Primary tabs

लेख २ : आपला सूर्य !!!

share on:

नमस्कार मंडळी, मागील लेखामध्ये आपण चंद्राविषयी एक मस्त माहिती जाणून घेतली की हा चंद्र पृथ्वीभोवती फिरताना, पृथ्वीवरून मात्र चंद्राची एकच बाजू आपल्याला दृष्टीस पडते. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण जाणून घेऊयात सूर्याविषयी काही गमती.

 

मंडळी, सूर्य हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे आणि आपल्या ह्या सूर्याच्या भोवती आपल्या सूर्यमालिकेतील सर्व ग्रह, लघुग्रह, हे प्रदक्षिणा करत असतात. सूर्याचा आकार हा पृथ्वीवरून जरी आपल्याला फारच लहान दिसत असला तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र तो अतिप्रचंड असा मोठा आहे. तुम्ही कल्पना करा की सूर्याच्या व्यासावर साधारण १०९ पृथ्वी तुम्ही एका रेषेत ठेवू शकता. म्हणजेच सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या सुमारे १०९ पट जास्त आहे. आता आपण सूर्याचे वजन पाहूयात. तुलनात्मक दृष्टीने वजनाचा विचार केला तर संपूर्ण सूर्यमालेच्या वजनाच्या ९९ टक्के वजन हे फक्त आपल्या सूर्याचे आहे!

 

आता सूर्याच्या उर्जेविषयी आपण जाणून घेऊयात. सूर्याच्या केंद्रस्थानी हायड्रोजन वायूचा प्रचंड मोठा साठा आहे. ह्या हायड्रोजनचे रूपांतर हे दर सेकंदाला हेलियम ह्या वायूमध्ये होत असते. या प्रक्रियेला आण्विक संयोग असे म्हणतात. ह्या प्रक्रियेद्वारे प्रचंड उर्जा निर्माण होते. ही उर्जा उष्णता आणि प्रकाश ह्या स्वरूपाची असते. परंतु सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे केंद्रापासून या उर्जा आणि प्रकाश यांना सूर्याच्या पृष्ठभागावर येण्यास काही हजार वर्षे लागतात. एकदा पृष्ठभागावर आल्यानंतर ही उर्जा सर्व बाजूंना फेकली जाते. पृथ्वी आणि सूर्याचे अंतर लक्षात घेता पृथ्वीवर जे प्रकाशकिरण आपल्याला पर्यंत पोहोचतात ते सुमारे ८ मिनिटे उशिराने येतात. याचाच अर्थ हा की आपण ८ मिनिटे जुना सूर्य/सूर्यप्रकाश अनुभवत असतो. या प्रकाश किरणांप्रमाणेच सूर्याकडून विद्युतभारीत कणसुद्धा पृथ्वीच्या दिशेने सोडले जातात. ह्यालाच सौर वादळे असे सुद्धा म्हणतात.परंतु आपणास ठाऊकच आहे की पृथ्वीला स्वतःचे असे चुंबकीय क्षेत्र असल्याने हे विद्युत भारीत कण त्या चुंबकीय क्षेत्राने अडवले जातात आणि मग आपल्याला पृथ्वीवर धृवाजवळील प्रदेशात नॉर्थन लाईट्सचा नयनरम्य अनुभव दिसतो. परंतु जर ही सौर वादळे अति प्रचंड मोठी असली तर ती पृथ्वीवर विनाश सुद्धा करू शकतात. त्यामुळे शास्त्रज्ञ सतत वेधशाळामधून सौर वादळांवर लक्ष ठेवून असतात.

 

ज्या प्रमाणे चंद्रावर सुद्धा डाग असतात तसेच काही काळपट डाग सूर्यावरसुद्धा असतात. त्यांना “सौरडाग” अशी संज्ञा आहे. सूर्यबिंबावरील हे काळपट डाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर असणारे कमी तापमानाचे भाग आहेत. हे कमी तापमान सुद्धा काही लाख अंश सेल्सियस असते. सूर्य स्वतःभोवती फिरतो हे ह्या डागांच्या रोज बदलणाऱ्या स्थितीवरून शास्त्रज्ञांना प्रथमतः ध्यानी आले. त्यांनी ह्या सौर डागांचे नीट अध्ययन केले तेव्हा हे लक्षात आले की सुमारे दर ११ वर्षांनी ह्या सौर डागांची संख्या वाढते आणि नंतर पुन्हा ती कमी होते. परंतु येत्या काही वर्षात सूर्यावर फारच कमी डाग दृष्टीस पडले आहेत त्यामुळे सूर्याची रचना बदलत तर नाही ना अशी शास्त्रज्ञांची शंका आहे.

 

सूर्याच्या वयाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर सूर्य हा त्याच्या वयाच्या अर्ध्या आयुष्याला पोहोचलेला आहे. म्हणजेच सूर्याची निर्मिती झाल्याला सुमारे काही कोटी वर्षे झालेली आहेत. आणि साधारण तेवढ्याच वर्षांनी म्हणजे काही कोटी वर्षांनी सूर्य नष्ट होण्यास सुरुवात होईल. मनुष्य जसा जन्माला येतो आणि मृत्यू पावतो, त्याच प्रमाणे तारे सुद्धा जन्माला येतात आणि त्यांची उर्जा संपली की ते मृत्यू पावतात. सूर्य जेव्हा शेवटच्या घटका मोजत असेल, तेव्हा त्याचा आकार हळूहळू वाढत जाईल. तो बुध, शुक्र, पृथ्वी; तसेच मंगळ ह्या ग्रहांनासुद्धा गिळंकृत करेल. त्यानंतर मात्र तो पुन्हा आकुंचन पावत साधारण पृथ्वी एव्हडा होईल आणि श्वेत बटू तारा होईल.

 

तर मंडळी ह्या आहेत सूर्याविषयीच्या काही गमतीजमती, अशा अनेक गमती अजून सुद्धा बाकी आहेत, परंतु त्या आपण येत्या काही लेखांमध्ये पाहणार आहोत. सध्याला आपण सुद्धा रोज सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि त्या निमित्ताने सूर्याला नमन करूयात. अशाच नव्या गमती जमती घेऊन भेटूयात पुढील लेखात.

 

- अक्षय भिडे

No comment

Leave a Response