Primary tabs

मिशन इम्पॉसिबल भाग ६

share on:
 
``अरे यार, असं बघताय काय माझ्याकडे? कायम ह्यांचीच जोडी काय? आपल्याला आज सगळ्या फेवरेट जोड्या फोडायच्या आहेत. सांगितलं ना तुम्हाला काल?`` अद्वैत हसतहसत म्हणाला आणि सगळ्यांना त्यानं काल जी आयडिया सांगितली होती, त्याची आठवण झाली.
``ए, येस! आज ह्या वि-ऋचाची जोडी पण फोडायची. ह्यांना एका बाईकवरून येऊ द्यायचं नाही!`` आता स्वप्नीललासुद्धा हुरूप आला.
``Ok, no problem. But we are not a couple yet" मिथिलानं लगेच नाक उडवून उत्तर दिलं आणि ती साकेतच्या मागे जाऊन बसली.
``अरे यार, तुम्ही अख्ख्या प्रवासात भांडत राहाल आणि सगळ्या ट्रेकच्या मूडचा विचका कराल, म्हणून म्हणतोय!`` अद्वैत डोळा मारत म्हणाला आणि सगळ्या ग्रुपलाही ते पटलं.
``आम्ही कधीच भांडत नाही. Atleast मी तरी!`` मिथिलाच्या या वाक्यावर सगळ्यांना जोरदार हसायला आलं.
``Ok, listen! आम्ही खरंच नाही भांडणार आणि तुमचा मूड ऑफ करणार नाही. आता निघू या?`` असं म्हणून मिथिलानं साकेतला खूण केली, त्यानं बुलेट स्टार्ट केली.
``अद्वैत, चल यार, उशीर होतोय!`` विराजनं सुचवलं, तसा अद्वैतही बाईकवर बसला आणि सगळे निघाले.
वाटेत फारसं ट्रॅफिक नव्हतं, सगळे तासाभरातच गडाच्या पायथ्यापाशी पोहोचले. गडावर वरपर्यंत कुणीच गेलेलं नव्हतं. साकेतला अर्ध्यापर्यंतचा रस्ता माहीत होता, स्वप्नीलकडे गडाचा संपूर्ण नकाशा होता. आपण गाईड करतो, असं म्हणून त्यानं लीड घेतला होता. अद्वैत सगळ्यांना मदत करत होता. मिथिला तिथेही अतिउत्साह दाखवत होती आणि लीडरचा ओरडा खात होती. वि-ऋचा नेहमीप्रमाणे एकमेकांच्यात हरवून गेलेले होते.
सगळ्यांनी बरोबर पाणी, खाणं आणलं होतं, पण ट्रेक बऱ्यापैकी हेक्टिक होता. सगळ्यांच्या ताकदीचा कस बघणारा.
 
``ए, हा अद्वैत एकटाच हिंमतवाला आहे आपल्यात! त्याच्या त्या गेमवरून सतत स्वतःची हिंमत अपडेट करत असतो तो. काय अद्वैत?`` ऋचा पटकन बोलून गेली आणि तिचं अद्वैतकडे लक्ष गेलं. अद्वैत खवळला होता.
``तुझं डोकं फिरलंय काय? काय बोलतेयंस?`` अद्वैत काही बोलायच्या आधी विराजनंच ऋचाला झापलं आणि सगळे त्या दोघांकडे बघत राहिले. ऋचा एवढंसं तोंड करून मुळुमुळू रडायला लागली आणि तिला आवरताना नाकी नऊ आले. शेवटी विराजनंच कशीबशी तिची समजूत काढली.
``अद्वैतनं आता त्या गेमचा नाद सोडून दिलाय ऋचा. आपण सगळ्यांनी त्याला सांभाळून घ्यायला हवं.`` स्वप्नीलनं मध्यस्थी करून वातावरण हलकं केलं. ऋचालाही ते पटलं आणि ती अद्वैतला सॉरी म्हणून मोकळी झाली. सगळ्यांनी ट्रेकला पुन्हा सुरुवात केली.
 
``तुला काय झालंय साकेत? तू आज गप्प गप्प का आहेस? अर्जित नाही की पेपॉन नाही, मिका नाही...! आज हो क्या गया है तुझे, मेरे दोस्त?``  मिथिलानं न राहवून त्याला विचारलं.
``तूच दम दिला असशील त्याला, बोलायचं नाही म्हणून!`` विराज म्हणाला, पण आज दोघंही चेष्टामस्करीच्या मूडमध्ये नाहीत, हे त्याला जाणवलं.
``एनीवे, चला लवकर...अजून बरंच पुढे जायचंय…!`` स्वप्नीलनं पटकन विषय बदलला आणि सगळे त्याला फॉलो करत पुढे चालायला लागले.
``ऐक ना, स्वप्नील!`` साकेतनं हाक मारली. ``इथे आत्ता येताना पाण्याचं टाकं लागलं ना, तिथून पाणी भरून आणतो मी. वर मिळणार नाही बहुतेक!`` तो म्हणाला.
``हं....चालेल!`` स्वप्नीलनं होकार दिला आणि बाकीच्यांनी दोन तीन रिकाम्या बाटल्या साकेतकडे दिल्या. स्वप्नीलला फॉलो करत बाकीचे गडाच्या दिशेने पुढे झाले. पुढे एक अवघड आणि नवख्या माणसाला भरकटायला होईल, अशी वाट होती.
``जरा थांबू या. साकेत आल्यावर पुढे जाऊ!`` स्वप्नीलनं सूचना केली.
``अरे तो गडावर येऊन गेलाय आधी. येईल तो मागाहून...आपण जाऊ या ना!`` अद्वैत म्हणाला.
``नको. येऊ दे साकेत!`` मिथिलानं सुचवलं.
``खरं तर तो एव्हाना यायला हवा होता. बराच वेळ झाला. पाणी भरायला एवढा वेळ कशाला लागेल?`` स्वप्नील म्हणाला, तसं सगळ्यांनाच ते जाणवलं.
``मी बघून येऊ का?`` अद्वैतनं सुचवलं.
``नको, थांब. मीच बघून येतो!`` स्वप्नील म्हणाला.
``अरे, पण...!`` अद्वैत पुढे काही बोलायच्या आत स्वप्नील म्हणाला, ``अद्वैत, लीडर आहे ना मी? ऐक माझं... मी बघून येतो.`` असं म्हणून स्वप्नील टाक्याच्या दिशेनं निघाला.
काही क्षण गेले आणि स्वप्नीलच्या हाका ऐकू आल्या...``मिथिला, वि-ऋचा, अद्वैत...लवकर या! साकेत दरीत पडलाय!``
सगळेच हादरून एकमेकांकडे बघायला लागले आणि पुढच्याच क्षणी त्याच्या दिशेनं धावले.
 
(क्रमशः)
अभिजित पेंढारकर.

No comment

Leave a Response