगुळी या आपल्या जन्मगावाचं नाव आपल्या संगीत क्षेत्रातील कर्तृत्वाने लोकप्रिय करत प्रदीपजींची वाटचाल आजही सुरूच आहे.

त्यांच्या या वाटचालीत मला सामील होता आलं हेच माझं भाग्य.

 

प्रसाद कुळकर्णी.

No comment

Leave a Response