Primary tabs

माझी परदेशवारी भाग ८

share on:

 

लायडन वारी झाल्यानंतर भ्रमंतीचा सिलसिला जरासा खंडीतच झाला होता. कारण अभय मुंबईला परत गेला आणि अनुश्रीला ऑफिस, त्यामुळे शनिवार , रविवार हा आठवड्याचा शेवट वगळता भटकंतीचा नो चान्स. असे दोन आठवडे गेल्यानंतर हेग शहरातील मुख्य आकर्षण मदुरोडाम इथे जायचे ठरवले. मुंबईची आठवण होईल इतका कडक उन्हाळा असताना देखील आमचा जायचा निर्धार पक्का होता. इथल्या गोऱ्याना उन्हाचं लैच आकर्षण बघा. त्यामुळे सगळ्यांची धाव बीचकडे सन बाथ घ्यायला. आमची पहिली बस बीचला जाणारी असल्याने तुडुंब भरलेली. चक्क ष्टांडिंग जावं लागलं. बस भर आणि बाहेर रस्त्यावर माणसं मजेत होती. अंगावर कपडे कमी पण मनात फेसळणारा उत्साह वारेमाप. त्याची थोडीशी लागण झाली आम्हाला. रस्त्यांवर सायकलींचे तांडे निघालेले. पुरुष बहुतांशी उघडे आणि बायका शक्य तितक्या कमी कपड्यात सायकली हाणत निघालेल्या.

आम्ही वाटेत उतरून मदुरोडामला जाणाऱ्या बसमध्ये बसलो.

हेग शहराच्या Scheveningen district मध्ये वसलेलं हे मिनिएचर पार्क, जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गोलाकार वसवलेल्या ह्या उद्यानात संपूर्ण नेदेरलँड्समधल्या विविध इमारती आणि ठिकाणं यांच्या लघु स्वरूपातील प्रतिकृती केलेल्या आहेत. हे एक युद्ध स्मारक (war memorial) आहे यावर विश्वास बसू नये इतकं उत्साही आणि उत्फुल्ल वातावरण इथे असतं. हे उद्यान George Maduro नावाच्या कायदा शाखेच्या विद्यार्थ्यावरून देण्यात आलं आहे. तो नाझी लष्कराशी लढताना १९४५ साली शहीद झाला.१९४६ मध्ये त्याचा सर्वोच्च लष्करी सन्मान देऊन मरणोत्तर गौरव करण्यात आला. त्याच्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार त्याचं हे अनोखे स्मारक, नेदेरलँड्सच्या राणीच्या मदतीने उभारण्यात आले.

उद्यानात प्रवेशासाठी अर्थातच तिकीट काढावे लागते. त्यासोबत तुम्हाला एक मार्गदर्शक पुस्तिका आणि चिप कार्ड देतात. ह्या उद्यानातील मिनिएचर प्रामुख्याने तीन प्रकारची आहेत

१) पाणी( शत्रू आणि मित्र)

२) ऐतिहासिक शहरे

३) जागतिक महत्त्वाची शहरे.

अगदी सुरुवातीला एका छोट्या प्रेक्षागृहात George Maduro याच्या जीवनावर एक दृक्श्राव्य माहितीपट दाखवतात. त्यापुढे आपण मूळ उद्यानात प्रवेश करतो.

एकाच्या आत एक अशा पद्धतीने गोलाकार रचनेत नेदेरलँड्समधील सर्व प्रमुख ठिकाणांच्या प्रतिकृती मांडल्या आहेत. १:२५ इतक्यापर्यंत कमी आकारमान ठेवून त्या तयार केलेल्या आहेत. सभोवती आणि उद्यानात मध्ये मध्ये देखील सुंदर सुंदर फुलांचे ताटवे मन मोहून घेत होते. एकूणच युरोपात फुलांचं वेड जरा जास्तच वाटलं मला आणि पटलंसुद्धा कारण मी पण फुलांसाठी वेडी आहे. इतक्या वेगवेगळ्या इमारतींच्या प्रतिकृती आहेत इथे अगदी त्यांच्या नावानिशी मांडलेल्या. त्यामुळे काय आधी बघू, काही राहून तर जाणार नाही असं सारखं वाटत होतं. इमारतींच्या आजूबाजूची माणसं पण अगदी खरी वाटावी अशी. आपण नाणं टाकलं तर काही ठिकाणी उदा., चर्चच्या आवारात मिरवणुकीचे चलतचित्र देखील होते. ह्या माणसांचे पेहराव देखील ऋतूमानाप्रमाणे बदलले जातात म्हणे. ऐकावं ते नवलच!

अमस्टर्डनच्या सचिफोल विमानतळाच्या इथे तर विमाने अगदी हळूहळू चालताना दिसत होती. तसंच ट्रेन स्टेशनचं पण होतं. इथे इंटरसिटी नावाची ट्रेन पूर्ण नेदेरलँड्समध्ये धावते. तिचं चालतं फिरत मॉडेल इतकं आकर्षक आहे लहान मुलासारखं मी पण किती तरी वेळा तिची ये जा पाहिली (अगदी टाळ्या पिटल्या नाहीत इतकंच). त्या ट्रेनचा व्हीडिओ पण काढला. तसंचamusement park च्या मॉडेलचं पण. तिथली प्रत्येक राईड ठराविक अंतराने सुरू व्हायची. सगळंच नाविन्यपूर्ण. माझीच एवढी करमणूक होत होती तर आलेल्या लहान मुलांचं काय होत असेल. नेदेरलँड्सची प्रसिद्ध चर्चेस, थिएटर्स, ऑपेरा हाऊसेस, महत्त्वाची कार्यालये, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस ह्या सगळ्याची मिनिएचर्स तिथे आहेत. सुप्रसिद्ध ट्युलिप गार्डन ही अर्थात आहेच. त्यामुळे ह्या वेळी कुकनहॉफला जाता आलं नसलं तरी दुधाची तहान ताकावर भागवता आली.

बंदरे, कॅनॉल, त्या मधून ये जा करणारी जहाजे, बोटी असा सुंदर नजारा होता. पाण्याची पातळी वाढली तर त्याचं नियंत्रण कसं केलं जातं हे पण दाखवलं जातं. बिअर प्रेमींची लाडकी हनिकेन (Heineken)ची

फॅक्टरी पण होतीच. इतकी सुंदर आणि नेटकी मांडणी केली आहे की मन मोहून जातं. रणरणत्या उन्हात सुद्धा फिरण्याचा आणि फोटो काढण्याचा उत्साह काही कमी झाला नाही. उद्यानाच्या सगळ्यात बाहेरच्या रिंगणात लाकडी बाक ठेवलेले आहेत फिरून दमलेल्यांसाठी. मध्यभागी आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक्सच्या गाड्या होत्याच. मीपण थंडगार ग्रीन टीचा आस्वाद घेतला. उद्यानात मध्ये मध्ये टी.व्ही. स्क्रीन्स ठेवलेले आहेत. त्यावर सुरुवातीला दिलेलं चिपकार्ड वापरलं की माहितीचे व्हिडिओ दाखवतात. तिकिटासाठी मोजलेल्या पैशांचा पुरेपूर मोबदला मिळतो इथे.

सगळं फिरून झाल्यावर स्मृती चिन्हाच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. तिथे अनुश्रीच्या आवडत्या मॅग्नेटची खरेदी झाली. ती जिथे जिथे गेली आहे त्या सर्व ठिकाणांची मॅग्नेट्स आहेत तिच्याकडे. खरेदीनंतर तिथल्याच उपहारगृहात पोटपूजा. अनुसाठी fish n chips आणि माझ्यासाठी mushroom spaghetti, जोडीला कपुचीनो.Desert साठी strawberry cheese cake अशी यथेच्छ खादाडी करून बाहेर पडलो.

बाहेर येताना ह्या उद्यानाच्या उत्तम देखभाली बद्दल विचार करत होते. १९५२ साली तयार झालेलं हे उद्यान आजही इतकं नीटनेटकं आहे. त्याची नियमित देखभाल केली जाते. मुळात इथल्या लोकांची शिस्त वाखाणण्याजोगी असल्याने सार्वजनिक ठिकाणांची हानी कमी प्रमाणात होत असावी. नेदेरलँड्समधील सर्वात लहान शहर असं म्हंटलं जात असलेल्या या उद्यानाच्या उत्पन्नाचा विनियोग विविध धर्मादाय संस्थांना मदत करण्यासाठी केला जातो. तरुणांसाठी कार्य करणाऱ्या संस्थाना प्रामुख्याने मदत दिली जाते.

इतकं अनोखे युद्ध स्मारक आणि त्याची तितकीच उत्तम रित्या केलेली जपणूक पाहून मन आनंदाने आणि आदराने भरून गेले

 

©डॉ वंदना कामत

No comment

Leave a Response