Primary tabs

गजर

share on:
सकाळी ४.३० चा गजर झाला. सवयीप्रमाणे उठली. अरे पण कशाला? काय घाई आहे. डबा नाही बनवायचा, कामावर नाही जायचे. सगळे घरात. अलार्म बंद केला व झोपले. पण झोप काही लागेना. एकदा झोप मोडली की मोडलीच! 
             हॉलमध्ये येऊन खिडकी उघडली. प्रसन्न आल्हाददायक सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशी रविराजाच्या किरणांची मुक्त उधळण, उमलणारी कळी फारच प्रसन्न वाटले. तत्क्षणी मनी विचार आला, हा तर निसर्गाचा रोजचा दिनक्रम! आपण मात्र घड्याळाच्या काट्यावर धावताना सर्वांपासून मुकलेले असतो.
कोरोना विषाणू संसर्ग आला. जनता कर्फ्यू लागला. सर्व ठप्प! जीवनवाहिनी मुंबई - ट्रेन बंद. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू! अत्यावश्यक सेवेत रुजू असणाऱ्यांना मानाचा मुजरा. 
घरातील आवरले आणि चक्क निवांत वेळ स्वतःसाठी मिळाला. मला स्वतःलाही खूप आश्चर्यच वाटले. घरातच राहायचे म्हटल्यावर पूर्ण वेळ घरात आणि सर्व सदस्यासोबत वेळ -एकत्र जेवण, गप्पा, संवाद, खेळ, बातम्यांवर चर्चा म्हणजेच एकमेकांना वेळ देतोय आणि वेळ, नात्यांचे महत्त्व कळतंय.
दुपारी डायरी लिहिताना भूतकाळ फ्लॅशबॅकप्रमाणे समोरून गेला. सुखदुःखाचे प्रसंग, संघर्ष, स्वकीय प्रियजनांनी दिलेला आधार सर्वच समोर ठाकले. मोबाईल नव्हता त्या वेळी माणस माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधत होती. येणेजाणे होते, विचारपूस-काळजी होती. मोबाईल, व्हाट्सअप्प आले. सर्व तांत्रिकपणा सोबत आला. नाती दुरावली.
आणि एक दिवस  संसर्गामुळे तर जाणून बुजून सर्वांपासून दूर रहावे लागत आहे. लॉकडॉऊन!
 र्व चार भिंतीच्या आत. कोणाकडे जायचे नाही आणि यायचे नाही. स्वतः सुरक्षित रहा आणि दुसऱ्यालाही सुरक्षित ठेवणे आपल्याच हाती आहे. समाजप्रिय  माणसाला समाजहितासाठी गर्दीपासून दूर राहायचे आहे. काय म्हणावे ह्याला? एरव्ही शेजारी कोण राहतोय हेही माहीत नसते पण आता मात्र सर्वांशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी तलमळतोय, पण कोरोना दूर राहोना असं झालंय. गावी खळ (घरासमोरील अंगण), मागच् दार, परसबाग सर्वत्र ऐसपैस, शहरात सर्वच मोजूनमापून!
      संध्याकाळी शुंभकरोति म्हणताना कोरोना जाऊ दे, सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना आपसूकच म्हटली जातेय! तुम्हीही म्हणत असालच! आधुनिक जीवनशैली, चढाओढ, तिरस्कार, राग, गरीब, श्रीमंत आज सर्व एकाच रेषेत आहेत, माणूस महत्वाचा माणुसकी त्यापेक्षा काही मोठे नाही.
२२ मार्च सर्वानी टाळी, थाळी वाजवून एकात्मता, कृतज्ञता दर्शविली हेच आपण कायम एकमेकांप्रति कृतज्ञ असणे गरजेचेच आहे. डॉक्टर, पोलीस, नर्स, जवान, पत्रकार सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आपल्यासाठी झटत आहे. जनता कर्फ्यूच्या शांततेही एक वेगळा नाद, ध्वनी सर्वत्र निनादत होता .माणुसकीचा ध्वनी!
वाईट व्यथा हीच आहे की, कोरोनामुळे आज आपण घरात लॉकडॉऊन आहोत. त्यापेक्षा नात्यातील तंत्रिकपणा जाऊन सणवार, गरजेला आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या मनात लॉकडाऊन होणे अपेक्षित आहे.
लवकरच सकाळी ४.३० चा गजर होऊन उठायची वेळ येऊ दे...
- ऋतुजा गवस

No comment

Leave a Response