Primary tabs

नव्या वळणवाटांचा प्रवासी....

share on:

 

१९८७ च्या सुमाराला दिल्लीत एनएसडीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा तिथल्या श्रीराम सेंटरमध्ये एका नाटकाचा प्रयोग असल्याचं वाचलं. मिखाइल शात्रोव्हच्या 'ब्लू हॉर्सेस अॅन रेड ग्रास'. एनएसडीतून पासआऊट झालेले विद्यार्थी त्यात काम करत होते हे आकर्षण होतंच. पडदा उघडला. मीता वशिष्ट समोर आली. तिनं नाटकाबद्दल सांगितलं. लेनीन संदर्भातलं हे नाटक "यह लेनीन का काम करेगा." असं म्हटल्यावर प्रवेश झाला इरफानचा. शिडशिडीत, साधा पण डोळ्यात एक चमक. हा लेनीनची भूमिका करेल, मीतानं म्हटलं. "आम्हाला कल्पना आहे हा अजिबात लेनीनसारखा दिसत नाही. पण लेनीन इथे नाही" म्हणत तिनं टक्कल दाखवल्यासारखा स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवला. "लेनीन इथे आहे नाही का?" म्हणत कान आणि कपाळ यांच्यामधल्या दिमाग दाखवला जातो तिथे स्पर्श केला आणि नाटक सुरू झालं. काहीही साम्य नसलं तरी पुढले अडीच तास रंगमंचावर लेनीनच वावरल्याचा भास होत राहिला आणि एक अत्यंत संयत आणि परिपक्व भूमिका पाहिल्याचा आनंद मिळत गेला.

इरफानच्या अभिनेता म्हणून असलेल्या ताकदीचं पहिलं दर्शन घडलं ते तिथे. 

त्यानंतर मुंबईला जाऊन त्यानं आपलं नाणं या मायावी दुनियेत वाजवायचा स्ट्रगल सुरू केला. तो सिनेमात दिसत राहिला. त्याची ताकद दिसत राहिली, पण इरफान या नावाला अजून म्हणावा तसा चेहरा मिळाला नव्हता.

तसा त्याचा चेहरा रूढार्थानं नायकाचा नव्हताच. पण त्याच्या डोळ्यात नेहमीच काहीतरी जाणवायचं, मला ते सतत कसला तरी शोध घेणाऱ्या अस्वस्थ संशोधकाचे डोळे वाटायचे. अस्थिर नजर. भिरभिरती. काहीतरी शोधणारी. रवी राय यांच्याबरोबर काम करत असताना तो त्याच्या मालिकेत काम करू लागला. मी त्यांच्या दुसऱ्या मालिकेत लेखन अभिनय करत होतो. तेव्हा तर ती अस्वस्थता खूपच जाणवायची. मालिकेतला अभिनय हा त्याच्या दृष्टीनं डाव्या हाताचा खेळ होता. पण आपण हे करायला आलेलो नाही ही जाणीव त्याच्या वावरण्यात असायची. कामाकडे दुर्लक्ष नाही. पाट्या टाकणं तर नाहीच. पण तो तिथे रमत नव्हता हे कळायचं.

अभिनयाची स्वतःची शैली विकसित करायची त्याची धडपड मालिकेतल्या त्या छोट्या चौकटीत गुदमरतेय असं वाटायचं. शांत, संयत बोलणं, अंडर प्ले आणि मोजक्या एक्सप्रेशन्स, पण त्यातूनही विलक्षण उत्कटता हे त्याचं वैशिष्ट्य होतं. खूप कमी हसायचा. पण हसला की कसं निर्मळ खळाळतं. त्या मालिकेत मी नसलो तरी जेव्हा कधी सेटवर जायचो त्याच्या कामाची पद्धत न्याहाळणं एक छान खेळ होता माझा. नंतर मालिका संपली आणि त्याचा सिनेमातला प्रवास सुरू झाला.

याच दरम्यान निखिल शर्मा नामक एनएसडीच्या मित्रासाठी मी एक हिंदी नाटक लिहिलं. जे पुढे मराठीत "सुखाशी भांडतो आम्ही" म्हणून आलं. निखिल म्हणाला, "इरफान भाई से पूछे?" आणि आम्ही त्याच्या एव्हरशाईन नगरमधल्या घरी गेलो.

नाटक नक्की ऐकू या; तो म्हणाला. त्याला माझं नाटक ऐकायची उत्सुकता होती. "पण मी करेन की नाही मला शंका आहे." म्हणत त्यानं आत जाऊन चहा सांगितला. मुंबईत हिंदी नाटकाला काय स्कोप आहे? तालमी भरमसाठ पण प्रयोग अगदीच कमी असं होतं. हे एक कारण आणि दुसरं, सध्या सिनेमावर लक्ष केंद्रीत करतोय. काही काम हातात आहेत. म्हणत त्यानं त्याच्या पुढल्या योजना सांगायला सुरुवात केली. अत्यंत प्रॅक्टिकल होत नाटक करायचं असून सध्या ते करण्यात अर्थ नाही म्हणत त्यानं सगळा वेळ सिनेमाला द्यायचाय असं स्पष्ट सांगितलं आणि मग नाटक वाचलं आम्ही. त्यानं खूप रस घेऊन त्यावर चर्चा केली. एक लेखक म्हणून मला ती उपयोगाची होतीच. कारण रंगभूमीचा गांभीर्यानं अभ्यास केलेला एक कलावंत त्यावर बोलत होता.

इरफानमधला अत्यंत खोलात जाऊन संहिता पाहणार नट मला दिसत गेला. त्याला ऑफर केलेल्या पण तो करणार नसलेल्या भूमिकेचे बारकावेही मांडत गेला. एका नटाच्या अभ्यासू, चिकित्सक, परखड नजरेतून संहिता कशी बघावी याचा तो वस्तूपाठच होता. काही भाग निष्ठूरपणे बदल असं त्यानं म्हटलं. काही भाग उत्तम जमलाय त्याला हातही लावायचा नाही असंही सांगितलं.

ती संध्याकाळ जागतिक रंगभूमीवरच्या वेगवगेळ्या नाटककारांच्या नाटकांवर चर्चा करण्यात कसा छान गेला.

म्हणूनच जाणवायचं हा इथला नाही. हा जिथे काम करतोय तिथे याच्या गुणाचं चीज करणारे आहेत का?

पण सिनेमा बदलत होता आणि आणखी प्रगल्भ होत होता. तो अत्यंत वेळेवर बॉलीवूडमध्ये दाखल झाला होता आणि त्याचे काही चित्रपट येत राहिले. माफक यश-अपयश पाहत राहिले, पण इरफान नावाच्या अवलियाची जादू काही गारूड घालत नव्हती. त्याचं काम अप्रतिमच असायचं पण सिनेमा नजरेत भरत नव्हते.

तिगमांशू धूलीयाचा हासील, जेव्हा तयार झाला. जाहिराती झळकल्या, तेव्हा एक दिग्दर्शक म्हणाला, "हा इरफानभाईचा शेवटचा चान्स. आता काही झालं तर होईल."

मी म्हटलं, "असं का?" तो म्हणाला, "माणूस किती काळ प्रवाहाविरूद्ध पोहत राहील. कधी तरी कंटाळेलच नं? इरफानभाई आता त्या सीमारेषेवर आहेत."

मला पटलं नाही. म्हटलं, "त्यांना कामाची कमी भासणार नाही."

तो हसून म्हणाला, "फक्त काम करायला नी दिवस भरायला आलेला नाहीये नं हा. त्याला त्याच्या डोक्यात असलेला अभिनय करायचाय. त्याच्या क्षमतेला चॅलेंज देणारं काहीतरी करायचंय त्याला."

आणि हासील गाजला. त्यातही इरफान खान गाजला. नव्हे डोळ्यात भरला. लोकांना आवडत होताच, पण आता त्याला चाहते मिळाले. जेत्याला पाहायला गर्दी करणार होते. मग काय पानसिंग तोमर आला. त्यानं नॅशनल अवॉर्ड आणि सगळेच मानसन्मान मिळवले. आता इरफान स्टार झाला. अशा नटांवर बसतो तसा समांतरचा शिक्का बसण्याच्या काळात तो सावध झाला आणि त्यानं सर्व प्रकारचे सिनेमे स्वीकारले, यशस्वी केले आणि मग समांतर आणि व्यावसायिकची सीमारेषाही त्याला बांधून ठेवू शकली नाही. बॉलीवूडसोबत त्याला हॉलीवूडनं बोलावलं आणि इरफानच्या अभिनयशैलीला एक प्रकारे दादच मिळाली. मला तो नेहमीच बलराज सहानी संजीव कुमारच्या पठडीतला वाटला. समांतर त्यांच्यातलाच.

अधूनमधून भेटी होत राहिल्या पण क्वचित!!

त्याची शेवटची भेट मात्र एक जखम देऊन गेली. म्हणजे भेट छान झाली. पण नंतर त्या भेटीचा संदर्भ खूप बेचैन करून जातो. अगदीच नेमका दिवस सांगायचा तर २५ जुलै २००८. आमचा मेलवर संवाद झाला आणि भेट ठरली. गप्पा मारताना सध्या काय विषय आहे डोक्यात असं विचारलं. मी उत्साहानं मनात असलेला विषय मांडला. कला आणि साहित्याची जागतिकीकरणानंतर झालेली गोची. माझ्या डोक्यात त्या वेळी असलेला "ॲट एनी कॉस्ट"चा विषय मी सांगितला. एक गावाकडचा हौशी नट. त्याला ब्रेन ट्यूमर होतो आणि एक टी.व्ही. चॅनल त्याचा कसा बाजार मांडतं.

एक एक दिवस मरणाच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या त्या नटाची कथा सांगत राहिलो. तो ऐकत राहिला. मग म्हणाला, "छान आहे. याचं काय करायचंय?"

मी म्हटलं काहीच ठरलं नाहीये. तेव्हा मी कादंबरीकडे वळलो नव्हतो, कादंबरी लेखनाचं मनातही नव्हतं. त्यामुळे सिनेमा किंवा नाटक. विषय ऐकून त्यानं स्मित केलं. म्हणाला, "आपल्याला एनएसडीत कला शिकवतात. पण वाटेत एक मार्केटही येतं हे कधीच शिकवत नाही. आयुष्यातला कितीतरी काळ हे मार्केट समजून घेण्यात जातो.”

अवांतर गप्पा होत भेट संपली.

नंतर तो त्याच्या सिनेमात बिझी होत गेला. मी माझ्या कामात रंगलो. या कथानकावर मी "ॲट एनी कॉस्ट” ही कादंबरी लिहिली. पुढे खूप काही झालं. त्याचं स्टार होणं. अभिनेता म्हणून त्याच्या शैलीचा दरारा निर्माण होणं.

रमज़ान, रोजा, कुर्बानी यापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचं असं विधान करणं. त्याचं कर्मठ मुल्लामौलवींच्या रोषाला बळी पडणं. धमक्या सहन करूनही आपली भूमिका न सोडणं...

बॉलीवूड, हॉलीवूड असा प्रवास.सामान्य माणसांपासून ते चिकित्सक नाट्य अभ्यासकांनाही आवडायला लागणं, मढ आयलंडवर आलिशान घर... यश, पैसा, नाव, प्रशंसा सन्मान... पुरस्कार...'

आणि अचानक त्याच्या आजाराची बातमी येणं... त्याची चिवट झुंज. त्यातून बरं होऊन येणं, कामाला लागणं... आणखी अपेक्षा निर्माण करणं... खूप काही छान बघायला मिळेल आशी आशा निर्माण झालेली असतानाच... अचानक दवाखान्यात अॅडमीट होणं आणि...अकाली एक्झीट घेणं...

सगळा देश हळहळला...

एका ताकदवान नटाचं हे असं रंगल्या खेळातनं निघून जाणं...त्याच्या आजारपणाचं ऐकल्यापासून गेली काही वर्ष एकच सवाल मनात येतो. जेव्हा मी "ॲट एनी कॉस्ट"ची कथा सांगत होतो... तेव्हा त्याला माहीत असेल त्याच्या शरिरात नेमकं काय सुरू होतं? बेचैन करून टाकणारा हा सवाल मला छळत राहील कायमचा. पण त्याच बरोबर त्याची ती अस्वस्थ नजर... नंतरची शोधक नजर कायम आठवत राहील आणि प्रवासात मध्येच मार्केट लागते हे विषादानं म्हणणारा इरफानभाईसुद्धा.

मळलेल्या वाटा पुसून एक माणूस जेव्हा नवी वाट शोधतो, त्या वाटेवरून चालतो तेव्हा तो त्याच्या मागे चालणाऱ्यांना नुसतीच एक नवी वाट शोधून देत नसतो. तर वाटा शोधल्या जाऊ शकतात, हमरस्ते हाच प्रवासाचा किंवा पोहोचण्याचा एकमेव राजमार्ग नसतो हे दाखवून देत असतो.

चालू पाहणाऱ्यांना अशी उमेद आशा आणि बळ देणारी माणसे कलेला समृद्ध करत असतात. अकाली संपलेल्या, अर्ध्या रस्तावरच थांबलेल्या इरफानभाईंच्या या प्रवासानं कितीतरी नव्या वाटसरूंना बळ दिलं आहे.

इरफानभाई अलविदा...

आप हमेशा याद आते रहोगे... विशेषतः जेव्हा जेव्हा कलाक्षेत्र नव्या वळणवाटेवरून जाईल तेव्हा तेव्हा..

अलविदा...

 

- अभिराम भडकमकर

No comment

Leave a Response