कोण जाणे कुठे हरवली
माहीत नाही कुणी पळवली
मिळाली कुठे तर आणून द्या
नाहीतर आपलं राहून द्या
पूर्वी तिची शान होती
असोशी कुणाची, तिला नव्हती
लहान तिचा होता जीव
हृदयात सदैव होती सजीव
मिळाली कुठे तर आणून द्या
नाहीतर आपलं राहून द्या
रावांपासून रंकांपर्यंत
तिची होती तेव्हा वट
खादी कुर्त्या टोपीशीही
संपली नव्हती तिची घसट
मिळाली कुठे तर आणून द्या
नाहीतर आपलं राहून द्या
मनाला ती जागवत होती
भान ठेवून वागवत होती
दुखल्या खुपल्याला आधार होती
एकटेपणाचा शेजार होती
मिळाली कुठे तर आणून द्या
नाहीतर आपलं राहून द्या
तिच्यातला माणूस होता शिल्लक
माणसातही ती होती मुबलक
कोण जाणे काय झालं
रक्तातलं तिचं अस्तित्वच संपलं
आता कुठेच दिसत नाही
औषधालाही पाहायला मिळत नाही
वणवण वणवण खूप केली
पण कुठेच थांग लागतं नाही
मिळाली कुठे तर आणून द्या
नाहीतर आपलं राहून द्या.
- प्रसाद कुळकर्णी
No comment