Primary tabs

टप्प्याटप्प्याने सवयीच्या दिशेने .....

share on:

चांगली सवय मग ती कोणतीही का असेना, लावून घेताना थोडा त्रास होतोच. कारण कोणतीही चांगली सवय लावून घेण्यात एक शिस्त हवी असते आणि मुळात ती शिस्त त्या सवयीच्या बाबतीत आपल्याकडे नसल्याने आपल्याला ती सवय जाचक वाटू शकते. खरं तर शिस्त हा शब्दच थोडा जाचक आहे. म्हणजे त्या शब्दाचा feel थोडा जाचक असं म्हणू या हवं तर. असो हे थोडं विषयांतर झालं.

तर मूळ मुद्दा असा की चांगली सवय लावून घेणं थोडं कठीण असतं. कारण एक चांगली सवय लावून घ्यायची असली तरी त्या कृतीशी संबंधित अनेक सवयी आपल्याला बदलाव्या लागतात. त्यातून गुंतागुंत निर्माण होते आणि अपेक्षित परिणाम न मिळाल्याने आपला उत्साहही ओसरतो. उदाहरणार्थ,  आपल्याला सकाळी लवकर उठण्याची आणि व्यायाम करण्याची सवय लावून घ्यायची आहे, तर दररोज सकाळी आठ वाजता उठणाऱ्यांनी अशा वेळी  अगदी सुरुवातीलाच पहिल्या दिवशी चार किंवा पाचचा गजर लावणे उपयोगाचे नसते. असे केल्याने झोप अपुरी होऊन तुम्हाला थकवा जाणवू शकतो. मग दुपारी डोळ्यांवर झापड येऊन तुम्ही मस्तपैकी ताणून देता आणि त्यामुळे रात्री लवकर झोप लागत नाही. रात्री फार उशिरा झोपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी चार/पाचचा गजर वाजून वाजून थकतो, पण तुमचे डोळे उघडत नाही. आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचा दररोज सकाळी उठण्याचा निर्धार असा कच खाऊ लागतो. खरं तर रात्री फार उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी फार उशिरा उठणे हे एक दुष्टचक्र आहे. ते चक्र थांबवायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे काहीही करून दुपारी अजिबात झोपायचे नाही. ज्या वेळेत झोपायची आपल्याला सवय आहे, त्या वेळी काहीतरी दुसरे मनोरंजक काम करायचे छंद जोपासायचा असे आपण आधीच ठरवून घेतले पाहिजे.

एकदा का दुपारची झोप घेणे आपल्याला टाळता आले तर पहिली लढाई आपण जिंकली आहे असे समजायला हरकत नाही. म्हणजे बघा ना, दुपारी न झोपल्याने रात्री आपल्याला लवकर झोप लागेल हे निश्चित. इथे मात्र आपल्याला मागे खेचणारा दुसरा दोर असू शकतो आणि तो म्हणजे रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर वेगवेगळ्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून वावरणे. हे असे एक आकर्षक किंवा व्यसन आहे की ज्यामुळे शरीर थकले आहे आणि त्याला झोपेची नितांत गरज आहे हे आपल्याला कळतही नाही. आपण शरीराची हाक ऐकत नाही. रात्री तासन्तास हातात मोबाईल घेऊन आपण जगाची सफर करतो. पण ही जागरण करून केलेली जगाची सफर आपल्या तब्येतीसाठी तितकीशी उपयोगाची नाही बरं का. ही सफर बसल्याजागी तुमचे वजन वाढवू शकते आणि पर्यायाने तुमच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते.

तर मग अशा वेळी काय करावे? उत्तर अगदी सोपं आहे. फार तर रात्री दहा ते साडेदहापर्यंत हातातला मोबाईल निकराने बाजूला ठेवता आला पाहिजे आणि त्या वेळी आपण झोपलोच पाहिजे असं ठरवून घ्यावं आणि हा नियम आपण कसोशीने पाळावा. समजा तुम्ही हे करू शकलात तर ही दुसरी लढाईही तुम्ही जिंकलातच असं म्हणावं लागेल.

पण एवढ्यानेच काहीही होत नाही हं. सकाळचा अलार्मसुद्धा आपण सुरुवातीचे काही दिवस सहाचा लावायचा. तेवढ्यानेही आपल्याला खूप छान वाटतं. मग सहा वाजता उठायची सवय झाली की एखाद्या दिवशी हळूच सहाचा अलार्म बदलून तो साडेपाचवर न्यायचा. हळूहळू साडेपाचला उठण्याची सवय होते. असे करत करत आपल्याला पाच वाजता उठण्याची सवयसुद्धा लागतेच.

आता राहता राहिला व्यायामाचा प्रश्न. तर उत्तरही अगदी सोपं. लवकर उठण्याची सवय जशी आपण टप्प्याटप्प्याने लावून घेणार आहोत तशीच व्यायामाची सवय सुद्धा टप्प्याटप्प्यानेच लावून घेता येईल. व्यायामाच्या पहिल्याच दिवशी १००  दोरीवरच्या उड्या आणि २०  सूर्यनमस्कार असा अघोरी प्रकार करणे काय उपयोगाचे? त्याने तर उलट आपण आजारी पडू शकतो. हिंदीत एक म्हण आहे बघा 'लेने के देने पड गये'… असं आपल्या निश्चयाच्या बाबतीत होऊ नये असे आपल्याला वाटते ना? तर मग आपणच आपल्याला छोटी छोटी आव्हाने दिली पाहिजे. ती पूर्ण केली पाहिजे. आणि नंतर पुढे गेलं पाहिजे. पटलं ना?

तर मग लागा कामाला. तुम्हाला कोणती चांगली सवय लावून घ्यायची आहे हे ठरवा. त्यातल्या छोट्या छोट्या आव्हानांचे टप्पे पाडा आणि पद्धतशीरपणे एक चांगली सवय आपल्यामध्ये रुजवून घ्या.
 
विनया निलेश
Best Of Luck !

No comment

Leave a Response