Primary tabs

मिशन इम्पॉसिबल - भाग ३

share on:

साकेत मिथिलाला घेऊन स्वप्नीलकडे पोहोचला तेव्हा स्वप्नील विव्हळत होता. त्याच्या ओठांतून रक्त येत होते. कपडे फाटलेले होते. शरीरावर काही मुका मार लागल्याच्या खुणा होत्या.

``काका, ह्याला ह़ॉस्पिटलला का नेलं नाही? चला, आपण घेऊन जाऊया!`` साकेत त्याच्या वडिलांना म्हणाला पण स्वप्नीलनंच त्याला थांबवलं.

``नको रे, हॉस्पिटलला नको, असं मीच सांगितलं त्यांना. आमच्या फॅमिली डॉक्टरना सांगितलंय, ते देणारेत औषध!`` स्वप्नील म्हणाला.

``what? स्वप्नील, तुला किती लागलंय, तुला कळतंय का? आणि ही पोलिस केस आहे. तू कंप्लेंट करायला हवीस..!`` मिथिला अस्वस्थ होऊन म्हणाली.

``पोलिस केस होऊ नये, म्हणूनच मी हॉस्पिटलला गेलो नाहीये!`` स्वप्नीलनं असं सांगितल्यावर साकेत  व मिथिला आणखी चक्रावले.

``काकू, जरा पाणी देता का,`` असं म्हणून साकेतने स्वप्नीलच्या आईला आत पाठवलं, वडिलांनाही डॉक्टरांचा नंबर काढायला सांगितलं आणि मग स्वप्नीलशी दबक्या आवाजात बोलू लागले.

``अद्वैत कुठे भेटला तुला? आणि नक्की झालं काय?`` साकेतनं विचारलं.

``तुझं त्याच्याशी एवढं भांडण झालंय, हे मला सांगितलं नव्हतंस तू``  मिथिला म्हणाली.

``अगं एवढं काही झालंच नव्हतं. खरंच!`` स्वप्नील तिला समजावत म्हणाला.

``मग त्यानं तुझ्यावर अटॅक का केला?``

स्वप्नील काही क्षण शांत राहिला. मग त्यानं बोलायला सुरुवात केली.

``खरंतर अद्वैत एवढा violent का झाला मलाही कळलं नाही. त्याच्या त्या accident नंतर....``

``तो accident….`` मिथिलाला काहीतरी बोलायचं होतं, पण साकेतनं तिला अडवलं.

``तू सांग, स्वप्नील!`` त्यानं स्वप्नीलला खूण केली.

``अरे, आज कॉलेजमध्ये रेसेसदरम्यान तो माझ्याकडे आला आणि काहीतरी विचित्र बडबडायला लागला.``

``for example?``

``मला म्हणाला, स्वतःच्या लिमिटमध्ये रहा. तू लिमिट क्रॉस करतोयंस वगैरे.``

``कसलं लिमिट?`` मिथिलानं न राहवून विचारलं.

``ते मलाही कळलं नाही. मी त्याला म्हटलं, तू नक्की कशावरून चिडलायंस? तर काहीच बोलला नाही. उलट मलाच दमबाजी करत राहिला. मग मीसुद्धा उलट उत्तर दिलं. तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम तिथून जाताना दिसल्या, मग सगळीच पोरं आपापल्या क्लासकडे गेली, अद्वैतसुद्धा गेला.``

``आणि मग? परत कधी भेटला तो?`` साकेतनं विचारलं.

``कॉलेज संपेपर्यंत परत भेटलाच नव्हता तो!``

``हो, अद्वैत आणि मी एका प्रोजेक्टवर काम करत बसलो होतो, क्लासमध्येच!`` मिथिला म्हणाली.

``पण तेव्हा एकदा खिडकीतून तो डोकावल्यासारखं वाटलं मला.`` स्वप्नीलनं सांगितलं.

``ओह...``

``त्यावेळी काही बोलला मात्र नाही. कदाचित दुपारचा राग त्याच्या मनात असेल. त्याच्यानंतर मी घरी आलो आणि रात्री आठला त्याचा फोन आला. मला म्हणाला, तुला भेटायचंय. मग मी घरी काहीतरी कारण सांगून आमच्या सोसायटीच्या बाहेर गेलो, तर तिथे त्यानं अचानक माझ्यावर मागून अटॅक केला!``

``oh…बापरे!`` मिथिला ऐकताना घाबरली होती.

स्वप्नील सगळी कहाणी सांगताना थोडासा घाबरला होता. त्याला मुका मार लागल्यामुळे त्रासही होत होता. अद्वैतनं हल्ला का केला, याचं कारण काही त्याला समजलं नव्हतं, पण तो सारखं `लिमिटमध्ये राहा,` हे सांगत होता, हे मात्र आठवत होतं.

 

साकेत स्वप्नीलच्या घरातून बाहेर पडला, तेव्हा अद्वैतवर भयंकर चिडला होता. अद्वैतनं आज त्याच्या सख्ख्या मित्रावर हल्ला केला होता. `मिशन इम्पॉसिबल` या गेममुळे जगभरात किती वाईट घटना, हल्ले घडले आहेत, हे साकेतला माहीत होतं. त्यानं आणि मिथिलानं, दोघांनीही अद्वैतला आधीही समजावलं होतं. त्यानं स्वतःहून गच्चीवरून उडी टाकायचा उद्योग केला, तेव्हा तर त्याची चांगलीच शाळा घेतली होती. अद्वैत सुधारल्यासारखा वाटत होता, पण तसं घडलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आपल्या मित्राबद्दल राग तर आला होताच, पण त्यांना त्याची काळजीही तेवढीच होती. त्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञांची गरज होती.

अद्वैतच्या आईवडिलांशी आज बोलायचंच, असा निर्धार करून साकेत आणि मिथिला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी पोहोचले. नेहमी हसून स्वागत करणाऱ्या काकूंनी आज अतिशय शांतपणे दार उघडलं.

``काकू, आम्ही....`` साकेत काही बोलण्याचा प्रयत्न करायच्या आधीच काकूंनी बाथरूमच्या दिशेनं बोट दाखवलं. साकेत आणि मिथिला गोंधळून बघत राहिले.

(क्रमशः)

 

No comment

Leave a Response