Primary tabs

एम्प्टी युअर कप....

share on:

राजाराम घाटपांडेंचं एकत्र कुटुंब गेली अनेक वर्ष शांततेत नांदत होतं. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूनंतर घरात शेती, संपत्ती, वाटण्या यांच्यावरून वाद विकोपाला गेले.

नामांकित घराण्यामधील ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी कुणीतरी पुढाकार घेऊन नियंत्रणात आणायची गरज होती . अशा वेळी सिंधूताईंनी मुलांना, सुनांना, तरुण नातवंडांना एकत्र बसवून सांगितलं की, तुमच्या मनात एकमेकांबद्दल असलेले गैरसमज, राग ही असुरक्षितता आहे. त्याने तुमची मनं पूर्ण भरून गेलेली आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमची मनं या चुकीच्या विचारांतून रिकामी करणार नाही; तोपर्यंत तुम्ही नवीन कुठल्याही म्हणण्याचा स्वीकार करू शकणार नाही, हे कळतंय का तुम्हाला? एखाद्या भांड्यात जर मी पाणी भरून ठेवलं असेल तर जोपर्यंत ते पाणी मी ओतणार नाही तोपर्यंत त्यात नवं काही भरता येणार नाही. 

आईचं बोलणं ऐकल्यावर मुलांना हे लक्षात आलं की आईच्या मनातील गोष्टी तोपर्यंत समजून घेता येणार नाहीत जोपर्यंत आपण, आपल्या मनातल्या भावना, त्यातली किल्मिषं दूर करणार नाही. सुनंदाताई आणि त्यांची सून वैशाली या दोघीतून विस्तव जात नव्हता. दोघींची मनं एकमेकींबद्दलच्या द्वेषाने भरून गेल्याने त्यांच्यात मध्यस्थी करणं कठीण होऊन बसलं होतं. 

त्यांचा मुलगा नोकरीवरून घरी आल्यावर दोघींची रोजची गाऱ्हाणी, कटकटी ऐकून अक्षरशः वैतागून जायचा. त्यांची मनं मोकळी झाल्याशिवाय नवीन समजुतीचे शब्द त्यांना पटणारच नाहीत कारण त्यांची मनस्थिती काही स्वीकारण्याची नव्हती. समुपदेशनासाठी जेव्हा त्या दोघी आल्या तेव्हा एकमेकींबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन, विचार घेऊनच आल्या होत्या पण मग त्यांना एम्प्टी युअर कपचा सिद्धांत सांगावा लागला.

माणसांची मनं आनंद, उत्साह, समाधानाने भरून गेली की इतरांमध्ये याच भावनेचा प्रवाह त्यांना पोहोचवता येतो; पण एखाद्या माणसाबद्दलचं आपलं मन कलुषित झालं असेल तर मनं स्वच्छ करण्यासाठी आधी त्यावरची काजळी पुसायला हवी. मन मोकळं असणं ही एक सुरुवात आहे. रोजच्या जीवनात आपण विविध प्रसंगांना सामोरं जातो. निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्तींबरोबर काम करताना, वावरताना, एकत्र राहताना मतभेद होतात, विचारात संघर्ष होतो; पण जोपर्यंत दुसऱ्या गोष्टींबद्दल, व्यक्ती, वस्तू, प्राणी स्थान प्रसंगाबद्दल असणारे गैरसमज, भावना, विचार आपण मनातून बाहेर काढून ठेवायला तयार होत नाही तोपर्यंत दृष्टी, नव्या गोष्टी स्वीकारणार कसे?

दुसऱ्याचं मत, त्याचं म्हणणं समजून घेण्यासाठी आधी आपल्याला स्वतःचा कप रिकामा करायला हवा. काही ठराविक साचेबंद कल्पना, ज्या आपण मनात पक्या, घट्ट रुजवून ठेवल्या असतात त्या सोडल्या तरच आपण दुसऱ्या कल्पना ऐकू शकू, त्यावर विचार करू शकू. त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू म्हणून त्यासाठी न्यूट्रल राहता यायला हवे. आपल्या पूर्वग्रहांचा, दूषित विचारांचा हा कप रिकामा केल्याने नवनवीन गोष्टी शिकता येतील. जुन्या गोष्टी सोडल्याशिवाय, त्या काढून टाकल्याशिवाय हे कसे जमावे?

थोडं थांबलात, नीट निरीक्षण केलंत, समोरच्याचं ऐकून घेतलंत आणि मुख्य म्हणजे नावं नं ठेवता, आरोप न करता, शिक्के न मारता वागलात तर मतभेद होतील पण मनभेद नाहीत. बुद्धिमत्तेचा प्रकाश दिसण्यासाठी मनातला चुकीच्या विचारांचा अंधार पहिल्यांदा दूर करायला हवा. मनं भरलेली असली तर रिकामी व्हावी. नुसतंच आपलं म्हणणं रेटत राहिलात तर ते केवळ बोलणं होतं पण दुसऱ्याचं ऐकून घेतलं तर नक्कीच नवं काही शिकता येतं.

 सत्य पाहण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी मनाचा कप रिता करायला हवा. तोंड उघडण्यापूर्वी मन उघडायला हवं. आयुष्याकडे बघण्याचा एक टिपिकल दृष्टिकोन आपण मनाशी घट्ट बांधून ठेवला असतो तो सैल करायला हवा कारण तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी नवं काही शिकणं बाकी असतंच. जेव्हा जुन्या विचारांना कवटाळून न बसता नवीन, वेगळे दृष्टिकोन स्वीकारण्याची मनाची तयारी आपण दाखवू, तेव्हा आपला कपही पूर्णपणे वैविध्यपूर्ण गोष्टींनी भरून जाईल आणि आपण जगाला नवं, जादुई असं काही देऊ शकू म्हणूनच असं म्हणतात की

‘Empty your cup of misery and self-pity. Fill it instead with gratitude.”

डॉ स्वाती गानू टोकेकर

No comment

Leave a Response