Primary tabs

कोरोना ही माणसानेच छेडलेल्या निसर्गाविरुद्धच्या युद्धाची नांदी

share on:

कोरोना..कोरोना..कोरोना..

 गेल्या एक महिन्यापासून अवघ्या जगात या १२० नॅनो मीटरच्या राक्षसाने थैमान घातले आहे! संपूर्ण जगाचं चलनवलन थांबलं आहे.. अर्थातच भारतात सुद्धा ठिकठिकाणी कर्फ्यु, जमावबंदी लागू झाली आहे. हा विषाणू जगभरात पसरायला सुरुवात झाली तेव्हापासूनच सगळ्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. टीचभर सुद्धा नसलेल्या या महाकाय राक्षसाला गांभीर्याने घेण्याऐवजी भारतात त्याची चेष्टा होऊ लागली. हजारो मिम्स..व्हिडिओ.. अगदी कोरोनावर गाणे सुद्धा आम्ही तयार केले! पण केवळ बातम्यांमध्ये दिसणारा हा कोरोना अगदी आपल्या शहरात येऊन ठेपला...तेव्हा मात्र भल्या भल्यांची गाळण उडालेली दिसते आहे.
आता मात्र जो तो आपल्या क्षमतेप्रमाणे काळजी घेण्याची पराकाष्टा करतो आहे. केलेल्या दुष्कृत्यांचा दोष एकाच देशाला देऊन उपयोग नाही हे उघड आहे. मानव आपल्या विज्ञानाच्या कोषातून नवी ढाल शोधत नाही तोपर्यंत पळत राहणे अटळ आहे. हजारो उपाययोजना आणि अतिशयोक्तीला बळी पडून भीतीनेच जीव जायची पाळी येते. त्यापेक्षा आपणच सामाजिक खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे.
अशा प्रकारचा एखादा विषाणू निर्माण होणं आणि त्याने अवघ्या मानवजातीला उघड आव्हान देणं, हे निसर्गाने मानवाला त्याची लायकी दाखवणं आहे! आपण जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून सगळीकडे वर्चस्व मिळवलं, पण निसर्गापेक्षा मोठा कुणीच नाही हेच पटवून द्यायला कोरोना आला आहे. कोरोना ही माणसानेच छेडलेल्या निसर्गाविरुद्धच्या युद्धाची नांदी आहे. आणि अजूनही आपण वेळीच त्याला शरण जाणे क्रमप्राप्त आहे. निसर्गाच्या प्रकोपात राहण्यापेक्षा त्याच्या छत्रछायेत राहणे चांगले.. कारण या युद्धात कुणीतरी एकच वाचणार एवढे नक्की आहे!

-निनाद कुलकर्णी 

No comment

Leave a Response