Primary tabs

संचारबंदीच्या काळातले गावाकडचे जग!

share on:

 

"अरे श्रीरंग, आता काय करणार तू? या अशा परिस्थितीत तुला पुढचे काही दिवस सदानंदच्या घरीच राहावं लागणार आहे. तरी मी तुला सांगत होते की काही गरज नाही आहे जायची त्याच्या गावी उत्सव पाहायला"
"अगं आई, हो हो हो. मी इथे मजेत आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. सदाचं घर भरपूर मोठ्ठं आहे. पडवी, ओसरी, माजघर, स्वयंपाकघर, अंगण, परस सगळं काही सुरेख आहे. त्याची वाडीही किती सुबक आहे. सगळे आहेत इथे काळजी घ्यायला माझी."
"अरे, पण या भयंकर साथीने जग हादरलंय सगळं बाळा! कसं कळत नाही तुला?"
"आई इथे गावातही लोक घरातच बसून आहेत. ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सूचना देत आहेत. पोलीस फिरत आहेत."
"हॅलो हॅलो...!"
शेवटी फोन बंदच झाला. सदा आणि श्री काॅलेजमधले मित्र. सदाचं गाव कोकणात. आई, बाबा, मोठा दादा तिथे असत. सदा शिकायला पुण्यात होता. सदाच्या घराचं, वर्णन ऐकून श्रीसुद्धा या वेळी हट्टाने त्याच्याबरोबर गावी गेला आणि एका जगाला हादरवून सोडणार्‍या आजाराने सगळं जग ठप्प झालं.
श्रीची आई आणि वडील नक्कीच काळजीत पडले, पण या आडवाटेवरच्या गावात आपण शहरापेक्षा अधिक सुखात आहोत असं सारखं श्रीला वाटत होतं.
"चला रे मुलांनो, जरा दोन खळ्यांची भाजावळ करू या. परवा नांगरट करू या. काय आता आठवडी बाजारही बंद आहे. तेव्हा जरा चार भाज्या लावू या. आपल्यालाही होतील आणि गावातही विकल्या जातीलच." सदाचे बाबा म्हणाले.
श्रीला सतत समजत होतं की मोठ्या शहरात सगळेजण घरात अक्षरशः कैद झालेत पण इथे मात्र आपल्याला वाडीत मस्त फिरायला मिळतंय. नारळीपोफळीच्या थंड सावलीत मस्त गप्पा मारत दुपार कशी संपते ते ही कळत नाही.
सदाचे चार मित्र येऊन दोन दिवस क्रिकेटही खेळून गेले होते इथे. पण आता मात्र सगळ्यांनीच ठरवलं होतं की जरा आपापल्या घरीच राहूयात. ते सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
सदाच्या घराच्या पुढच्या सारवलेल्या पडवीत नाहीतर अंगणात चांदण्या मोजत रात्री दोघे गप्पा मारीत झोपत.
भल्या सकाळी किंबहुना पहाटेच कोंबडा आरवला की झोप चाळवली जाई. सदाचा दादा गोठ्यात म्हशींचं दूध काढायला जात असे. आह्निकं उरकून आलं की वहिनी गरम चहाऐवजी दुधाचे पेलेच देत असे पुढे. तेही चुलीवर तापवलेलं दूध.
"इथे दूध इतकं सुंदर आहे आणि भरपूर पिता येतं आहे आणि तिकडे लाॅकडाऊनमुळे दूधही मिळत नाही आहे रोज चहाला सुद्धा!" श्रीचं म्हणणं ऐकून वहिनी हसली फक्त.
गावात असंच असतं अहो. माझं माहेरही पलीकडेच आहे नदीच्या. आमच्याही घरीशेती, दुभतं आहे. कमी कशाचीच नाही. कष्ट मात्र खूप हं!
हे झाल्यावर दररोज सदाचे वडील, सदा आणि श्रीरंग किजू शोधायला बाहेर पडत असत. मोठमोठ्या टोपल्या भरून काजूखालचे काजू वेचून आणण्यात आणि गप्पात वेळ सरे.
मग घरी आल्यावर मऊ तांदळाची भाकरी, मऊ भात , खिमट असं काहीतरी खाऊन मग थोडावेळ टीव्ही पाहणं. पण फारसं नाहीच.
सदाचे बाबा शेतात जात किंवा गोठा स्वच्छ करत किंवा काही दुरुस्तीची कामं. एखादा गडी रोज येत होता कामाला. तो काजू सोलत असे नाहीतर एखाद्या मावशी आल्या तर सदाची आई त्यांना काही काम सांगत असे. हे सर्व अनुभवण्यातच श्री रमला होता. विहिरीवर जाऊन थंडगार पाण्याने अंघोळ आणि धमाल झाली की जेवणाची हाळी येई. सकाळी लवकर अंघोळ झाली तर परसात पाणचूल असे त्यावरच्या हंड्यातलं मस्त उकळतं पाणी मिळे. केळीच्या आडोशानेही अंघोळ करताना मजा येई.
फणस, काजू , केळफूल अशी मस्त भाजी, भाकरी, आमटी भात कधी कुळथाची पिठी असं पोटभर जेऊन मग सुपारीच्या बागेत दुक्कल जाई.
"सदा इथे आयुष्य किती सुरळीत सुरू आहे. जिथे उंबराही ओलांडता येत नाही आहे जगाला तिथे आपण मात्र मस्त भटकतोय."
"होय श्री. कारण आम्ही आमचं अंगण राखलंय. शेती सांभाळली आहे. वाडी जिवंत ठेवली आहे. मी शिकायला आलो खरा पण जरा हाती पैसा आला की मी ही दादासारखाच इथेच राहणार आहे. आपली माणसं आणि आपली माती यासारखं सुख नाही रे!" शहरात पैसा आहे पण इथे  शांतता आणि समाधान आहे. तूच पाहतो आहेस ना की आपल्याला इथे कळतही नाहीय की जगात केवढी उलथापालथ होते आहे. या मोकळ्या स्वच्छ हवेत श्वास घेणं किती सोपं आहे.
आपण संध्याकाळी वाडीत फिरतो. पुन्हा धार काढतो मी तेव्हाही तू येतोस. दादाची कामं सुरू असतातच दिवसभर. मिरीला पाणी दे. सुपारीची बाग स्वच्छ ठेव.
मोहोरावर ठेव आमराईत. तीनसांज कधी उतरते कळतही नाही.
संध्याकाळी निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला आईचा चेहरा मला पाहायला रोज आवडतो. आजी-आजोबा होते तेव्हा तर मजा यायची.
माझी आत्या आणि काका दोघेही अमेरिकेत. पण इथे कधीच येत नाहीत. बालपण इथेच गेलं पण आता यावंसं वाटत नाही. पण आम्ही सुखी आहोत श्री. तू पाहतो आहेसच."
श्रीने मोबाईल पाहिला. आईला फोन करायला हवा होता. रेंज आली होती जरा. पण त्याला तेही नको वाटलं. आई-बाबा तेच सांगणार.. आज इथे हे बंद. अमकीकडे इतके मृत्यू. तमकीकडे राजकीय चर्चा....
कदाचित सदाच्या आईने मन वाचलं असावं त्याचं. "श्रीरंग.. अरे आई ही आई असते. काळजी करणारच. पण म्हणून तू टाळू नकोस त्यांना. तुला फिरून तिथेच जायचं आहे. पण इथल्या आठवणी मात्र कायम सोबत ठेव मनात. कधीही उदासवाणं वाटलं तर हक्काने ये हो इथे."
श्रीला हे लोभसवाणं जीवन खरंच आवडलं मनापासून. इथे सगळे आयुष्य "जगत" होते, पण "धावत" नव्हते. आयुष्य जसं आणि ज्या गतीने नेईल ती गती त्यांनी स्वीकारली होती आणि तो आनंद त्यांचं घरदार अंगण परस वाडी उजळून टाकत होता.
- आर्या जोशी

No comment

Leave a Response