कोरोना, संपूर्ण जगावर आलेलं हे एक मोठं संकट. भारतासारख्या विकसनशील देशात जेव्हा कोरोनाचे रुग्ण सापडले तेव्हाच सर्वांना अंदाज होता की याचा सगळ्यात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसेल आणि ज्यांचं हातावर पोट आहे अशा कामगारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि झालंही तसंच. कोरोनाच्या साथीचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाउन करण्यात आला. या लॉकडाउनमुळे अनेक उद्योग बंद झाले आणि परिणामतः अनेक मजुरांचं, कामगारांचं उत्पन्नाचं (जगण्याचं) साधन बंद झालं. काही दिवसातच अनेक लोकांवर उपाशी राहायची वेळ आली, ज्यांचं हातावर पोट होतं अशा लोकांचे अधिक हाल झाले. कवितेत वर्णन करावं तर,
"अस्तित्व माझे टिकवून मीच उभा आहे..
पापणी आड लपवून सुनामी,
उदरात ज्वालामुखी पेटला आहे." अशी काहीशी अवस्था होती.
या कठीण प्रसंगात अनेक सामाजिक संस्था लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या. एक संकल्प चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केला, लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांना मदतीचा हात देण्याचा. पण सुरुवात कुठून करावी काही कळत नव्हतं, कारण मदत बऱ्याच लोकांना करायची होती आणि त्यासाठी मदतीचे हातही लागणार होते. पण लॉकडाउनच्या काळात जवळपास सर्वांचं काम बंद झालं, पुढे आपले पगार होणार की नाही याबद्दल सर्वांच्या मनात संदिग्धता होती. यावर आम्हीच पुढाकार घेऊन एक संकल्पना राबवली. आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी दर महिना साधारण रू.२००० खर्च होतात. वर्क फ्रॉम होम असल्याने तो खर्च अनायासे वाचणार होता. तर तोच वाचणारा खर्च आम्ही या कामासाठी देऊ केला आणि बघता बघता मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्यातूनच आम्ही अंबरनाथ येथे अडकलेल्या ८२ मजुरांना किमान १५-१६ दिवस पुरेल इतकं रोजच्या आहारात लागणारं सामान दिलं.
परिस्थिती गंभीर होती, पण मदतीचे हात मिळत गेले आणि एके दिवशी मला एका काकूंचा फोन आला. त्या सेवानिवृत्त होत्या पण त्यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून एक मदतीचा हात दिला. वरवर दिसायला ही खूप साधी गोष्ट आहे पण नीट विचार केला तर लक्षात येईल की सेवानिवृत्त व्यक्तींचा आर्थिक आधार ही फक्त पेन्शन असते आणि त्यातला काही वाटा या कामासाठी देणं हेच आमच्यासाठी उत्साहवर्धक होतं. काहींनी तर सरकारी साहाय्यता निधीत द्यायची मदत आमच्या उपक्रमाला दिली. छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या या कामातून आम्ही अंबरनाथ येथील अडलेल्या मजुरांना आणि बीडमधील ऊसतोड कामगारांसाठीच्या शांतिवनच्या अन्नछत्राला मिळून साधारण ६०० किलोपेक्षा जास्त दैनंदिन अन्नधान्याची मदत केली आहे. अंबरनाथमधले मजूर त्यांच्या त्यांच्या गावी जाताना आनंदी तर होतेच, पण त्यांनी मनातून त्या सर्वांना ज्यांच्यामुळे त्यांना मदत मिळाली, त्यासर्वांचे आभारही मानले असतील.
चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनसारख्या अनेक संस्था या कठीण काळात गरजूंना मदतीचा हात देत आहेत. त्यांना तर धन्यवाद आहेतच पण या संस्था निमित्तमात्र आहेत, त्यांच्या हातांना दात्यांच्या हातांची जोड मिळाली त्यांचे खरे आभार. आपल्या ताटातील अर्धी भाकरी भुकेल्यांना देण्याची संस्कृती महाराष्ट्राची आहे आणि याच संस्कृतीला जपण्याचं काम अनेक लोकांनी, अनेक सामाजिक संस्थांनी केलं. आपल्या एका मदतीने कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायचा संकल्प केला आणि तो पार पाडला. हाच आमचा महाराष्ट्र, सर्वांना सामावून घेणारा आणि गरज पडल्यास सर्वांच्या मदतीला धावून जाणारा. या महाराष्ट्राचं वर्णन कवितेत करून लेखाची सांगता करू या,
प्रकाशाचे पाईक आम्ही,
आम्ही प्रकाशपूजक आहोत..
काळोखाच्या पोशिंद्यांनो,
आम्ही सूर्यवंशज आहोत...
जय महाराष्ट्र.
- प्रथमेश श. तेंडुलकर
संस्थापक-संचालक चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन
No comment