Primary tabs

सई.......

share on:
सई... आज घरी येताना चाफ्याचं झाड दिसलं मला.
पुण्यामध्ये औद्योगिक परिसरात झाडांचं दर्शन जरा दुर्मीळच. दोन महिन्यात पहिल्यांदा हे झाड दिसलं असेल. तेही माझ्याच नेहमीच्या मार्गावर. थोडावेळ तिथेच उभा राहिलो मी. एक भूतकाळ डोळ्यासमोरून तरळून गेला.
   त्यादिवशी आपण शहराबाहेरील रस्त्यावर फिरायला गेलो होतो. तेव्हा तुला असंच चाफ्याचं झाड दिसलं. गाडी थांबवायला सांगितलीस आणि पटकन उतरून पळतपळत फुलं वेचायला लागलीस. एखाद्या लहान बाळाला आवडती वस्तू दिसल्यावर ते कसं आनंदाने उड्या मारतं तशीच नाचत होतीस तू. तुला विचारलं तर म्हणालीस तुला नाही कळणार वेड्या याचं कारण. 
    तुझा कायम हट्ट असायचा, भेटायला येताना बाकी काही नको पण चाफा मात्र नक्की आणायचा. ती फुलं पाहून तू किती हरपून जायचीस ना अन् तुला पाहताना मी हरवून जायचो. आजकाल जमीनच शिल्लक नाही राहिली तिथे झाडं तरी कशी राहणार जास्त. मग विचार केला घरीच लावूयात आपण चाफ्याचं झाड. तेच केलं मग मी, आणलं एक रोप आणि लावलं बागेमध्ये.
    आज समजलं तुला चाफा का आवडतो ते. जसा मी चाफा पाहून तुझ्या आठवणींमध्ये गुंग झालो तसंच तूही व्हायचीस ना. शेवटी समानधर्मी आपण, हे होणारच. सांगितलं नाहीस तरी मला समजणार नाही असं होईल का कधी. आजवर न बोलता सगळं काही समजलं तुला अन् मलाही.
    एक प्रश्न पडलाय गं मला...देऊ शकतेस का त्याचं उत्तर...? आज चाफ्याची फुलं वेचली खरं मी पण... ते हातात द्यायला तुझे हात का नाही सापडले गं सई... ?
 
प्रसाद चव्हाण
 

No comment

Leave a Response