Primary tabs

चेर्नोबिल - परीक्षण

share on:

 

जगातल्या सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक म्हणजे चेर्नोबील अणुभट्टीचा अपघात!

२६ एप्रिल १९८६ रोजी चेर्नोबील मधील ४थ्या न्यूक्लिअर रिऍक्टरची चाचणी घेतली जात असता मोठा अपघात घडला त्यावर आधारित ५ एपिसोडसची ही मालिका आहे.

२५ एप्रिल १९८६ म्हणजे अपघाताच्या एक दिवस अलीकडे, त्याच ठिकाणी हीच चाचणी आयोजित केली होती. मात्र या चाचणीसाठी अणुभट्टीतून निर्माण होणाऱ्या विजेच्या प्रमाणात मोठी घट करावी लागणार होती. त्याला ग्रीड ऑपरेटरने विरोध दर्शवल्याने ही चाचणी १० तास पुढे ढकलण्यात आली, ज्यामुळे ही चाचणी २६ एप्रिलच्या पहाटेत गेली. त्याशिवाय ही वेळ ड्युटी बदलाची होती, जी अतिशय चुकीची होती.

२५ एप्रिलच्या सकाळपासूनच चाचणीसाठी युनिट न.४ मध्ये काय काय घटना घडतात? २६ तारीख चालू होताना, जेव्हा प्रत्यक्ष चाचणी चालू असताना ऑन ड्युटी स्टाफमधलं कॉ-ओर्डीनेशन कसं असतं, आणि त्याचा काय परिणाम होत असतो? याचं सविस्तर चित्रण या सिरीजमध्ये आहे. त्यामुळे या अपघाताची पार्श्वभूमी अधिक स्पष्ट होत जाते.

शेवटच्या भागात एक प्रोफेसर (जो अपघातानंतर तिथे प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यासाठी राहिलेला असतो) जो स्वतः न्यूक्लिअर रिऍक्टर विषयाचा तज्ज्ञ असतो, तो या अपघाताचं minute to minute विश्लेषण सादर करतो. त्यातून आपल्याकरता हा अपघात उलगडत जातो.

या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा भाग, जो उत्तमरित्या हाताळला आहे तो म्हणजे राजकीय कंगोरा! १९८६ म्हणजे USSR चा अगदी सुवर्णकाळ! आपल्या तंत्रज्ञानावर प्रचंड विश्वास! त्यामुळे प्रत्यक्ष सिनियर इंजिनिअर सुद्धा core meltdown झाला आहे हे मान्य करतच नाही. त्याच्यावरचे अधिकारी सुद्धा RBMK reactor meltdown होऊच शकत नाही हीच भूमिका कायम घेऊन असतात. अर्थातच या सगळ्याचा परिणाम एकूणच पुढच्या हालचालींवर होतो. मुळात ही चाचणीसुद्धा राजकीय उद्देशाने प्रेरित असते. खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सुरुवातीला रशियाच्या कोर कमिटीमधल्या कोणालाही या अपघाताची भयानकता लक्षात येत नाही (कोणी nuclear engineer असतील किंवा जाणकार असतील ते समजू शकतात की core meltdown ही किती भयंकर गोष्ट आहे) त्यामुळे त्यांची वागणूक कशी असते ते उत्तम टिपलेलं आहे. वर उल्लेख केलेल्या प्रोफेसरला एकट्याला एका रिपोर्टवरून अंदाज येतो की झालेला अपघात भयानक असणार आणि तो ती भूमिका कमिटीपुढे मांडतो देखील. त्या वेळी कमिटीमधील मेजर जनरल शरबिना आणि त्या प्रोफेसर (प्रोफेसर लॉगसलेव्ह)ची थोडी खडाजंगी होते. अध्यक्ष गोर्बाचेव्ह दोघांना प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन पाहणी करायला सांगतात.

अपघाताचे एक एक पदर प्रत्यक्ष Pripyt मध्ये राहताना शरबिना समोर लॉगसलेव्ह उलगडत असतो, शिवाय शरबिना देखील स्वतः अनुभवत असतो, पाहत असतो. त्यामुळे तिथे व्यतीत केलेल्या काळात त्याच्यात झालेला बदल हळूहळू आपल्यालादेखील जाणवतो. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मग ते Pripyt शहर रिकामं करण्याचा निर्णय असो अथवा अणुभट्टीत असलेलं ७०० मिलियन घनमीटर पाणी काढण्यासाठी लोकांना तयार करणे असो, शरबिना आणि लॉगसलेव्ह यांच्या संबंधात आलेली मित्रता हळूहळू आपल्याही लक्षात येते.

Johan Renck यांनी दिग्दर्शित केलेली ही छोटी series आपल्याला अनेक गोष्टी दाखवते आणि शिकवतेसुद्धा. टीकात्मक दृष्ट्या बोलायचं झालं तर ह्या seriesची निर्मिती HBO ची असल्याने यात अमेरिकन दृष्टिकोन जास्त डोकावला आहे. त्यामुळे ही काही प्रमाणात biased आहे असा काहींचा आक्षेप असू शकतो. पण तरीही अपघाताच्या वेळी आणि त्यानंतरचे अनेक पदर series मोठ्या खुबीने हाताळते. कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी (जे पुढे काकडी सोलावी तसे सोलले जाऊन नरकयातना भोगत तडफडून संपले) त्यांचे परिवार, अपघात हाताळणारी सरकारी यंत्रणा, अपघाताच्या तांत्रिक बाबी अशा विविध इतर स्तरांवर चालू असलेलं काम उत्तमरीतीने चित्रित केलेलं आहे. प्रत्येक नटाने आपली भूमिका अप्रतिम वठवली आहे. कॅमेराचा वापर तर अगदीच अफलातून आहे. अशा सर्वच कारणांमुळे series आवर्जून पाहावी अशी आहेच. Hotstar subscribe करून, foreign series ज्यात बघता येतील असा प्लॅन घेऊन ही series पाहता येईल.

- प्रणव सचिन पटवर्धन

No comment

Leave a Response