Primary tabs

पर्रिकर, तुम्ही फार लवकर गेलात .......

share on:

मनोहर पर्रिकर यांचा आज पहिला स्मृतिदिन! त्यांच्याबद्दलच्या अनंत आठवणी आहेत. अशीच एक आठवण सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण विश्लेषक नितीन गोखले !

मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना त्यांच्याबरोबर संरक्षण विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांची अचानक मैत्री झाली. केंद्रीय मंत्री झाल्यावर पर्रिकरांनी स्वत:च्या फोनवरून गोखले यांना थेट फोन केला. कोणी पीए वगैरे मध्ये न ठेवता आणि सरळ त्यांना निवासस्थानी बोलावले. त्यानंतरच्या दोन वर्षांत पर्रिकर त्यांना बोलावत राहिले आणि संरक्षण विषयातील अनेक गोष्टींवर चर्चा करत राहिले. या अकृत्रिम मैत्रीबद्दल गोखले यांनी व्यक्त केलेल्या भावना..

पर्रिकरांचा आणि माझा संवाद एका गैरसमजातून सुरू झाला. जानेवारी २०१५ मध्ये मी बडोद्याला गेलो होतो. त्या वेळी माझा मोबाइल वाजला. मोबाइलच्या स्क्रीनवर नंबर झळकला नाही. मला वाटले, परदेशातल्या माझ्या एका मित्राचा फोन असेल. कारण त्याचा नंबरही मोबाइलच्या स्क्रीनवर दिसत नसे. पलीकडून मित्रच बोलत असेल या अपेक्षेने मी बोलायला सुरुवात केली. मला मित्राकडून त्याच पध्दतीने प्रतिसाद मिळेल या अपेक्षेत मी होतो. मात्र पलीकडून ''मी मनोहर बोलतोय'' असा आवाज आला. अपरिचित नाव आणि आवाज ऐकल्याने मी काहीशा उध्दटपणे म्हणालो, ''कोण मनोहर?''

पलीकडून आवाज आला, ''पर्रिकर.''

मला क्षणभर काहीच कळले नाही. समोरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर बोलत आहेत ही गोष्ट माझ्या मेंदूत शिरायला थोडा वेळ लागला. कारण देशाचा संरक्षण मंत्री आपल्या मोबाइलवरून माझ्याशी संपर्क साधेल, अशी कल्पनाच मी कधी केली नव्हती. एखादा मंत्री माझ्यासारख्या पत्रकार विश्लेषकाशी संपर्क साधायचा असेल, तर आपल्या स्वीय सचिवाला किंवा साहाय्यकाला सांगेल. पण इथे तसे नव्हते. त्यामुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून बाहेर यायला मला थोडा वेळ लागणे क्रमप्राप्त होते. मी ''कोण मनोहर?'' या माझ्या काहीशा उध्दट विचारणेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

''क्षमा कशाला मागताय? आपण एकमेकांशी या पूर्वी कधीच बोललेलो नाहीत आणि माझा नंबर मोबाइलच्या स्क्रीनवर दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला कसे कळणार कोण बोलतंय ते?'' पर्रिकर उत्तरले.

''मला तुम्हाला भेटायचे आहे.'' आणखी पाल्हाळ न लावता पर्रिकरांनी थेट मुद्दयाला हात घातला. मी बडोद्याहून परतल्यानंतर दिल्लीत भेटायचे ठरले. भेटीपूर्वी मी कोणाशी संपर्क साधू असे विचारल्यावर पर्रिकरांनी मला त्यांचा मोबाइल क्रमांक लिहून घ्यायला सांगितले. ''मलाच थेट फोन कर'' असे सांगत त्यांनी फोन ठेवून दिला.

देशाचा संरक्षण मंत्री आपल्याला भेटू इच्छितो आहे, या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो. खरे तर मी त्या वेळी 'एनडीटीव्ही'तून बाहेर पडलो होतो. त्या क्षणी मी पत्रकारितेतील संपादक अथवा तत्सम मोठया, महत्त्वाच्या पदावर नव्हतो. असे असताना पर्रिकरांनी माझ्याशी स्वत: संपर्क साधून भेटण्याची इच्छा व्यक्त करणे ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट होती. पर्रिकरांनी आपण का भेटायचे आहे याचे कारण सांगितले नव्हते. त्यामुळे त्यांना मला का भेटायचे असेल या संदर्भातील सर्व शक्यतांचा पुढील दोन दिवस मी विचार करीत होतो. त्यांना भेटायला जाण्यापूर्वी संरक्षण खात्याबाबतच्या माझ्या सूचना टिपण स्वरूपात तयार केल्या. त्या वेळी पर्रिकरांना अधिकृत निवासस्थान मिळायचे होते. त्यामुळे ते कोटा हाउस येथे राहत होते.  

 ठरल्याप्रमाणे मी पर्रिकरांना भेटायला गेलो. पर्रिकर हे त्यांच्या हाफ शर्ट आणि पॅण्ट या नेहमीच्या वेषात होते. मी त्यांच्या साध्या जीवनशैलीबद्दल बरेच काही ऐकले होते. त्याप्रमाणेच ते अत्यंत साधे, निगर्वी आहेत, हे मला लगेच जाणवले. आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता त्यांनी माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. खरे तर एनडीटीव्हीचे त्या वेळचे मुंबई ब्युरो चीफ तेजस मेहता यांनी पर्रिकर हे संरक्षण मंत्री झाल्यावर पर्रिकरांना एकदा भेटून ये, असे मला आवर्जून सांगितले होते. त्या वेळी मी पत्रकारितेतून बाहेर पडण्याचे ठरविले होते. असे असताना आपण पर्रिकरांना कशाला भेटायचे, असा विचार करत मी त्यांची भेट घेणे टाळले होते. मी संरक्षण खात्याबाबत तयार केलेले सूचनावजा टिपण पर्रिकरांना दिले. त्यांनी लगेचच त्यावर नजर टाकली.

''चांगल्या सूचना आहेत. यापैकी काहींवर मी कामही सुरू केले आहे.'' असे सांगत त्यांनी मला एका प्रश्नाने गोंधळात टाकले. ''संरक्षण खात्याचा कारभार हा अविश्वासाच्या भावनेवर चालतो आहे, असे मला जाणवते आहे. असे का व्हावे हे मला सांगू शकशील?'' या त्यांच्या थेट विचारणेने मी गोंधळात पडलो. ''तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?'' मी.

''या खात्याचा मंत्री होऊन मला दोन-तीन महिने झाले. पण मी पाहतो आहे, इथे प्रत्येक जण एकमेकाकडे संशयाने, अविश्वासाने पाहतो आहे, आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो आहे, असे मला सतत जाणवते आहे. कामकाजात कसलीही सुसूत्रता नाही. काहीही विचारले तर नन्नाचा पाढा लावला जातोय. मला यावर काही तरी तोडगा सुचवा.'' पर्रिकर अतिशय उद्वेगाने सांगत होते.

या खात्याचा कार्यभार स्वीकारून पर्रिकरांना काही महिनेच झाले होते. त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा पूर्वानुभवही नव्हता. पण एवढया छोटया अवधीत त्यांनी आपल्या खात्यातील नेमक्या त्रुटींवर, दोषांवर बोट ठेवले होते. त्यावरूनच मला त्यांची आकलनशक्ती किती जबरदस्त आहे याची चुणूक दिसली.

''संरक्षण मंत्रालयात हे वातावरण अनेक वर्षांपासून आहे'' असे मी सांगितल्यावर त्यांचा चेहरा काहीसा विचारमग्न झाला. ''यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. सर्वांना एकत्र बोलावून त्यांच्याशी बोलतो आणि तुमच्याशीही चर्चा करतो'' असे म्हणत पर्रिकरांनी मला मासे खायला चलण्याचा इशारा केला. पर्रिकरांना मासे किती आवडतात, याचे मला त्या वेळी दर्शन झाले. त्याच वेळी ते आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत आत्मीयतेने वागतात हेही दिसले. उपेंद्र जोशी आणि मयुरेश खानवटे या त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी आमच्याचबरोबर जेवायला बसविले. संरक्षण मंत्रिपद भूषविणारी व्यक्ती आपल्या कर्मचाऱ्यांशी इतक्या प्रेमाने वागते, ही माझ्या दृष्टीने नवलाईचीच गोष्ट होती. त्यानंतर आम्ही वारंवार भेटत राहिलो. प्रत्येक वेळी त्यांनीच माझ्याशी संपर्क साधला. सकाळी लवकर त्यांचा दूरध्वनी यायचा. माझ्याकडून कोणती माहिती मिळते हे ऐकण्यासाठी त्यांचा चेहरा आतुर झालेला दिसायचा. मला जेवढे संरक्षण खात्याविषयी अल्प स्वल्प ज्ञान होते, त्या आधारे मी त्यांना माहिती देत असे.

एके दिवशी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी प्रक्रियेत बदल करण्याचा विचार मांडला. ही प्रक्रिया बदलण्यासाठी आवश्यक असलेली माहिती कोण देऊ शकेल, याची विचारणाही त्यांनी केली. मी त्यांना सहा-सात जणांची नावे सुचविली. त्यांनी त्यापैकी चार जणांची समिती बनविली. याच समितीने २०१६ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या नव्या खरेदी प्रक्रियेचा मसुदा तयार केला. खरेदी प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी, आधीच्या पध्दतीतील क्लिष्टपणा त्यात नसावा हा पर्रिकरांचा हेतू होता. नव्या पध्दतीत क्रांतिकारक म्हणाव्या अशा अनेक कल्पना होत्या. नव्या खरेदी प्रक्रियेला संरक्षण खात्यातील प्रस्थापित मंडळींकडून झालेला विरोध पर्रिकरांनी मोडून काढला. संरक्षण मंत्रालयाच्या खरेदीत त्यांनी स्वदेशी उत्पादनांचा नवा विभाग तयार केला. भारतात बनविलेल्या स्वदेशी आयुधांना व अन्य साहित्याला खरेदीत प्राधान्य दिलेच पाहिजे असा पर्रिकरांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहामुळे तयार झालेल्या नव्या खरेदी प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली, हे मी आवर्जून सांगू इच्छितो.

काही दिवसांनी मी १० , अकबर रोड या त्यांच्या निवासस्थानी जायला लागलो. सकाळी अगदी लवकर, म्हणजे 7 वाजता किंवा रात्री उशिरा, म्हणजे १०  वाजल्यानंतर मी त्यांना भेटायला जात असे. प्रत्येक वेळी ते नव्या कल्पना मांडत असत. संरक्षण मंत्रालयातील प्रस्थापित व्यवस्थेकडून आणल्या जाणाऱ्या अडथळयांमुळे होणारी चिडचिड त्यांना अस्वस्थ करून टाकत असे.

२०१५ च्या मध्यात, म्हणजे मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सात-आठ महिन्यांतच संरक्षण मंत्रालयाच्या व्यवस्थेत कोणकोणत्या सुधारणा करायला हव्यात याचा अंदाज त्यांना आला होता. त्याप्रमाणे त्यांनी निर्धाराने निर्णय घेण्यास सुरुवातही केली होती. दिल्लीच्या हुजरेगिरी संस्कृतीचा त्यांना मनापासून तिटकारा होता. अशा मंडळींपासून ते कटाक्षाने दूर राहत असत. दिल्लीतील त्यांच्या बंगल्यात संरक्षण खात्यातील दलाल, मध्यस्थ सोडून सर्वांना मुक्त प्रवेश होता. पर्रिकर मला वारंवार चर्चेसाठी बोलावतात ही गोष्ट दिल्लीत लगेच पसरली. त्यामुळे मला खूपच सावध राहावे लागत होते. माझ्या पर्रिकरांशी असलेल्या जवळिकीचा वापर करण्याची काही मंडळींची इच्छा असे. अशा १४-१५ जणांचे दूरध्वनी क्रमांक मी तातडीने ब्लॉक करून टाकले. कोणाकोणाला ब्लॉक केले आहे याची माहिती मी पर्रिकरांना दिली. त्यावर त्यांनी ''चांगले केलेस'' अशी प्रतिक्रिया दिली.

संरक्षण मंत्रालयाविषयी त्यांना असणारे जबरदस्त ज्ञान, माहिती याचा प्रत्यय मला अनेकदा येत गेला. नोव्हेंबर २०१५ मध्ये मी 'भारतशक्ती.इन' नावाचे पोर्टल चालू केले. या पोर्टलसाठी पर्रिकरांची दीर्घ मुलाखत घेण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी पर्रिकरांनी दोन-तीन तासांचा वेळ सलग देणे आवश्यक होते. मात्र काही केल्या त्यांना वेळ द्यायला जमत नव्हते. माझी डेडलाइन जवळ येत चालल्याने मी त्यांच्या मागे लागलो होतो. त्यावर त्यांनी मला त्यांच्याबरोबर गोव्याला येण्यास सांगितले. त्यानुसार एके दिवशी मी गोव्याला गेलो. सलग दोन तास आम्ही बोलत होतो. या मुलाखतीचे वैशिष्टय म्हणजे त्या वेळी पर्रिकरांनी उत्तरे देताना कागदाचा एखादा चिठोराही हातात घेतला नव्हता. त्यांची स्मरणशक्ती किती विलक्षण होती, याचा अनुभव त्या वेळी मी घेतला.

पर्रिकरांना वाचनाचे प्रचंड वेड होते. पुस्तक हातात घेतल्यावर अधाशासारखे संपवून टाकत असत. त्यांच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी माझ्या हातात Victory On the Potomac नावाचे पुस्तक ठेवले आणि म्हणाले, ''हे पुस्तक वाच आणि आपल्या इथे काय सुधारणा करता येतील का हे मला सांग.'' अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाच्या गोल्डवॉटर निकोलस ऍक्ट या गाजलेल्या कायद्याविषयीचे ते पुस्तक होते. पेंटागॉनमधील अंतस्थ वर्तुळातील व्यक्तीने ते पुस्तक लिहिले होते. काही दिवसांनी त्यांनी रॉबर्ट ग्रीन यांचे 33 Strategies Of War नावाचे पुस्तक मला दिले. ही दोन्ही पुस्तके अजूनही माझ्याकडे आहेत. दिल्ली सोडताना त्यांनी आपल्या बंगल्यातील सगळी पुस्तके गोवा सदनमध्ये नेली. त्यातील आवडतील ती पुस्तके घेऊन जा, असे मला सांगितले. मी त्यातील ६०-६५  पुस्तके घरी नेली आहेत. ही पुस्तके वाचताना मला कायम पर्रिकरांची आठवण येत राहील.

त्यांचा स्वभाव अतिशय मोकळाढाकळा होता. दिल्लीत असताना त्यांना गोव्याची सारखी आठवण येत असे. कधीतरी अचानक त्यांचा फोन येत असे आणि ''तुझ्या पत्नीला फिश करी राईस बनवायला सांग'' अशी प्रेमळ आज्ञा सुटत असे. घरी आल्यावर ते अत्यंत मोकळेपणे आणि आत्मीयतेने आमच्या कुटुंबात मिसळून जात असत. भारतासारख्या देशाचे आपण संरक्षण मंत्री आहोत हे विसरून जाऊन ते आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी भरभरून बोलत असत. वागण्याबोलण्यात कुठेही कृत्रिमता नसे. त्यामुळेच पर्रिकर हे माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग केव्हा बनले, हे कळलेच नाही. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी ते अशाच पध्दतीने वागत असत. मला आज थोरला भाऊ गमावल्यासारखी भावना आहे. त्यांचे आयुष्य माझ्यासाठी नव्हे, तर सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आयुष्यात तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे पाय जमिनीवर ठेवा, अशी शिकवण त्यांनी आपल्या वर्तनातून दिली. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. कारण अशी माणसे देशाला वारंवार मिळत नसतात.

पर्रिकर, तुम्ही फार लवकर गेलात एवढेच मी या क्षणी म्हणू शकतो.

***नितीन गोखले***

(नितीन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षण विश्लेषक आहेत.)

अनुवाद : चंद्रहास मिरासदार

 

No comment

Leave a Response