Primary tabs

गप्पा

share on:

 

इंद्धनुष्यातले सात रंग पुन्हा एकत्र आले.... तसे इंद्रधनुष्यातले रंग कधी वेगळे होत नसतातच पण त्याला गरज असते एका पावसाची... तो पाऊस त्यादिवशी पडल्यामुळे हे इंद्रधनुष्य दिसलं!
आम्ही सगळे एका वेगळ्याच एक्साईटमेंटने आमच्या नेहेमीच्या कट्ट्यावर भेटलो. हाय,‌ हॅलो झालं आणि सगळे सेल्फी काढण्यात आणि स्टेटसेस ठेवण्यात मग्न झालो. "एक मिनिट, आत्ताच सांगतो यापुढे जेव्हा भेटू, तेव्हा सगळ्यांचे मोबाईल्स खिशात हवेत; हातात नकोत.", तो म्हणाला. सगळ्यांनी चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. पूर्वीचा त्याचा लिडरशीपचा स्वभाव ४ वर्षानंतरही तसाच होता. सगळ्यांनीच त्याची 'ऑर्डर' फॉलो केली.... आणि‌ मग सुरू झाल्या 'प्रत्यक्ष गप्पा'.
तसं पाहायला गेलं तर फक्त चारच वर्ष उलटली होती, पण या चार वर्षांमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही घडलं होतं. जिला चार लोकांसमोरही बोलायची भीती वाटायची ती आज एक निवेदक म्हणून काम करत होती. कोणी अभिनय क्षेत्रात होतं, कोणी एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी.च्या परीक्षा देत होतं, कोणी नोकरी करत होतं तर कोणी बोहल्यावर चढणार होतं! सगळ्यांच्या जीवनात खूप बदल झाला होता तरी आज सगळेच पुन्हा कॉलेज लाईफमध्ये पोहोचले होते.
तेवढ्यात ७ कटिंग (चहा) समोर आले. चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर सगळे भूतकाळात पोहोचले. "खूप बरं झालं ना, यांच्यामधलं भांडण मिटलं!" एकीच्या तोंडून सहजगत्या आलं. "हो ना, नाहीतर आपण काही पुन्हा असे भेटलो नसतो." दुसरी म्हणाली. मी आणि त्याने फक्त एकमेकांकडे पाहिलं.
"का ग, का भेटलो नसतो आपण?" मी म्हणाले. "अगं तुम्हां दोघांमुळे तर आपण एकत्र आलो."एक मित्र म्हणाला. "आम्हां दोघांमुळे?" मला प्रश्न पडला. "तुला आठवतंय का आपण ते नाटक केलं होतं, 'आस' नावाचं.... त्याचा दिग्दर्शक आपला हा लीडर होता." "काय?" मी आश्चर्याने विचारलं, "आणि हो त्यातल्या त्या मंजीच्या पात्राकरता याने तुझं नाव सुचवलं होतं." "अरे पण दिग्दर्शक तर तो सिनिअर होता ना?" "हो, तो नावापुरता." मला काही केल्या कोडं उलगडेना. "पण मग यात आमच्या दोघांचा काय संबंध?" "अगं, तू त्या भूमिकेसाठी तयार होत नव्हतीस कारण तुला ती जमणार नाही असं वाटत होतं." "तुझा‌ स्वभाव फटकळ, त्यामुळे तुला तयार करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि नकळत आपली सगळ्यांची मैत्री झाली." आत्तापर्यंत मी फक्त ऐकत होते आणि त्या सगळ्या मागचा अर्थ लावत होते. "अच्छा, असं आहे तर.... काय हो लीडरसाहेब प्लॅनिंग उत्तम हं!" त्याने हसून पाहिलं. पुन्हा सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
पहिल्या एका ऑर्डर नंतर लीडर गप्पच होता, फक्त ऐकत होता. मी त्याला विचारलं, "काय रे काय झालं? Everything is alright?" त्याने फक्त होकरार्थी मान हलवली आणि म्हणाला,"पुन्हा एकदा sorry ग. मी खूप लागेल असं बोललो तुला. तू तर मला काळजीने ओरडत होतीस. तुझ्या मेसेजचा फार चुकीचा अर्थ काढला मी. परवा तुझ्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर मला त्याची जाणीव झाली. यापुढे काही झालं तरी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय मी कोणताही निष्कर्ष काढणार नाही." वातावरण थोडं गंभीर झालेलं पाहून आमच्या ग्रुप मधल्या सिंगर ने सुरुवात केली. ' भलेबुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर' गाणं ऐकून सगळ्यांनाच शांत वाटलं. आज प्रत्येकजण आपापल्या शेड्यूलमधे बिझी असूनही वेळ काढून आला होता आणि कोणालाही एकटेपणाची जाणीव होत नव्हती. या 'गप्पा' आनंद देत होत्या, समाधान देत होत्या.
चहा संपूनही वेळ झाला होता. आता कॉलेजला भेट द्यावी असं ठरलं आणि सगळे डबलसीट निघालो. लीडर एकटा होता. त्याच्या मनात खूप काही साचलं आहे असं वाटत होतं. नंतर बोलून बघूया असा मी विचार केला.
कॉलेजला भेट देऊन झाल्यावर सगळ्यांनी खादाडी केली आणि पुन्हा भेटू म्हणून निघालो. "मला घरी सोडशील?" मी लीडरला विचारलं. "अरे, धनी! का नाही?" ते 'धनी' ऐकून हसायला आलं आणि मी त्याच्यासोबत निघाले. "काय झालंय?" मी विचारलं. "काही नाही." " नक्की?" "हो." "बरं चल आपण एक गेम खेळू." मी म्हणाले. "कोणता?" "मी जे शब्द सांगेन ते ऐकल्यावर जो पहिला शब्द मनात येईल तो सांगायचा." "ओके, सांग."
"कॉलेज?"
"ग्रुप"
"घर?"
"आई"
"आकाश?"
"निळं"
"समुद्र?"
"अथांग"
"कविता?"
"प्रेम"
"काम?"
"......फेल्युअर"
हळू हळू त्याचा आवाज रडवेला होत होता. उत्तम कवी असणा-या त्याची काव्यप्रतिभा आज आटली होती.
"गाडी थांबव." मी म्हणाले. फुटपाथवरच्या एका बेंचवर आम्ही जाऊन बसलो. "मी खूप प्रयत्न करतोय ग, पण होत नाहीये. घरच्यांचा आग्रह आहे मी नोकरी करावी पण नोकरी हा माझा पिंड नाही ग. काय करावं काही सुचतच नाही, घरच्यांच्या विरोधात जायला भीती वाटते. आत्तापर्यंत ४ नोक-या सोडल्या. कशात मनच रमत नाही. परवा तुझी‌ आठवण झाली म्हणून तुला फोन केला." तो बोलतच होता... "शांत हो, डोळे मीट आणि एकदा विचार कर तुला मनापासून काय करायचंय याचा." ‌त्यानं डोळे मिटले आणि मला म्हणला "मला शब्द दिसतात ग, एखाद्या सुंदर मोत्यांच्या माळेसारखे, एकात एक गुंफलेले! पण 'धनी' एका बाजूला जबाबदारीची जाणीवही होते." तो म्हणाला. "हे बघ, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची जबाबदारी घ्यावीच लागते. तू तुझ्या कवितेला सोडू नकोस, कामात यश जरूर मिळेल, जुन्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात कर आणि पुन्हा माझ्याशी भांडलास तर बघ हं! तुझी कविता ही तुझी 'व्हॅलेंटाईन' आहे, कायम सोबत असणारी! कळलं?
"येस, खरंच आज तुला जे कळलं ते इतर कोणाला कळलं नाही. सगळ्यांनी मला 'मस्तमौला' ठरवून टाकलंय. आज तुझ्यामुळे मी माझ्या ख-या प्रेमाला भेटलो and I promise you मी तिला कधीच सोडणार नाही. खरंच असं प्रत्यक्ष 'गप्पा' मारणं किती सुखावह असतं नाही? हलकं‌, मोकळं वाटतंय आज एकदम....." तो म्हणाला.
त्याने मला घरी सोडलं आणि तो त्याच्या व्हॅलेंटाईन सोबत निघून गेला. घरी आले तेव्हा माझ्या चेहे-यावरचं समाधान पाहून आत्याने विचारलं, "काय जगलीस ना ख-या अर्थाने मनसोक्त 'गप्पा' मारून?" माझ्या चेहे-यावरची हलकीशी स्मितरेषाच सगळं काही सांगून गेली.....

शर्वरी पर्वते

No comment

Leave a Response