Primary tabs

मिशन इम्पॉसिबल भाग ४

share on:

 

साकेत आणि मिथिला बाथरूमपाशी आले, तर आतून कुणाच्या तरी मुसमुसून रडण्याचा आवाज येत होता. साकेतनं डोकावून बघितलं आणि तो हादरला. आत अद्वैत एका कोपऱ्यात बसून रडत होता.

``अद्वैत..?`` त्याची अवस्था मिथिलाला बघवेना.

``प्लीज...जा तुम्ही. मी नालायक आहे....मी हलकट आहे....i am a criminal…मला सिम्पथी दाखवू नका. माझी लायकीच नाहीये तेवढी...!`` असं म्हणून अद्वैत पुन्हा हमसून हमसून रडू लागला.

``It’s ok अद्वैत....चिल!`` मिथिला त्या समजावण्याच्या सुरात म्हणाली.

``नाही....प्लीज...मी जे केलं ते चुकीचंच आहे....मला खरं स्वप्नीलला काहीच त्रास द्यायचा नव्हता...पण मी....तुम्ही पोलिसांना फोन करा...मला जेलमध्ये टाका...फासावर चढवा मला...!`` अद्वैत रडत रडत म्हणाला.

``हे बघ, तू बाहेर ये, आपण बोलू.`` साकेतनं आता पुढाकार घेतला आणि तो आत जाऊ लागला, तेवढ्यात अद्वैत ओरडला…``नाही, थांब साकेत! माझ्याजवळ येऊ नकोस...नाहीतर मी स्वतःला काहीतरी करून घेईन.`` असं म्हणून अद्वैतनं तिथेच ठेवलेलं कपडे धुवायचं धुपाटणं उचललं. अद्वैत ते स्वतःच्या डोक्यात घालून घ्यायला कमी करणार नाही हे मिथिलाच्या लक्षात आलं.

``साकेत....wait! अद्वैत...ते खाली ठेव....मी सांगतेय ना? ठेव खाली...``

``नाही...तो पुढे आला तर...``

``तो नाही येणार पुढे. मी प्रॉमिस करते. माझ्यासाठी ते खाली ठेव...!`` मिथिला म्हणाली.

आता अद्वैत किंचित शांत झाल्यासारखा वाटला. त्यानं ते धुपाटणं खाली ठेवलं.

``आता बाहेर चल बघू. आई बाबा कधीपासून काळजीत आहेत! चल...!`` असं म्हणून मिथिला थोडी पुढे गेली. साकेतला तिची काळजी वाटत होती.

``मिथिला, तू...`` तो काहीतरी सांगायला गेला पण मिथिलानं त्याला बोटानंच शांत राहण्याची खूण केली. ती आत गेली. तिनं अद्वैतचा हात धरला. अद्वैत शांतच होता. तिनं त्याला उठायला सांगितलं. तो उठला आणि तिच्याबरोबर बाहेर आला.

अद्वैतची अवस्था आईबाबांना बघवत नव्हती. त्याचे केस विस्कटलेले होते. अखंड रडून डोळे लाल झाले होते. स्वतःच्या कपड्यांचंही त्याला भान नव्हतं.

``सैरभैर होऊन तो घरी आला. आल्यावर सगळं काही सांगितलं आम्हाला!`` अद्वैतचे बाबा म्हणाले.

``आत्तापर्यंत शंभर तरी थोबाडीत मारून घेतल्यायंत त्यानं स्वतःच्या. डोकं आपटून घेत होता भिंतीवर पण आम्ही अडवलं. विनवण्या केल्या तेव्हा थांबला आणि स्वतःला शिक्षा करण्यासाठी असा बाथरूममध्ये जाऊन बसला.`` आई म्हणाली.

``स्वप्नील कसा आहे? बरा होईल ना तो? त्याला लागलं नाहीये ना फार?`` अद्वैतने विचारलं.

``तो बरा आहे. चल, मी तुला आत घेऊन जातो. आराम कर थोडा. उद्या बोलू!`` असं म्हणून साकेत त्याचा हात धरायला उठला, पण अद्वैत पुन्हा बिथरल्यासारखं करू लागला. मिथिलाच्या ते लक्षात आलं आणि तिनं पुन्हा साकेतला खूण केली. स्वतः पुढे झाली, अद्वैतचा हात धरून त्याला त्याच्या खोलीकडे घेऊन गेली.

खरंतर साकेत आणि मिथिला अद्वैतच्या आईवडिलांशी त्याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायला आले होते, पण अशा परिस्थितीत त्यांना हा विषयच काढता आला नाही. वातावरण थोडं शांत झाल्यानंतर बोलू, असा विचार त्यांनी केला.

``मला तुझ्याशी थोडं बोलायचंय!`` साकेत मिथिलाला बाहेर पडता पडता म्हणाला.

``अर्जंट आहे?``

``हो, का गं?``

``आईची तब्येत बरी नाहीये. तिचा फोन आला होता. लवकर जावं लागेल.`` ती म्हणाली.

साकेतनं तिला समजून घेतलं. बाईकवर बसताना दोघं काही क्षण बोलत राहिले, साकेतचं बंगल्याकडे लक्ष गेलं, तर अद्वैत वरच्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा होता. साकेतनं त्याला बाय केल्यावर त्यानंही हसून बाय केलं आणि ते निघाले.

``अद्वैत आपल्या ग्रुपचा मेंबर आहे यार! आपण त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!`` दुसऱ्या दिवशी कॅंटीनमध्ये सगळे जमले, तेव्हा विराजनं विषय काढला.

``करेक्ट आहे!`` ऋचा लगेच त्याच्या पाठीशी उभी राहिली.

``ते ठीक आहे रे, पण करायचं काय? स्वप्नील त्याच्या हल्ल्यातून मरता मरता वाचलाय, माहितेय ना?`` साकेत काळजीनं म्हणाला.

``हो रे, पण आता स्वप्नीलनंही कंप्लेंट केलेली नाही आणि अद्वैतला गिल्टी वाटतंय, हे तू बघितलंयंस.``

``मी तुला तेच सांगत होतो, की..``

``इट्स ओके, साकेत! अद्वैतला सुधारणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आहे ना?`` मिथिलानं नेमका मुद्दा मांडला.

``येस.`` साकेतनं होकार दिला.

``आपण ह्या संडेला ट्रेकला जाऊया का?`` मिथिलानं प्रपोजल मांडलं आणि सगळ्यांनी तिला दणकून पाठिंबा दिला.

(क्रमशः)

 

No comment

Leave a Response