Primary tabs

सखे शिकव त्याला ...

share on:

प्रत्येक स्त्रीने करावी अशी एक गोष्ट कवितेतून सांगत आहेत ज्योत्स्ना चांदगुडे! चला वाचूया!

 

सखे शिकव त्याला घरकाम करायला

किमान पाटपाणी घ्यायला

कधी चहा करायला

तर कधी छोटा नाष्टा करायला

कधी मधी कुकरही लावायला

अन् हे ही शिकव त्याला

कोणतंही काम लहान नाही अगदी घरकामही

एवढ्यानं तो लहान  होत नाही आणि बायल्याही

शिकव त्याला सहनशील बनायला

सखे शिकव त्याला घरकाम करायला

 

शिकव त्याला प्रत्येक स्त्री चा सन्मान करायला

नऊ महिने पोटात वाढवून जन्म देणाऱ्या त्या 

 स्त्री शक्तीचा आदर करायला  

 हाच खरा पुरुषार्थ म्हणून शिकव त्याला

 प्रत्येक स्त्री चं रक्षण करायला

सखे शिकव त्याला सन्मान करायला

 

सखे शिकव त्याला

मागताक्षणी कोणतीही गोष्ट न देता समजूतदार बनायला

शिकव त्याला नकार पचवायला

रात्री बेरात्री घराबाहेर न फिरायला

लवकरात लवकर घरी यायला 

सखे शिकव त्याला नकार पचवायला .

 

सखे तुझाच दृष्टिकोन हवाय आता विस्तारायला

समानतेचं शिक्षण हवंय प्रथम त्याला द्यायला

तुझ्या घराला हवंय तूच आता सावरायला

सखे शिकव त्याला चांगला नागरिक बनायला

 

सखे  शिकव त्याला ....

-ज्योत्स्ना चांदगुडे

No comment

Leave a Response