Primary tabs

सकारात्मक विचारांची गुढी!

share on:

गुढीपाडवा झाला - नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. थोडा विचार करा...तशी वर्षाची सुरुवात कधीच होत नसते.

वर्षाची सुरुवात आपणच माणसे करत असतो- एक विशिष्ट कालगणनेचे परिमाण ठरवून. त्यासाठी पूर्वी आपण विचारपूर्वक काही विशिष्ट निकष ठरविले आणि पुढे ते सर्वसंमतीने स्वीकारले गेले आणि पुढे कालांतराने ते रूढ झाले. त्याचे औचित्य कायम अबाधित ठेवण्याकरिता त्याच्याशी आपण काही पद्धती आणि रीती जोडून दिल्या. अशीच एक नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनुसरून धरलेली रीत म्हणजे संकल्प घेणे किंवा संकल्प करणे. कामाच्या व इतर व्यापामुळे त्या संकल्पाचा विसर पडू नये आणि नवीन वर्षाचे मंगल स्वागत करावे या दोन्ही गोष्टी या प्रसंगी एकत्र साधल्या जातात. तर संकल्प घेण्यास  ... तुमच्या ज्ञातभाषेमध्ये 'रेझोल्यूशन करण्यास' याहून अधिक चांगला दिवस नाही असे धरून चालू या. संकल्प हा शब्द रेझोल्युशनपेक्षा उचित व जोरदार आहे कारण बहुतेक रेझोल्युशन्स् ज्या दिवशी केले जातात ते त्या दिवसानंतर फार काळ टिकत नाहीत. पण संकल्प ही संकल्पनाच मुळात खोलवर रुजलेली असून या शब्दाला एक प्रकारचे पावित्र्य व दार्ढ्य (दृढता) जोडलेली आहे. संकल्प या शब्दाची व्युत्पत्ती सम् + क्लृप् या संस्कृत धातूपासून झाली आहे. सम् म्हणजे चांगले, उचित, सर्वतोपरि आणि क्लृप् म्हणजे साधणे, मिळविणे. सम् + क्लृप् म्हणजे निश्चय करणे, ठरविणे आणि मानस.  म्हणूनच या सुंदर आणि शुभदिनी आपण संकल्प करू या - "येत्या किमान २१ दिवसांकरिता (लॉकडाऊन संपेपर्यंत आणि तोवर संपेल या सकारात्मक भूमिकेतून), आपण कोणत्याही रूपाने कोरोना विषाणू संबंधित नकारात्मक विचार करणार नाही अथवा तत्संबंधी संदेश अग्रेषित करणार नाही (तसे हे सर्व, बातम्यांमधून आणि जालपुटावरून सर्वांना उपलब्ध आहेच), त्याविषयी भीती बाळगणार नाही पण काळजी घेऊ". भिणे आणि काळजी घेणे यात खूप अंतर आहे. संस्कृतमध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे -

तावद्भयाद्धि भेतव्यं यावद्भयमनागतम्।
आगतं तु भयं वीक्ष्य तदा कुर्याद्यथोचितम्॥

(तावत् भयात् हि भेतव्यं यावत् भयम् अनागतम्।
आगतं तु भयं वीक्ष्य तथा कुर्यात् यथा उचितम्॥

अर्थ- जोवर भय (भयाचे कारण) जवळ येत नाही तोवरच त्याची भीती असावी, पण भय आलेले पाहून ते ओळखून योग्य असेल ते करावे.

सध्याचा संदर्भ घेतला तर कोरोनाविषाणूचे भय तेवढ्यापुरतीच होते, जोवर त्याविषयी आपल्याला माहिती नव्हती. पण जेव्हा विषाणूमुळे लोकांना बाधा होऊ शकते हे कळले तेव्हापासून रोगापासून दूर राहाण्याकरिता, स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरिता योग्य ते उपाय करण्याची सुरुवात झाली. भय इथले संपत नाही असा विचार करून आपण स्वतःला भया समोर झोकून देत नाही!

सध्य परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरस महामारी आणि त्याचे येणाऱ्या काळामध्ये जीवनाच्या विविध आयामांवर होणारे दुष्परिणाम ही कदाचित प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारी गोष्ट आहे. त्या विषाणूने आपले मन पूर्णपणे ग्रासले आहे हे वेगळे सांगणे न लगे आणि असं असताना आयुष्य पुढे चालू राहील हेदेखील आपण सर्व जाणून आहोत. पण ते भविष्य कसे असेल हे देखील आपणच ठरवणार.

कसे बरे? अर्थात आपल्या विचारांने. आपले विचार आपल्या कृतीची दिशा ठरविणारे असतात. किंबहुना कृतीचे अमूर्त आणि पहिले मूर्त रूप हा विचार असतो. चांगल्या सकारात्मक विचारांमध्ये कुठल्याही प्रकारची साशंकता विषाचे काम करते. मुखामधून निघालेल्या एका नकारात्मक वाक्याचे अगणित परिणाम निकामी करण्याकरिता किमान १७ वेळा सकारात्मक वाक्य म्हणावी लागतात जर हे एक उदाहरण पाहिले तर त्या वाक्याच्या मुळाशी असलेल्या नकारात्मक विचाराचा परिणाम होऊ नये म्हणून किती पटीने सकारात्मक विचार करावे लागतील याचा फक्त अंदाज बांधताना अंगावर शहारे येतील. आणि सामान्य माणूस अगदी श्वास घेतो तसा अजाणतेपणी नकारात्मक विचार करित असतो. सकारात्मक विचार म्हणजे नाण्याची दुसरी बाजू न पाहणे हा मुळीच होत नाही. सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सारासार व परिपूर्ण विचार करून निर्णय घेणे ही देखील सकारात्मकता आहे. पण निर्णय झाल्यानंतर साशंक राहणे नकारात्मकतेकडे झुकणारे आहे. 'आपले विचार ज्यामध्ये गुंतले असतात त्यातंच आपले मन गुंतंत असते आणि तिथेच अडकते', 'जेथे लक्ष जाईल, तेच लक्ष्य होईल' या केवळ म्हणी न राहता यांचा आपण सतत अनुभव घेत असतो. विचारांच्या मुळाशी असलेले मन व कृतीच्या मुळाशी असलेली बुद्धी या दोहोंचे विश्लेषण भारतीय संस्कृतीमध्ये खूप खोलवर जाऊन केलेले आहे.

वैदिक काळापासून दृढ आणि खोलवर रुजलेली आपली संस्कृती आणि आपली परंपरा जी केवळ विज्ञानाधिष्ठित नाही तर दिक्कालातीत आहे ... आजच्या काळातदेखील संयुक्तिक आहे.  त्याशी जोडलेले राहण्याची संधी म्हणून आपण या परिस्थितीकडे पाहू या. ऋग्वेदामधील एक  प्रार्थना अशी आहे 'आ  नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:' म्हणजे 'सर्व बाजूंनी चांगले विचार येवोत'. आजदेखील आपण सर्वांनी हीच प्रार्थना करू या. आपण सकारात्मकतेने, चांगल्या आणि आनंदी विचारांने या वर्षाचे स्वागत करू या आणि हेच पुढे वर्षभर जगू या. 

चैत्र प्रतिपदेच्या या शुभदिनी आपण संकल्प करू या, "मी वर्षभराकरिता सकारात्मक विचारांची गुढी उभारली आहे. हे सकारात्मक विचार सदैव मानवकल्याणहेतूपर राहोत".

*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा *

   रुचिता (भवद्रुचि:।)

No comment

Leave a Response