Primary tabs

लेख १ : आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते ?

share on:

नमस्कार मंडळी, खगोलशास्त्र हा सध्या सर्वांच्याच आवडीचा विषय झालेला आहे. खगोलशास्त्र हे किचकट आहे असा देखील बऱ्याच लोकांचा समज आहे. परंतु मित्रांनो खगोलशास्त्र हे समजण्यास जरी किचकट असलं तरीपण ते कंटाळवाण मुळीच नाही बरका. ह्या खगोल शास्त्रामध्ये इतक्या गमती जमती आहेत की आपण थक्क होऊन जाऊ. म्हणूनच या शास्त्रामधील आणि एकंदरच आकाशात दिसणाऱ्या अशा गमती-जमतींविषयी आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यासाठीच ही लेखमाला.. चला तर मग ह्या अथांग विश्वाच्या गमती-जमतींची सैर करूयात.

मित्रांनो, आपणास ठाऊक आहेच की आपल्याला लाडका आपला चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का , की आपल्याला चंद्र हा नेहमी एकसारखाच का दिसत असेल. म्हणजे चंद्राची, काल्पनिक ससा किंवा हरीण असणारीच बाजू आपल्याला नेहमी पाहायला मिळते. असे का असेल ह्याचा विचार तुम्ही केला आहे का? नसेल तर नक्की विचार करून बघा तुम्हाला नक्की वेगवेगळी उत्तरे सुचतील. प्रस्तुत लेखात आपण हीच गम्मत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मंडळी, चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा करतो हे तर आपल्याला ठाऊक आहेच पण तुम्हाला तो किती दिवसात प्रदक्षिणा करतो ते ठाऊक आहे का ? तो कालावधी आहे साधारण २७.३ दिवस. म्हणजेच चंद्र हा पृथ्वीभोवती २७.३ दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता अजून एक गोष्ट आपल्याला ठाऊक आहे की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना तो स्वतःभोवती सुद्धा फिरतो. म्हणजेच तो स्वतःभोवती सुद्धा गिरकी घेतो. आता हा कालावधी नक्की किती? तर हा कालावधी हा अंदाजे २७ दिवस इतका आहे. आता तुमच्या एक गोष्ट चटकन लक्षात आली असेल, ती म्हणजे की चंद्र हा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जितका कालावधी घेतो साधारण तितकाच कालावधी त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास लागतो. आता मंडळी हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्याला चंद्राची एकाच बाजू दिसते.

तुम्ही म्हणाल की हे नाही समजल बुवा, चला तर मग एक ह्यासाठी एक सोप्पा प्रयोग करून पाहूयात. तुमच्या घरी एखादी खुर्ची, टेबल असेलच. ते खोलीच्या मधोमध ठेवा. आता तुम्हाला त्याच्या भोवती प्रदक्षिणा मारायची आहे. तशीच जशी आपण देवळात गेलो की मारतो तशी. आता ती प्रदक्षिणा करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? तुमची उजवी बाजू ही कायम त्या खुर्ची अथवा टेबल कडे असते. म्हणजेच तुमची उजवी बाजू सतत त्या खुर्ची अथवा टेबल च्या दिशेने असेल. जेव्हा तुम्ही अगदी हळू हळू हीच प्रदक्षिणा माराल तेव्हा तुमच्या अस लक्षात येईल की तुम्ही त्या खुर्ची अथवा टेबल ला प्रदक्षिणा मारताना तुम्ही स्वतःभोवती सुद्धा एक प्रदक्षिणा करत आहात. हे सहज समजण्यासाठी खालील आकृती बघा. या आकृतीवरून तुम्हाला ही कल्पना लगेच लक्षात येईल.

मला खात्री आहे की तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून पहाल. या प्रयोगाद्वारे तुम्हाला लक्षात येईल की चंद्र आणि पृथ्वीच नक्की काय नातं आहे ते. चला तर मग. प्रस्तुत लेखात इतकच. पुढील लेखांमध्ये पाहूयात अशाच खागोलाविषयी गमती जमती...

अक्षय भिडे, पुणे

No comment

Leave a Response