Primary tabs

अंतर्मुख करणारी शोकात्म कहाणी - अग्निकाष्ठ परीक्षण

share on:

 

शेकडो वर्षे झाली माणूस काही शोधतो आहे अस्ताव्यस्तपणे, भटकतो आहे सैरभैर... अज्ञात वाटेवर चालताना कितीतरी खाचखळगे येतात, ओलांडत जातो मर्यादांना, पायी रूतत जातात काटेकुठे, तरीही निघतो आपण वाट फुटेल त्या पाऊलवाटेने, आपल्या ललाटी नियतीने गोंदवलेली प्रश्नोत्तरे शोधत. या वाटेवर लागतं हाती काही, सापडतंही काहीबाही आणि बरेच काही निसटतेही. हाती सापडलेल्या आनंदापेक्षांही निसटून गेलेल्यांनाच आपण आपले प्राक्तन मानतो. मनाचा गुंता सोडवायला जाऊन शेवटी आपणच त्या गुंत्यांत अडकून पडतोच आतल्या चक्रव्युहात अभिमन्यूसम! मग होऊन जाते आपलेही कोळ्याने जाळं विणावं व त्यातच स्वतःला बंदिस्त करून घ्यावं तसं! आयुष्यात एवढे किंतू परंतु वाढून जातात की प्रकाशाची वाट शोधायला निघालेल्या माणसालाही अंधाराच्या कुशीत विरघळून जावे वाटते. साहित्याचे सनातन प्रयोजन हेच राहिले आहे की, या अशाच वाट चुकलेल्या माणसांच्या गोष्टी सांगून सर्वसामान्यांच्या जीवनी शहाणपण रूजवण्याचे. जीवनाच्या सारीपाटावर मांडलेल्या सोंगट्यातील आपली भूमिका शोधत निघालेल्या अशाच भुईराजची गोष्ट 'अग्निकाष्ठ' या कादंबरीच्या विस्तृत पटावर मांडली आहे लेेेेखक 'बाबू बिरादार' यांनी.

      एकविसाव्या शतकातील समाज अतिशय वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणामुळे पारंपरिक कौटुंबिक मूल्यांना सुरूंग लागलेला आहे. माणसाचे माणूसपण हरवत जाऊन नातेसंबंधात दुरावा निर्माण झालेला आहे. वर्तमान माणूस माणसाकडे 'माणूस' म्हणून पाहत नाही तर 'वस्तू' म्हणून पाहत आहे. ही एकविसाव्या शतकाची फार मोठी प्रक्रिया आज जागतिक समाजजीवन अनुभवताना दिसत आहे. वाढते शहरीकरण,औद्योगीकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे माणूस यंत्रवत बनत चालला आहे; आणि या सर्वांमधून एक नवा 'भोगवाद ' जन्माला आलेला आहे. अशा या भोगवादाने मानवी जीवनात फार मोठी पोकळी आणि गुंतागुंती सुद्धा निर्माण केल्या आहेत. याच अस्वस्थ करणाऱ्या नोंदी 'अग्निकाष्ठ' या कादंबरीच्या प्रत्येक पलटलेल्या पानापानांतून पाहायला मिळतात. प्रस्तुत कादंबरीतील आशयानुकूल ओघवती निवेदनशैली संपूर्ण कादंबरीला कलात्म रूप प्राप्त करून देते .

    'बाबू बिरादार '१९८० नंतरच्या पिढीतील अतिशय ताकदीने लिहिणारे पण प्रसिद्धीपासून कोसो मैल दूर राहिलेले देगलूर तालूक्यातील काटेवाडी गावाचे रानमातीतील लेखक. बैलबारदाना, शेतीबाडी, बुरूजधारी वतनपरंपरेचा कौलारू वाडा, भरलेले घर व प्रपंचासाठी बँकेतील नोकरी तरीही कमालीचे जीव ओतून मानवी व्यवहाराचे चिंतन रेखाटणारे लेखक. आपल्या भोवतालच्या सांस्कृतिक, मानसिक, सामाजिक व राजकीय स्थित्यंतरांना आपल्या लेखन कौशल्याने जिवंत करणारे निष्ठावंत व सचोटीचे लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या कलाकृती सलगपणे वाचताना आपल्या कक्षा कितीतरी पटीने रूंदावल्याचे जाणवत राहते व मनात खंत राहून जाते की, इतक्या नितांतसुंदर कलाकृती आपण कितीतरी उशिरा वाचतो आहोत याची !

    'मातीखालचे पाय ', 'कावड ', 'गोसावी ', 'अग्निकाष्ठ ' व 'अंत;पुरूष ' या  पाचही कलाकृती वाचताना देगलूर परिसरातील कृषीसंस्कृती, ग्रामसंस्कृती व तिहेरी सीमेवर असणारी व वसणारी विभिन्न अशी भाषासंस्कृती जिवंतपणे डोकावत राहते.

      'भुईराज' हा या कादंबरीचा नायक. कादंबरीचं मध्यवर्ती पात्रं. भाऊराव पाणाड्याच्या पोटी जन्मलेला त्याच्याभोवती संपूर्ण कथासूत्र फिरते. बालपणी अनाथ असलेला शिवाप्पा जंगमाने आणलेल्या भिक्षेवर जगत असलेला व व्यंकटी मास्तरकडून मृत्यूची भीती उरी घेऊन पोरकेपणाचे घोट पचवत जगणारा 'भुईराज'. माय बाळंतपणातच देवाघरी गेली तर बाप बोटाएवढ्या भुईराजाला म्हाताऱ्या कोळिणीच्या ओटीत टाकून गावोगाव लोकांना पाण्याचे ठाण दाखवीत फिरत असे. त्याचा बाप भेटला की पाण्याशिवाय काहीच बोलत नसे. भोवतालच्या परिसरात त्याने दाखवलेलेच पाणी खळाळत होते. पाण्याबद्दलच्या त्याच्या गोष्टी ऐकून भुईराजला आपला बाप म्हणजे 'आकाशातून पडलेला शापीत देव' भासे. आपल्याच शेतात (भुईराजच्या आग्रहास्तव) असणारा हत्तीच्या सोंडेएवढा नळ दाखवून लोकांना पाण्याची वाट दाखवणारा भुईराजचा आभाळासारखा बाप नदीच्या पुराच्या पाण्यातच वाहून गेला.

        'अग्निकाष्ठ ' म्हणजे जळते लाकूड ! भुईराजची ही शोकात्म कहाणी. 'अग्निकाष्ठ' या शीर्षकाला अगदी समर्पक भासते.अतिशय शांत, संयमी, काबाडकष्टात पिचलेला, समजूतदार म्हणजे भल्याबुऱ्याची जाण ठेवणारा 'भुईराज' शेवटी मन फरफरटत नेले तिकडे स्वैर उधळत गेला. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीत पत्नीला मोजू पाहणारा शेवटी त्याच मळलेल्या वाटेने मार्गस्थ होतो. तर रत्ना संसार नेटाने देखणा करण्यासाठी अनैतिकतेच्या मार्गाने आपले पावित्र्य पणाला लावते. सूर्य पाहण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या रत्नाला पायातला घुटमळणारा वाण्याच्या रूपातला अंधार दिसत नाही. रचलेल्या चक्रव्यूहात ती फसत जाते; पण गोविंदासाठी तळमळत असते. 'गोविंदा'हे वेडसर पात्र असले तरी या सर्वात तो निराळाच. कुठल्या तरी वाटेवर शहाणपणाने चालणारी ही सगळी पात्रे पण 'गोविंदा' पुढे कुठलीच वाट नव्हती. होती, ती फक्त भूक! जणू सातजन्माची! 'नागमणी' एक स्त्री! बाईपण घेऊन वंशवृद्धीसाठीच मुकपणाने नवऱ्याच्या दावणीला बांधलेली गाय. नवऱ्याच्या भुकेचे काटेरी दात सोसणारी. अजगरासारखा गिळू पाहणारा 'नवरा' तरी नांदून नाव काढायला आलेली; पण तीही देहमनाच्या आवर्तनात सापडलेली... वाट चूकून अनैतिकतेच्या वाटेला लागलेली.

    नीळकंठ वाणी हा मृत्यू ...साक्षात काळ! त्याच्या रूपाने विश्वासाचे, पतिव्रतेचे नीतिमत्तेचे युग संपते. स्वतःच्या भावाला रानी नोकर ठेवून आजारी बायकोला माहेरी पाठवून भावजयीला अंगाखाली घेणारा, व्याजीबट्टी करून गावात अनेकांच्या घरी घरोबा करणारा...सगळ्या निवडणूका त्याच्या पैशावरच चालायच्या तो वाणी गावावर भूजंग होऊन विळखा मारल्यागत फुत्कार

टाकायचा. हा अंधार मार्गावरचा नैतिकता गुंडाळून चालणारा प्रवासी होता. शिवाप्पाचे पात्र मात्र अद्भुततेने रंगवलेले दिसून येते तर सावित्रीबाई ह्या निरागसतेने व भाबड्या आशेने वंशवृद्धीसाठी आसूसलेल्या दिसून येतात. या सगळ्यात  पुस्तकातील ज्ञानाने उजळून निघालेले व शहाणपणाने जीवनवाट चालणारे व इतरांना प्रकाशवाट दाखवणारे एकमेव पात्र ते म्हणजे माधवराव पाटील! तेच शेवटी नागमणीच्या पोटी जन्माला आलेला भुईराजचा वंश रत्ना व भुईराजच्या ओटीत देतात. या सगळ्या सजीव  पात्रांसोबत अजून एक निर्जीव पात्र कादंबरीभर महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, ते म्हणजे 'विहीर '! जगाला पाणी दाखवणारा भुईराजचा बाप आपल्या शेतात विहिरीची जागा दाखवण्यास उत्सूक नसतो. विहीर खोदल्यावर भुईराजच्या जीवनात येणारे वादळ कोणालाच रोखता येणार नाही हे भाकित खरे ठरते व शेवटी काठोकाठ भरल्या विहिरीत गोविंदा जीव देतो. एकप्रकारे विहीर हे पात्र ही खलनायकाच्या रूपात लेखक जिवंत करतात.

   भुईराजच्या आयुष्याची ही कहाणी. लेखक बाबू बिरादार यांनी नागरी निवेदनशैलीत मांडली असली तरी ग्रामीण संस्कृतीतील कृषीसंस्कृतींनी नटलेली दिसून येते. ओघवत्या निवेदन शैलीने कथानक प्रभावी होते तर यामध्ये लेखकांनी पात्राच्या मनात चाललेल्या विचारकल्लोळांनी आपसूकच बाहेर पडलेल्या मुखातील स्वगतांनी कादंबरीला उच्चतम पातळीवर नेऊन सोडले आहे. भुईराजच्या गतजीवनातील अनुभव स्मृती (फ्लॅशबक)पद्धतीने लेखक इतक्या ताकदीने निवेदित करतात की वाचकही भुईराजसोबत तो शिवाप्पाचा माळ चढायला उतरायला लागतो. कादंबरीभर प्रतिमा व प्रतिके तर बागेत फुलावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखे प्रत्येक परिच्छेदात नव्हेनव्हे प्रत्येक वाक्यात ते भिरभिरतायत. त्याचा वापर त्यांनी अतिशय खुबदारपणे केलेला आहे .

    मानवी मनात उठलेल्या विचारकल्लोळाचे हे कथानक एक प्रकारची भुईराजची म्हणजेच आपल्या भोवतालच्या अनेक माणसांची ही शोकात्मिका आहे. लेखक बाबू बिरादार यांच्या लेखणीतून प्रगटलेली ही कहाणी केवळ सौदंर्यपूर्णच नाही तर भाषिक सामर्थ्याने साकारलेली ही नितांत सुंदर कलाकृती आहे. जी वाचकाला अस्वस्थ करून सोडते. आपल्यालाही अंतर्मुख करते. आपल्याही विचाराला निश्चितच दिशा देते, असा मला सार्थ विश्वास आहे .

    

- अनिता यलमटे

No comment

Leave a Response