Primary tabs

गूढ वलय लाभलेला प्रतिभावंत हरपला...

share on:

 

१७ नोव्हेंबर १९३८ ला मुंबईत जन्मलेल्या रत्नाकर मतकरी यांना लहानपणापासूनच नाटक वाचण्याची आवड होती. वडिलांच्या मागे हट्ट करून ते नाटकांची पुस्तके आणून वाचत असत. ‘वेडी माणसं’ या १९५५ साली वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून त्यांच्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. ही एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. मुंबई विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी मिळवता मिळवताच त्यांचे लेखनही बहरू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.  १९७८ पर्यंत बँक ऑफ इंडियात नोकरी करता करता त्यांच्या लेखणीने चौफेर विहार केला.
नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललितलेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारात दर्जेदार लेखन करत असतानाच रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकारिता ही क्षेत्रे देखील त्यांनी गाजवली. रत्नाकर मतकरींचे चतुरस्त्र लेखन लोकप्रिय होऊ लागले. तरुणाईला त्यांच्या वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांनी खेचून घेतलं. मतकरींनी त्यांच्या गूढकथांद्वारे मनोव्यापाराचा एक नवा आयाम उघडून दिला. मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर, वेगवेगळे थरार, विलक्षण पद्धतीने उगवलेला सूड अशा कितीतरी विविध गूढकथा वाचकाला थक्क करतात. त्यांच्या गूढकथा आल्फ्रेड हिचकॉक आणि स्टीफन किंगपेक्षाही सरस वाटतात.  
महाराष्ट्रात बाल रंगभूमीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली.  १९६२ला सूत्रधार ही संस्था स्थापन करून सुमारे ३० वर्षे पदरमोड करून त्यांनी अनेक बालनाट्यांची निर्मिती केली.  झोपडपट्टीतील मुलांना त्यांनी नाटक शिकवले. मोठ्यांसाठी ७०  तर मुलांसाठी २२  नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, ३ कादंबऱ्या, १२ लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरच्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंग प्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. ‘गहिरे पाणी’ ‘अश्वमेध’ ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेंट’ आशा त्यांच्या इतर माध्यमातली कलाकृतीही रसिकप्रिय ठरली.
रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली लोककथा ७८,  दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं? जावई माझा भला! चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा आणि इतर अनेक नाटके नाट्यरसिकांच्या मनात कायम घर करून आहेत. त्यांच्या अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस या मुलांच्या; तसंच महाभारतातील अंतिम पर्वावर आधारित ‘अरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली.
१९८३ साली भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती.  १९८६ ला ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट पटकथेचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झाला होता.

१९९५ साली ‘निर्भय बनो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. काही वर्षांमागे ‘अॅडम’ ही लैंगिकतेवरील कादंबरी लिहून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी, एकपात्री कार्यक्रम, सामाजिक चळवळी असा चौफेर संचार त्यांनी आयुष्यभर केला पण प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि तो यशस्वी ठरला.
२००१ साली पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते
‘इन्वेस्टमेंट’ हा त्यांचा चित्रपट त्यांच्याच कथेचा! त्यातून त्यांना जो सामाजिक संदेश द्यायचा होता, जे विधान करायचं होतं त्याची नैतिक जबाबदारी स्वतः घेत त्यांनी स्वतः या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं।  वैयक्तिक महत्त्वाकांक्षा वाढीला लागत असताना आपली संवेदनशीलता कमी होत आहे या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट! २०१३ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार याला मिळाला.
बाल साहित्यातील योगदानाबद्दल २०१८ च्या सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले होते.
मराठीतील हे थोर साहित्य’रत्न’ हरपल्याने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे, तर बाल रंगभूमी पोरकी झाली आहे पण त्यांच्या अजरामर साहित्यकृतीतून ते सदैव आपल्या सोबत असतील.

- स्वाती यादव

No comment

Leave a Response