Primary tabs

मिशन इम्पॉसिबल भाग ८

share on:

 

त्या मेसेजबरोबर पत्ताही दिला होता. मिथिला आणखी अस्वस्थ झाली. काय करावं तिला कळेना. ग्रुपमधल्या कुणाला सांगावं काय? हा नंबर कुणाचा असेल? तिनं त्यावर कॉल लावायचा प्रयत्न केला, पण लागला नाही. साकेत गेले काही दिवस विचित्र वागत होता, हे खरं होतं आणि त्याचं काय कारण आहे हे तिला शोधायचंच होतं. तिनं त्या मेसेजवर आलेल्या पत्त्यावर जायचं ठरवलं.

ती पत्ता शोधत एका बंगल्यापाशी पोहोचली, तेव्हा पुन्हा त्याच नंबरवरून तिला मेसेज आला, `गेट उघडून आत ये आणि टेरेसवर ये.` थोडं अंधारून आल्यामुळे मिथिला आता किंचित घाबरली. टेरेसवर जायचा जिना बाहेरूनच होता. ती टेरेसवर पोहोचली, तर तिथे कुणीच नव्हतं. टेरेसला कठडा मात्र नव्हता. खाली कुणी दिसतंय का, हे बघण्यासाठी तिनं डोकावून पाहिलं, तेवढ्यात कुणीतरी आपल्या मागे उभं आहे, असा भास तिला झाला. ती झर्रकन मागे वळली, पण तिथे कुणीच  नव्हतं. अकस्मात सगळं घडल्यामुळे ती खालीच पडणार होती,  पण कसंबसं तिनं सावरलं. प्रचंड घाबरून ती पुन्हा जिन्याकडे पळायला लागली, पण गडबडीत आता तिला जिनाच सापडेना. अंधारून आलं होतं. कुठे पळावं तिला कळत नव्हतं, अशात गच्चीतच पडलेल्या कुठल्यातरी वस्तूवरून तिचा पाय अडखळला आणि तिचा तोल गेला. या वेळी ती खाली पडणार, एवढ्यात कुणीतरी तिचा हात धरून तिला सावरलं. तिनं वळून बघितलं, तर तो अद्वैत होता.

``अद्वैत, तू?`` मिथिला जवळपास किंचाळलीच.

``हो, तू दुपारपासून रेस्टलेस होतीस, म्हणून मला काळजी वाटत होती. मी तुझ्या मागोमाग इथे आलो.``

``थॅंक्स, पण तू....`` मिथिला काहीशी गोंधळून त्याच्याकडे बघत होती.

``मिथिला, ऐक ना...तुझ्याशी एक बोलायचं होतं.``

``आत्ता...? अरे मी इथे...``

``I know तू इथे वेगळ्या कारणासाठी आली आहेस, पण मी सांगतोय तेही अर्जंट आहे.``

``हं...बरं, बोल.``

``मिथिला, I love you! तू साकेतशी ब्रेक अप कर. I am the best partner for you. मी हे प्रूव्ह करून दाखवेन!`` अद्वैत म्हणाला आणि मिथिला खाडकन झोपेतून जागी झाल्यासारखी त्याच्याकडे बघायला लागली.

``What?`` ती किंचाळली.

``हो, खरंच सांगतोय. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तुला पटत नसेल, तर मी इथून खाली उडी मारून दाखवतो. हे बघ...मी माझ्या गेममध्ये टार्गेट पण सेट केलंय.`` एवढं बोलून अद्वैत सरळ टेरेसच्या कठड्यापाशी गेला. तरीही मिथिलावर काही परिणाम होत नाही हे बघितल्यावर त्यानं तिचा हात ओढून तिला तिथपर्यंत नेलं.

``तुला accept करायचं नाही ना, मग आपण दोघंही उडी टाकू या...चल!`` असं म्हणून तो तिला ढकलणार, तेवढ्यात कुणीतरी त्या दोघांनाही मागे ओढलं आणि अद्वैतला एक सण्णकन थोबाडीत बसली. अद्वैतनं कळवळून बघितलं, तर समोर साकेत उभा होता.

``मिथिलाला मारणारेस तू? तुझी एवढी हिंमत?`` असं म्हणून साकेतनं त्याला आणखी एक थोबाडीत हाणली. अद्वैत प्रतिकार न करता एकदम रडवेला झाला.

एवढ्यात अद्वैतचे आईवडीलही तिथे आले, तेव्हा तो गोंधळला.

``साकेत, हे काय आहे, मला काही लक्षात आलं नाही..!`` मिथिला म्हणाली.

``सगळं सांगतो. अद्वैतला तू आवडतेस. मला हे आधीच लक्षात आलं होतं, पण आधी तो नॉर्मल होता. नंतर जो कुणी तुझ्याशी बोलेल, तुझ्याबरोबर जास्त वेळ घालवेल, त्याच्यावर अद्वैत हल्ला करायला लागला. त्यासाठी त्याच्या `मिशन इम्पॉसिबल`च्या व्यसनाचा त्यानं आधार घेतला. आपण या गेममधलं एक टार्गेट म्हणून नकळत हल्ला केला, असं तो दाखवायला लागला. प्रत्यक्षात तो प्लॅन करून सगळं करत होता, चुकून नव्हे. स्वप्नीलही त्या दिवशी तुझ्याबरोबर होता, म्हणून ह्यानं त्याला मारायचा प्रयत्न केला. त्या दिवशी ट्रेकलाही मला दरीत ढकलणारा अद्वैतच होता. मी त्याच्याबद्दलच्या सगळ्या लिंक्स जोडण्याचाच प्रयत्न करत होतो. गडावर माझा मोबाईल शोधायला गेलो होतो. मी सेल्फी काढत असताना हा मागून आला आणि सेल्फीत त्याचा फोटो क्लिक झाला, तेव्हाच मला सगळं कन्फर्म झालं.``

``ओह...नो !`` मिथिला रडवेली झाली.

``हो. आणि तू काहीही केल्या माझ्यापासून दूर होत नाहीस म्हटल्यावर त्यानं तुझ्यावरही अटॅक करायचा प्रयत्न केला. त्यासाठीच तुला इथे बोलावून घेतलं.`` साकेतचं हे बोलणं अद्वैत शांतपणे ऐकत होता. त्याला सगळं मान्य होतं.

``अद्वैत, तू मनानं चांगला आहेस यार! अजूनही वेळ गेलेली नाही, सुधार स्वतःला.`` साकेतनं त्याला मैत्रीचा सल्ला दिला. अद्वैतला ते पटलं होतं. तो मनानं वाईट नव्हताच. त्याची दिशा भरकटली होती.

अद्वैतच्या आईवडिलांनी साकेतचे आभार मानले, मिथिलाला धीर दिला. त्याच्यावर आता पुन्हा ट्रीटमेंट सुरू करायचं कबूल केलं आणि ते त्याला घेऊन गेले.

अद्वैत जाता जाता मध्येच वळून मिथिला, साकेतपाशी आला.

``सॉरी.`` तो म्हणाला आणि आईवडिलांबरोबर निघून गेला.

समाप्त.

लेखक : अभिजित पेंढारकर.

No comment

Leave a Response