Primary tabs

स्वाभिमानी रमाई!

share on:

रमाई म्हणजे रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी. रमाबाईंना सर्वजण प्रेमाने रमाई म्हणायचे. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...

    आपल्याला समाजात बदल घडवून आणायचा असेल, तर आपली माणसे या प्रवासात आपल्यासोबत असायला हवी असतात. तेव्हा आपण संघर्ष करू शकतो. बाबासाहेबांनादेखील उपेक्षितांना, सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे होते. जे त्यांनी मिळवून दिलेही… आणि यात त्यांना मोलाची साथ दिली ती रमाबाईंनी! एका सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे त्या जगल्या. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या अनेक इच्छा-आकांक्षांचा त्याग केला. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जेव्हा लंडनला गेले, तेव्हा याच रमाई कुटुंबासोबत अत्यंत हलाखीचे दिवस काढले.

    रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावात, एका गरीब कुटुंबात भिकू धोत्रे व रुक्मिणी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील आणि आई त्यांना लाडाने रमी म्हणत. लहान वयापासूनच रमाई अत्यंत हुशार आणि समजूतदार होत्या. त्या घरातील सर्व कामात आईला मदत करत असत. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले. या घटनेचा रमाईच्या बालमनावर आघात झाला. काही काळातच या जीवावर दुसरा आघात झाला, त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. पोरकी झालेली रमाई आपल्या लहान भावंडाना घेऊन मुंबईला मामा आणि काकाकडे राहायला आली. मुंबईतल्या भायखळा मार्केटच्या चाळीत त्या राहात  होत्या.

    रमा अजून लहान होती पण तेव्हाचा काळच असा होता की बालविवाहाची प्रथा सर्वत्र प्रचलित होती. त्यामुळे रमाचा विवाहदेखील बालपणीच झाला. बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांनी भिवासाठी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी अवघ्या नऊ वर्षाच्या रमाची निवड केली आणि १९०७ मध्ये मुंबईतील भायखळा येथे रमाचा बाबासाहेब आंबेडकरांशी विवाह झाला.

   हुशार, समजुदार आणि प्रेमळ असलेल्या रमाबाईंना मात्र वैवाहिक जीवनात खूप संघर्ष करावा लागला, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. लग्नाच्या काही वर्षांनंतर बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी जेव्हा लंडनला गेले, तेव्हा रमाईला उदरनिर्वाहासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकून मिळेल तेवढ्या पैशात घर चालवून त्या काही पैसे बाबासाहेबांनादेखील पाठवत असत.

  रमाबाईंनी बाबासाहेबांना जशी साथ दिली तशीच साथ बाबासाहेबांनीही रमाबाईंना दिली. बाबासाहेबांच्या आग्रहास्तव रमाबाई लिहायला, वाचायला तर शिकल्याच;  शिवाय बाबासाहेबांच्या सोबतीने त्या सामाजिक कार्यातही सहभाग घेऊ लागल्या. 

  रमाबाईंच्या आयुष्यातील आणखी एक दुःखद घटना म्हणजे त्यांच्या मुलांचा झालेला मृत्यू. हा आघातही रमाबाईंनी पचवला. रमाबाई खूप धार्मिक होत्या. त्यांनी एकदा बाबासाहेबांकडे पंढरपूरला जाण्याचा आग्रह केला, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना तिथे कशाप्रकारे अस्पृश्यांना देवळात जाण्यापासून, देवाचे दर्शन घेण्यापासून रोखले जाते ही हकीकत सांगितली.

  रमाई स्वाभिमानी होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी देऊ केलेली मदत त्यांनी कधी घेतली नाही. आपल्याकडे आहे तेवढ्यातच त्या सर्व गोष्टी भागवत असत. त्यांच्या साध्या राहणीमानावर आजूबाजूच्या बायका हसायच्या, त्यांच्याकडे दागदागिने नाहीत म्हणून त्यांना हिणवायच्या. मात्र बाबासाहेबच आपला खरा दागिना आहेत, असे म्हणून त्या सर्वांचे तोंड गप्प करायच्या. रमाबाईंच्या सोशिक वृत्तीमुळेच बाबासाहेब शिकू शकले आणि घडू शकले. बाबासाहेबांना बॅरिस्टर बनवण्यात रमाबाईंचा मोलाचा वाटा होता. 

   रमाबाईंनी कमी वयात अपार कष्ट केले होते. या कष्टामुळेच की काय, पण त्यांचा आजार बळावला होता. त्यांच्या आजारावर अनेक प्रकारचे उपचार केले, बाबासाहेबांनी अनेक नामांकित डॉक्टरांना दाखविले, तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रमाबाईंच्या आजारपणाच्या काळात बाबासाहेब त्यांच्याजवळच बसून राहत. अखेर २७ मे १९३५ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी रमाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. रमाईंना जाऊन आज एवढी वर्षे झाली तरी देखील केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणून नव्हे तर त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात त्यांना दिलेल्या खंबीर साथीमुळे आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्या आजही समाजासाठी प्रात:स्मरणीय आणि सदैव अनुकरणीय आहेत. 

- ज्योती बागल

No comment

Leave a Response