नाटक हा तसं आपल्या जिव्हाळ्याचा विषय! सध्या मराठी नाटके सुद्धा अफलातून येत आहेत. यातीलच एक म्हणजे संगीत नाटक म्हणजेच देवबाभळी! या नाटकाविषयी आपले मत व्यक्त केले आहे यशराज आचरेकर यांनी!
#देवबाभळी
निशब्द म्हणणार नाही कारण मग मला लिहिता येणार नाही.पण प्रतिक्रिया द्यायची म्हणाल तर मंत्रमुग्ध करणारं नाटक.
दोन तास एका जागी खिळवून ठेवणारं संगीत नाटक म्हणजे "देवबाभळी".
संगीत नाटक बघायची माझी पहिलीच वेळ. कॉमेडी नाटकामध्ये जागोजागी पेरलेले की घुसवलेले विनोद नाही की रहस्य नाटकांसारखा डोक्याला क्षणोक्षणी पुढे काय घडणार याचा ताण नाही. नुसतं सुरेल संगीत आणि सोबत तेवढ्याच ताकदीचा अभिनय.
मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते हे एवढं मोठं आव्हान लीलया पेलतात. मानसी ने साकारलेली लखुबाई (रखुमाई) आणि शुभांगी ने साकारलेली आवली नाटक संपूनही डोळ्यासमोरून हलत नाहीत. काही नाटकांच्या बाबतीत म्हंटलं जातं ना ही भूमिका दुसरा नट -नटी एवढया ताकदीने साकारुच शकत नाही असंच पदोपदी जाणवत राहतं.
सामान्य रसिक म्हणून मला काही भावलेल्या काही गोष्टी. विंगेपासून दुसऱ्याच ओळीत बसलेलो असल्यामुळे कलावंताचा अभिनय आणि नाटकाचं नेपथ्य जवळून अनुभवता आलं.
#संगीत : आता संगीत नाटक म्हंटलं तर याचं संगीत सुरेख च याबाबत कोणीही वेगळं मत मांडू शकणार नाही. जोडीला दोन सुरेल गळ्यांची साथ.
वाह क्या बात!!
एकीकडे मानसी चा खोलवर भिडणारा भारदस्त आवाज आणि दुसरीकडे शुभांगी चा नाजूक पण काळजाचा ठाव घेणारा आवाज. तुलना होणं शक्यच नाही.
आनंद भाटेंनी गायलेले तुकारामांचे अभंग पण अविस्मरणीय.
#नेपथ्य : ही नाटकाची अजून एक जमेची बाजू.
प्रकाशयोजना उत्तमच. मग विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रकाश असो किंवा इंद्रायणीच्या पाण्याचा भास किंवा फक्त चुलीवरचा धूर असो.
#वेशभूषा : यासाठी तळटीप वाचावी.
#विठ्ठल : सर्वात महत्वाचं पात्र. तो पात्राच्या रूपाने कुठे दिसत नसला तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण रंगमंच निर्विवाद व्यापून राहतो.
तळटीप : नाटक संपल्यावर कायरा ला घेऊन बॅकस्टेज ला मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते ला भेटायला गेलो पण तोपर्यंत त्या चेंजिंग रूम मध्ये पोहोचलेल्या.
पाच-सात मिनिटांमध्ये बाहेर आल्यावर कायरा ला भेटल्या.
त्यांना भेटल्यावर आधी आवली आणि रखुमाई ला भेटायचं म्हणणारी ही चिमणी त्यांच्या समोरच मला म्हणते त्यांना मला खरोखरचं भेटायचंय. त्या दोघींनी हे ऐकल्यावर " जा बघ जरा तिकडे स्टेज वर दिसतायेत का" असं गोड उत्तर दिलं.
No comment