Primary tabs

घरी रहा सुरक्षित रहा!

share on:

 

माझा राजू सातव्या महिन्यात झालेला. त्याच्यानंतर कूस उजवलीच नाही. त्यामुळे ह्याला तळहाताच्या फोडासारखा जपलेला. तो होस्टेलवर जाताना जीव जाण्याची वेळ आली होती अगदी.
आम्ही दोघेही त्याच्या घरी येण्याची चातकासारखी वाट पाहात असायचो.
ह्या महामारीमुळे एक बरं झालं...
राजू होस्टेलवर असायचा. त्याला घरी बोलवून घेतलं. आता तो खूप दिवस राहणार होता. मजेत चालले होते दिवस. बाहेरच्या ह्या साथीमुळे घरात काळजी घेत होतो खूप. माझा डायबेटीस, ह्यांचा दमा पण सगळे काटेकोरपणे पाळत होतो. त्यामुळे चिंता नव्हती.
   अळूवडी म्हणजे राजूच्या अगदी आवडीची. तो होस्टेलवर गेल्यापासून अळूवडी मी करतच नव्हते कधी. तो आला की, मग साग्रसंगीत अळूवडीचा बेत ठरलेला.
      त्यादिवशी बाजारात खास अळूची पानं आणायला गेले. राजू म्हणत होता.
"नको जाऊ आई. बाहेर साथ आलीये. आता मी इथेच असणार आहे बरेच दिवस. नंतर कधी तरी करू. त्यात काय"
"काही चिंता करू नको राजू. मी व्यवस्थित पदर घेईन तोंडावर"  गेले खरी पदर घेऊन पण बाजारात नको नको म्हणत असतानाही गर्दी झाली. त्यात पोलिसांची गाडी आली आणि एकच झुम्मड उडाली. अळूची पानं तर होतीच पण पुढचा बाजार भरला नाहीच तर असावेत म्हणून तीन एक किलो बटाटे, कांदे, टोमॅटो असंही काय काय घेतलं होतं. घर जवळच होतं; पण ह्या सगळ्या गर्दीत आणि धावपळीत दमछाकच झाली खरी.
घरी येऊन पहिली कडकडीत पाण्याने अंघोळ केली. कपडे गरम पाण्यात भिजवले. भाज्यासुद्धा धुवून घेतल्या वाहत्या नळाखाली. भाजीची पिशवी गॅलरीतच ठेवून दिली तीनचार दिवसांसाठी. छानपैकी अळूवडीचा घमघमाट सुटला. राजूने मनसोक्त अळूवड्या खाल्ल्या.
"आई, तुझ्या हातच्या अळूवड्या कुठेच मिळणार नाहीत आख्ख्या जगात." लेकरू म्हणालं. सगळ्या मेहनतीचं सार्थक झालं. निवांत मनाने झोपलो. नंतरही काही दिवस तळण सुरू होतंच घरात.
काही दिवसांनी मग घसा खवखवायला लागला. अळू खाजरे असतील, तळण जास्त झालं असेल म्हणून होत असेल असंच वाटलं सुरुवातीला. तेवढा बाजारचा एक दिवस सोडला तर कोणी कुठे गेलंच नव्हतं. त्यामुळे शंकाच आली नाही. जेव्हा तिघांनाही त्रास होऊ लागला तेव्हा डॉक्टर गाठला आणि आज मी ऑक्सिजनवर आहे. ह्यांना दमा आहे त्यांनाही आयसीयूत भर्ती व्हावं लागलंय. राजू कुठे एड्मिट आहे मला माहीत नाही. इथे पेशंटची खूप गर्दी आहे. कुणाकुणाला बेडपण मिळत नाहीये. मला जीव तोडून सांगायचंय डॉक्टरांना,
"की, अहो तो सातव्या महिन्यातला आहे हो. त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला हवंय"
पण माझा आवाजच फुटत नाहीये....
मला श्वास पुरत नाहीये...
घरघर लागलीये...
माझ्या मायेपोटी मी राजूचाच बळी तर घेणार नाही ना???
मी नको होतं जायला गर्दीत...
कदाचित आम्ही आज घरी गप्पागोष्टी करत निर्धास्त बसलो असतो...

(हा रोग महाभयंकर आहे.
#घरीराहाआपल्याजिवलगांनावाचवा)
डॉ. क्षमा शेलार

No comment

Leave a Response