Primary tabs

लेख ३: पहिला अंतर्ग्रह बुध

share on:

मागच्या लेखामध्ये आपण आपल्या सूर्यमालेच्या मुख्याविषयी म्हणजेच सूर्याविषयी माहिती करून घेतली. आता इथून पुढे आपण सूर्यापासून हळूहळू पुढे जात, सूर्यमालेतील एक एक ग्रहाविषयी जाणून घेणार आहोत. तर प्रस्तुत लेखामध्ये जाणून घेऊयात सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह म्हणजेच ‘बुध’ ह्या ग्रहाविषयी रंजक माहिती.

बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे, तसेच बुध हा सूर्यमालेतील पहिला आंतरग्रह देखील आहे. बुध हा सूर्याभोवती सुमारे ८८ दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात लहान ग्रह देखील आहे. बुध ग्रहाला इंग्रजीमध्ये “Mercury” असे नाव आहे. हे नाव रोमन संदेशवहनाच्या देवतेवरून देण्यात आलेले आहे. बुध त्याच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत सुमारे ८८ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो, परंतु त्याला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यापेक्षा सुमारे दुप्पट कालावधी लागतो. म्हणजेच जर आपण बुधावरती असाल तर आपल्याला बुधावरून २ वर्षांमधून एकदाच सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळेल !

बुध ग्रहाचा पृष्ठभाग हा साधारण चंद्राप्रमाणेच आहे. म्हणजेच बुध ग्रहावर सुद्धा कोणतेही वातावरण नाही आणि तसेच बुध ग्रहावर सुद्धा चंद्रावर अनेक विवरे आहेत. बुध ग्रहावर वातावरण नसल्याने बुध ग्रहावर तापमानाचा वेगळाच खेळ पाहायला मिळतो. बुध ग्रहाचा जो भाग सूर्याच्या बाजूला असतो, त्याचे तापमान हे सुमारे ४५० अंश सेल्सीयस इतके जाते, तर जो भाग सूर्यापासून विरुद्ध बाजूला आहे, म्हणजेच अंधारात आहे त्याचे तापमान हे सुमारे -१७५ अंश सेल्सीयस इतके कमी होते. तर बुधवार उष्णता रोखून धरण्यास कोणतेही वातावरण नसल्याने बुधावर तापमानाचा इतका फरक पाहायला मिळतो.  

मानवाने बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी २ अवकाशयाने बुध ग्रहावर पाठवली होती. एक यान म्हणजे मरिनर-१० जे १९७४-७५ मध्ये बुधाजवळून गेले आणि दुसरे यान म्हणजे २००४ साली पाठवण्यात आलेले मेसेंजर हे यान. मेसेंजर यानाने बुध ग्रहाच्या सुमारे ४००० प्रदक्षिणा केल्या. या काळात या यानाने बुध या ग्रहाच्या बाबतीत अतिशय मोलाची अशी माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली. बुधाचा पृष्ठभाग, त्याची छायाचित्रे, त्यावरील तापमानाचे मोजमाप, इत्यादी विविध निरीक्षणे या यानाने नोंदवली. अखेर या यांमधील इंधन संपुष्टात आल्याने हे यान २०१५ साली बुध ग्रहावर जाऊन कोसळले.   

बुध या ग्रहाची निरीक्षणे ही मानवाने फार प्राचीन काळापासून घेतलेली आढळतात. बॅबिलोनियन संकृतीमध्ये, दगडी पाट्यांवर जी कोरीव निरीक्षणे नोंदवली गेलेली आहेत त्यात या ग्रहाचे उल्लेख प्रथम आढळतात. कदाचित ही निरीक्षणे १४व्या किंवा १५ व्या शतकातील असावीत आणि ही निरीक्षणे कदाचित असिरीयन खगोलशास्त्रज्ञाने नोंदवलेली असण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाची कक्षा ही सूर्याला फारच जवळची असल्याने, पृथ्वीवरून बघताना हा ग्रह सूर्य उगवण्यापूर्वी अथवा सूर्य मावळल्यानंतर क्षितिजापासून जास्तीत जास्त २८ अंशांवर दिसतो. त्या पेक्षा जास्त उंचीवर तो दिसत नसल्याने फार कमी शास्त्रज्ञांनी पूर्वीच्या काळात बुधाच्या नोंदी घेतलेल्या आढळतात. काही प्राचीन नोंदींमध्ये ह्या ग्रहाला उड्या मारणारा ग्रह अथवा संदेशवहन करणारा ग्रह असे सुद्धा म्हटल्याचे आढळते. इसवी सनाच्या सुमारे पहिल्या शतकात या ग्रहाचे नाव ‘नाबू’ असे सुद्धा आढळते. सर्वात प्रथम बुध ग्रहाचे दूरदर्शकाद्वारे निरीक्षण करण्याचा मान हा मात्र १७ व्या शतकाच्या सुमारास गॅलिलिओ यास आहे. बुध ग्रहाची अजून एक गंमत म्हणजे बुध हा अंतर्ग्रह असल्याने तो एका ठराविक वेळी सूर्यबिंबावरून जाताना सुद्धा दिसतो. या खगोलीय घटनेला बुधाचे अधिक्रमण असे म्हणतात. नुकतेच काही वर्षापूर्वी असे बुधाचे अधिक्रमण भारतातून पाहायला मिळाले.

तर मंडळी असा हा बुध ग्रह. बुध ह्या पहिल्या अंतर्ग्रहाविषयी अशा अनेक रंजक गोष्टी आपल्याला सांगता येतील. पण त्या पुन्हा कधीतरी. मला खात्री आहे की आता तुम्ही सुद्धा या ग्रहावर लक्ष ठेवाल आणि जमेल तशी माहिती सुद्धा नक्की मिळवत राहाल. तर भेटूयात पुढील लेखात.   

- अक्षय भिडे

No comment

Leave a Response