Primary tabs

नाटक - नटसम्राट परीक्षण

share on:

तात्यासाहेब शिरवाडकरांनी आपला जिव्हाळ्याचा लेखक शेक्सपिअर याच्या मॅकबेथ आणि अॅथेल्लो यांची आपल्या सिद्धहस्त लेखणीतून केलेली रूपांतरे ज्यांना अवघ्या नाट्यसृष्टीत अत्युच्च स्थान मिळालं त्या नाटकाचं नाव 'नटसम्राट '.

२३ डिसेंबर १९७० या तारखेला नटसम्राट नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि रसिकांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतला.  या नाटकाच्या रूपाने एक अनोखं लेणच नाट्यसृष्टीला मिळालं यात शंका नाही. 

हे नाटक रंगभूमीवर आलं त्या वेळी मी ११-१२ वर्षाचा होतो. आमच्याकडे सगळ्यांनाच नाटकाचा शौक विलक्षण. त्यातून शिरवाडकरांचं नाटक, पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तरांचं दिग्दर्शन आणि डॉक्टर श्रीराम लागू, शांता जोग यांसारखे प्रतिभावान कलाकार म्हणजे या त्रिवेणी संगमातून उभ्या राहिलेल्या या नाटकाचा आस्वाद घेणं हीच एक पर्वणी होती. परंतु काही कारणाने त्या वेळी नाटक पाहायला जाणं काही जमलं नाही. तरीही हे नाटक पाहायचं हे कधीही डोक्यातून गेलं नाही. अखेर तो दिवस उजाडला.

तिसरी घंटा होऊन रंगमंचावरील पडदा बाजूला झाला आणि सुरुवातीचा डॉक्टर लागूंचा नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेतील, प्रेक्षकांशी संवाद साधणारा पहिलाच सीन सुरू झाला मात्र, आणि अगदी त्या क्षणापासून नाटक जे अंगावर आलं ते अगदी संपेपर्यंत काही उतरलं नाही.  डॉक्टरांचा तो खर्जातील धीरगंभीर आवाज आपल्या भूमिकेची ओळख करून देत असताना अंगावर अक्षरशः सरसरून काटा उभा राहिला.

संपूर्ण नाटक हे रंगभूमीवरील एका नटसम्राटाच्या आयुष्याची शोकांतिका आहे. शिरवाडकरांनी लिहिलेली पल्लेदार वाक्य ऐकताना आणि त्या वाक्यांची आंदोलनं अनुभवताना एक अनामिक आनंद मिळत होता.  नटसम्राट नाटकाचं पुस्तक यापूर्वी मी वाचलं होतं, त्यामुळे त्यातील संवादांचा आनंद प्रत्यक्ष घेताना हा आनंद द्विगुणित होत होता. 

आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवललेला एक नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर नाट्यसृष्टीतून निवृत्त होतो.रसिकांतर्फे त्याचा मोठा सत्कार होतो. त्याचं दिवशी आपल्या लाडक्या मुलांमध्ये आपल्याला मिळालेल्या थैलीमधील संपत्ती वाटून टाकून तो पूर्णपणे निवृत्त होतो खरा, परंतु मनमुराद भोगलेल्या त्या नाट्यविश्वातून मनाने तो कधीच बाहेर येऊ शकत नाही. दिवस-रात्र तो त्या विश्वातच रमलेला असतो.नाट्यसृष्टीतील बेगडी आयुष्याशी तो खऱ्या आयुष्याची सांगड घालू पाहतो. परंतु ते अशक्य असतं.प्रत्यक्ष आयुष्य जगणं आणि लेखकाबरहुकूम एखादी भूमिका करणं यामधला फरक जाणून घेणं त्याला कठीण जाऊ लागतं.  आपल्या कुटुंबावर नितांत प्रेम असलेला, परंतू त्याचबरोबर नाट्यसृष्टीत वावरताना मुक्त बेबंद आयुष्य जगत आलेला हा नटसम्राट निवृत्तीनंतर अचानक परावलंबी होऊन जातो. समाजाने आखलेल्या चौकटी त्याला अस्वस्थ करू लागतात. आपला बाप हा एक थोर अभिनेता होता याचा त्याच्या मुलांना सार्थ अभिमान आहे; परंतु आता ते जगत असलेल्या चाकोरीबद्ध जीवनात आणि आज त्यांना समाजात असलेल्या प्रतिष्ठेच्या वर्तुळात आपल्या बापाचा वावर त्यांना त्रासाचा होऊ लागतो कारण दोन अधिक दोन चार हे जीवन अप्पासाहेब बेलवलकर कधीच जगलेला नसतो. आपल्या वडिलांनी शांतपणे घरात बसून राहावं आणि आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये ही त्यांची अपेक्षा असते. परंतु असं जगणं अप्पासाहेबांना मानवणारच नसतं. अप्पासाहेबांची पत्नी कावेरी जिला ते सरकार म्हणतात तिला आपला बेलगाम आयुष्य जगलेला नवरा आणि मोठी होऊन लग्न झालेली आपली मुलं यांना सांभाळताना प्रचंड कसरत करावी लागते. आपल्या मुलांच्या सामाजिक शैक्षणिक मोठेपणाचा सार्थ अभिमान बाळगतानाच आपल्या नवऱ्याच्या नटसम्राट म्हणून असलेल्या अहंकाराला ती सतत जपत असते. 

रसिकांनी डोक्यावर घेतलेला तो नटसम्राट रसिकांच्या प्रेमाला कधीही धक्का लागू देत नाही तर त्यांनी केलेल्या प्रेमाच्या दामदुपटीने ते अभिनयातून परत करतो. नाटकातील सुरुवातीच्या स्वागतात अप्पासाहेब म्हणतात 'हे प्रेम तुम्ही माझ्या झोळीत भीक म्हणून टाकलेलं नाही तर माझ्या अभिनय प्रतिभेने मी तुमचं प्रेम मिळवलंय '.  नाटक हे पैसे कमावण्याचं किंवा विरंगुळा म्हणून असलेलं साधन नसून ती रंगदेवतेची पूजा आहे जी त्यांनी आयुष्यभर केलेली आहे. इथेच त्यांचा अणि आजच्या पिढीचा संघर्ष होतो. परंतु फक्त दिग्दर्शकाने तालमीत शिकवलेलं मनापासून अमलात आणायचं हेच आयुष्यभर करत राहिल्याने आणि त्याचबरोबर नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनात दोन पिढ्यांमधलं अंतर वाढल्यामुळे झालेला फरक कुणीच लक्षात न घेतल्याने हा संघर्ष वाढत जातो.आपल्या विचित्र बेबंद वागण्यामुळे घरात संघर्ष होतो अणि त्याचा त्रास सरकारना होतो हे अप्पासाहेबांना कळत असलं तरी वळत मात्र नसतं, कारण मध्यमवर्गीय शिस्तीत वागणं आणि आपल्या वागण्याच्या परिणामांचा आधीच विचार करणं हे त्यांनी कधीच केलेलं नसतं. 

मुलाच्या घरी झालेल्या नवऱ्याच्या अपमानामुळे स्वाभिमानी कावेरी व्यथित होऊन अप्पासाहेबांना घेऊन त्यांच्या मुलीकडे राहायला येतात. आपल्या लाडक्या कोकरावर खूप माया असलेले अप्पासाहेब तिथेही आपला कलंदर स्वभाव आणि बिनधास्त वागणं सोडत नाहीत. अखेर तिथेही त्यांच्यावर चोरीचा आळ येतो आणि त्याक्षणी पित्यामधला नटसम्राट रंगभूमीचा सार्वभौम राजा अप्पासाहेब बेलवलकर आपल्या अहंकारासह उसळून उठतो. त्या वेळची अप्पासाहेबांच्या तोंडी असलेली तात्यासाहेबांची अप्रतिम आणि धारधार स्वगतं आणि त्या स्वगतांना साऱ्या चढ उतारासहित आपल्या पल्लेदार आवाजाने श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यात डॉक्टर लागू शंभर टक्के यशस्वी होतात. भाषासौंदर्य म्हणजे काय याचा वस्तुपाठच ही स्वगतं आपल्यासमोर ठेवतात.

लाडक्या लेकीने घेतलेल्या चोरीच्या आळाने कोसळून पडलेल्या आपल्या नवऱ्याला घेऊन त्याचं पावसाळी रात्री सरकार बाहेर पडतात. अंगात ताप असताना नवऱ्याच्या अपमान सहन न होऊन ती माऊली मुलीचं घर सोडते.

आणि इथून पुढे एका नटसम्राटाच्या दारूण शोकांतिकेचा तितकाच करुण शेवट आपल्याला पाहायला मिळतो.

एका आडोशाला पावसाळी रात्र काढल्यावर होणारी सकाळ कावेरीच्या मृत्यूने उजाडते आणि आप्पासाहेब पूर्णपणे कोलमडून पडतात. एका नटसम्राटाची विपन्नावस्था, भणंग आधारहीन जगणं पाहताना डॉक्टर लागूंमधला नटसम्राट त्यांच्या आवाजातून आणि डोळ्यातून कायम जिवंत राहतो. आपल्या नाटकातील संवाद फक्त त्यांच्या साथीला उरलेले असतात. त्या स्थितीत भटकत असताना एका बूटपॉलिशवाल्याच्या रूपात गरिबीतील माणुसकीचं दर्शन त्यांना होतं. अखेर एका नाट्यगृहाच्या समोर आपल्या मुलांच्या साक्षीने नटसम्राटाचा मृत्यू होतो. त्या वेळच्या स्वगतांनी तर आपण सुन्न होऊन जातो. आणि एक शोकांतिका संपते.

या नाटकाची स्वगतं आणि नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेचं गारूड अनेक मातब्बर अभिनेत्यांवर झालं आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आणि वकुबाने ते सादर केलं. परंतु डॉक्टर श्रीराम लागूंनी सादर केलेला नटसम्राट माझ्या मनात आजही जिवंत आहे.

या नाटकाचा पगडा एव्हढा प्रचंड होता की आमच्या शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात मी या नाटकातील एक प्रसंग निवडून वेशभूषेसहीत एकपात्री अभिनयातून सादर केला होता. 

अप्रतिम लेखन, अप्रतिम दिग्दर्शन आणि अप्रतिम अभिनय या त्रिवेणी संगमातून घडलेलं हे नाटक रंगभूमीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरलं.

- प्रसाद कुळकर्णी

No comment

Leave a Response