Primary tabs

मनाचा वॉर्डरोब परीक्षण

share on:

आकाशाला रोज गवसणी घालत बसतो
एक इरादा नुसते तारे तोडत बसतो

उंचीचा अंदाज कशाला घेता माझ्या
जमिनीमध्ये खोल मुळे मी रोवत बसतो'
 
गझलकार अनिल आठलेकर यांचा हा शेर ऐकल्यापासून त्यांचा 'मनाचा वॉर्डरोब' हा गझलसंग्रह कधी एकदा वाचते असं झालं होतं. 'ज्याच्या मनाच्या वॉर्डरोबमध्ये चंद्र आणि सूर्यही हँगरला लावून ठेवले आहेत, अशा गझलकाराच्या रचना वाचणं हा किती आनंददायी अनुभव असेल' असा विचार करतच मी पुस्तक हातात घेतलं.  
'संवेदना प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या या गझलसंग्रहाच्या सुरुवातीलाच कवी, गीतकार वैभव जोशी यांचा शुभेच्छा लेख आहे. हा लेख वाचताना गझलकाराच्या लिखाणाच्या वैशिष्ट्यांची ओळख होते. गझलांचं वेगळेपण, त्यातील सौंदर्यस्थळे ते उलगडून दाखवतात आणि मग वाचकांना रचनांचा खरा आस्वाद घेता येतो.

'शब्द शब्द हा आतुन येतो घेऊन माझी वाणी
केव्हाही मी साच्यामध्ये भाषा कोंबत नाही'

असं लिहीणार्‍या आठलेकरांच्य‍ा लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे शुद्धता आणि स्पष्टता! प्रत्येक रचना ही व्याकरणाच्या दृष्टीने अचूक आहे. त्यांना अगदी सहजसुंदर रितीने वृत्तांचा साज चढला आहे. कुठेही शब्दांची ओढाताण नाही की अर्थाशी तडजोड नाही! प्रत्येक विचार स्पष्टपणे मांडला गेला आहे आणि एक एक शेर मोत्यासारखा झळाळून उठला आहे.

व्याकरण आणि वृत्तांच्या अभ्यासाचा आग्रह धरणारा हा कवी समकालीन बोलीभाषेतील शब्दही लीलया गझलेत पेरत जातो आणि मग या रचना वाचकाला अजूनच जवळच्या वाटत राहतात.

'आत आहे स्कीम चालू कोणती? देवळाबाहेर. . . ही झुंबड किती!

काॅल आला फार दिवसांनी तुझा आठवण आहे किती अन् नड किती?'

इंग्रजीतून येऊन मराठी बोलीभाषेत विरघळलेल्या या शब्दांनी रचनेचा तोल कुठेही ढळताना दिसत नाही, उलट कधी कधी वृत्तबद्ध सौंदर्य यांच्या सहज वापरानं खुलूनच दिसतं.
अनिलजींच्या लिखाणात कायम एक सकारात्मकता जाणवते. रचनांचा आस्वाद घेताना ती सकारात्मकता वाचकालाही ऊर्जा देत राहते.

'बीज पेरतो आहे येथे माणुसकीचे नेमाने
कधी तरी मी जिंकिन हे जग, द्वेष इथे तरणार किती?'

असं म्हणणार्‍या या कवीचा माणुसकीकडे पाहण्याचा उदात्त दृष्टीकोन आपलं मन जिंकून घेतो. किंवा

'त्याच वृक्षाचे ऋतू गातात गाणी
फक्त आशेच्या बळावर जो बहरतो

पायरीचाही नियम लक्षात ठेवा
पावले चुकली तरी दर्जा घसरतो!'

इथे रचनाकार न हारता चिवटपणे जगण्याचा सल्ला देताना, दर्जेदारपणा जपण्याचाही आग्रह धरतो. संग्रहातील काही गझला माणसाच्या मनाचे विविध कंगोरे, भावनांचे पडसाद ओघवत्या शब्दांत आपल्यापुढे मांडत जातात. कवीचा स्पष्ट स्वभाव, कधी कटू अनुभवांचं दुःखं तर कधी अनुभवातून शिकलेल्या चार गोष्टी सांगत कवी व्यक्त होत जातो.

'चढला बराच जेव्हा बाजारभाव माझा
माझ्याच माणसांनी केला लिलाव माझा

इतक्यात ताकदीची घेऊ नका परीक्षा
इथल्या रण‍ांगण‍ांना नाही सराव माझा'

एका शेरात दु:खाची कमाल विव्हलता आणि पुढच्याच शेरात कमालीचं आत्मभान पाहून चकित व्हायला होतं, कवीची झुंजार वृत्ती इथे स्पष्ट जाणवते.

अनुभवातून शहाणपण आलेली माणसं जेव्हा लिखाण करतात तेव्हा त्यांच्या काही ओळीतून आपल्याला नकळत आयुष्याचे धडे मिळत जातात.

'पोटासाठी भटकत जाते भूक विठूच्या गावी
तिच्याहून प्रामाणिक बहुधा दुसरी वारी नसते

म्हणून आहे मानवतेवर टिकून भरवसा येथे
देणाऱ्या हातांची ओंजळ कधी रिकामी नसते'

हे वाचताना आपापल्या आयुष्यातले अवघड क्षण झरकन आठवून जातात. 'कवी वैश्विक लिहितो' म्हणजे नेमकं हेच!

गझलकाराचं हळवं मन, त्याला त्याच्या गावाची येणारी आठवण, आईची सय आणि प्रीतीचे गुलाबी ऋतू या खास कवीमनाच्या खुणा पेरत अनिलजी गझलसंग्रहाला परिपूर्णता देतात.

'अव्यक्त भावनांचे असतात त्रास काही
मांडू नयेत कोणी शब्दांत भास काही

इतकेच फक्त ठेवा लक्षात लेकरांनो
गावी अजून ओठी अडतात घास काही'

आपल्या दूर राहिलेल्या गावाची, प्रेमाच्या माणसांची ही आठवण आपलेही डोळे ओले केल्याशिवाय राहत नाही. त्याचवेळी कुणा खास व्यक्तीबद्दल वाटणारी खास भावना किती सहजतेनं ते कबूल करतात पाहा. .

'मी तिच्या कुठल्याच मोहाला बधत नाही तरी
तीळ आहे हनुवटीवर... काय सांगू आणखी!'

तिच्याबद्दलच्या भावना इतक्या उत्कटपणे व्यक्त करणारा हा गझलकार अखिल स्त्रीजातीबद्दल वाटणारा आदरही अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त करताना दिसतो.

'तिच्यामधेही स्वतंत्र, उन्नत, सशक्त व्यक्ती आहे
दुनियेने ज्या स्त्रीची केवळ मादी केली आहे!

पोर भुकेल्या आईलाही येत असावी कविता
तिने कल्पनेमध्ये कितीदा रोटी केली आहे'  

अनिलजींनी मालवणी भाषेतही सशक्त गझलरचना केल्या आहेत. या संग्रहात त्यातील काही रचनांचाही समावेश केलेला आहे. ही भाषा सर्वांनाच येत नसली तरी रचनांचा आशय मात्र थेट हृदयाला भिडतोच. सद्यपरिस्थितीत कवीचा हा भान देणारा शेर किती समर्पक आहे बघा,

'देता निसर्ग जा जा, ता ता जपून ठेया
नायतर नसात कोणी नंतर जगाक वाली'

कविता, गजल वाचताना ती मनाला भिडली पाहिजे. यासाठी ती वैश्विक असावी लागते. रचनाकाराला 'अहं' सोडून सर्वांच्या सुखदुःखांशी तादात्म्य साधावं लागतं. मनात करुणा, आपुलकी, संवेदना जागृत ठेवाव्या लागतात. पण हे सर्व करताना आत्मविश्वास, आत्मभान, स्वाभिमान, परखडपणा सोडून चालत नाही. मन लवचिक असावं लागतं. असं असेल तरच योग्य ठिकाणी, योग्य भावना, योग्य प्रकारे व्यक्त केल्या जातात.
आशयाचा खणखणीतपणा, शब्दांवर हुकूमत, भाषेवर प्रभुत्व आणि अंगभूत लयतालाची अभ्यासपूर्ण जोड असेल तर होणारी निर्मिती ही केवळ दैवी असते. या संग्रहातील कविता वाचताना मला हे सगळं सगळं जाणवलं. वाचन करताना थेट संवादाची अनुभूती येत होती.

'मनाचा वॉर्डरोब' वाचताना अंधारात एक एक दिवा उजळत गेल्यासारखं वाटतं! रचनांची लय आपण नकळत गुणगुणत राहतो. आशयाचं सौंदर्य मनात रुंजी घालत राहतं. एकूणात, 'मनाचा वॉर्डरोब' हा एक 'वाचनउत्सव' आहे. हा उत्सव रसिकांनी जरूर अनुभवावा, असं आग्रहानं सांगेन!

~ निरुपमा महाजन, पुणे

No comment

Leave a Response