Primary tabs

सेवा ही यज्ञकुंड!!

share on:

"कठीण समय येता, संघ कामास येतो" ही उक्ती या देशावरच्या कुठल्याही संकटाच्या वेळी शत् प्रतिशत् खरी ठरते. कुठल्याही आपत्तीच्या वेळी, मदतीला सर्वप्रथम पोहोचणारा हा संघ स्वयंसेवकच असतो. आणि त्यासाठी त्याला वेगळे काही सांगावे लागत नाही. स्वयंसेवकाचा आतला आवाजच त्याला सेवेच्या या यज्ञामध्ये झोकून देण्यासाठी प्रेरणा देत असतो.

या वेळची ही कोविड १९ ची वैश्विक महामारीसुद्धा याला अपवाद कशी ठरेल?? टाळेबंदीच्या सुरुवातीला "अनिकेत" आणि "अन्नपूर्णा" योजनेपासून सुरु झालेला सेवाकार्याचा हा यज्ञकुंड शिधावाटप, भोजन वाटप, रक्तसंकलन, गोसेवा यानंतर आता वेगळ्या प्रकारची समीधा मागत होता.

टाळेबंदीसारखा जालीम उपाय अगदी लवकर राबवून देखील, अगदी छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केलीच. याचे गांभीर्य ओळखून, रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांनी एक मोठे शिवधनुष्य उचलले होते. सर्वात जास्त संक्रमण असलेल्या लाल विभागातील वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी. या महायज्ञात सहभागी व्हायची मनापासून इच्छा होती. परंतु तीन दिवस प्रत्यक्ष काम, त्यानंतर तीन दिवस विलगीकरण, त्यानंतर स्वतःची चाचणी आणि २६ तासांनंतर येणारा चाचणीचा निकाल, असा एकंदर ८-९ दिवसांचा सगळा कार्यक्रम असल्याने, घरची जबाबदारी एकदम झटकून देऊन यामध्ये सहभागी व्हायला मन धजावत नव्हते.

रोज ऐकायला, वाचायला मिळणाऱ्या सहभागी स्वयंसेवकांच्या अनुभवांमुळे तर या यज्ञामध्ये आपल्याही सेवेची एक समीधा पडायला पाहिजे असे मनापासून वाटत होते. माझ्या मनातली अस्वस्थता भक्तीला दिसत होती आणि समजतही होती. येणारे सर्वांचे अनुभव मी तिलाही सांगत होतो. त्यामुळेच एक दिवस सकाळी अचानक तिने, "जा तू पण या मोहिमेमध्ये" असे म्हणत एक बाॅम्बच टाकला. तिच्याशी आणि मुलांशी बोलून अक्षरशः एका तासात मी या यज्ञामध्ये हातभार लावायला घराबाहेर पडलो.

काय योगायोग होता माहिती नाही, पण बारा वाजता या सगळ्या मोहिमेची छावणी असलेल्या गरवारे महाविद्यालयात पोहोचलो आणि दुपारी २ वाजता प्रत्यक्ष मोहिमेमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळाली. सैन्याचा गणवेश मिळावा म्हणून लोक कसे जीवाचे रान करत असतात आणि एकदा तो गणवेश मिळाला की अभिमानाने कसा ऊर भरून येतो, अगदी तशीच भावना ते पीपीई कीट पहिल्यांदा घालताना माझी झाली होती. एवढ्या मोठ्या वैश्विक युद्धाच्या प्रसंगी, आपल्याला त्यात खारीचा वाटा तरी उचलता येतोय ही भावनाच काहीतरी वेगळी होती.

तीन दिवस तीन वेगवेगळ्या सेवा वस्त्यांमध्ये काम करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळाली. पण तिन्ही ठिकाणी आलेले अनुभव मात्र प्रचंड अस्वस्थ करणारे होते. नुसत्याच बोलल्या आणि ऐकल्या जाणाऱ्या "भारत आणि इंडिया" यांच्यामधले वास्तव आपण विचार करतो त्यापेक्षाही किती भीषण आहे, हे प्रत्यक्ष अनुभवणे आणि पचवणे फारच अवघड आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही आपल्याच असलेल्या बांधवांची अवस्था पाहून कुठलाही सहृदय माणूस अंतर्बाह्य हालल्याशिवाय राहणार नाही.

आत जाण्यासाठी जास्तीत जास्त तीन चार फुटाचा रस्ता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन तीन फुटांचे बरेचसे उपरस्ते. आणि त्या उपरस्त्यांवर अगदी दाटीवाटीने म्हणजे एकाला एक लागून असलेली घरे. त्यांना घरे तरी कसे म्हणायचे? जास्तीत जास्त १० X १० ची एक खोली, त्यामध्येच वर पोटमाळा, काही काही ठिकाणी तर दोन दोन पोटमाळे आणि या अवस्थेत घरात राहणारी माणसे कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५-१६.

घराबाहेरच बांधलेल्या शेळ्या - मेंढ्या, कुत्री मांजरी या सगळ्यांबरोबर आपले हे बांधव कसे राहत असतील याचा विचारच सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. करोनाच्या या लढाईमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या "सुरक्षित अंतर ठेवा" या नियमाचे पालन इथे कसे होऊ शकणार?? घराबाहेर पडू नका हे आपल्याला म्हणणे शक्य आहे. पण त्या एवढ्या छोट्या जागेत एकमेकांची तोडं बघत दिवसभर बसणं शक्य तरी आहे का?? केवळ आणि केवळ यामुळेच अत्यंत दाटीवाटीमध्ये असलेल्या आणि दुर्दैवाने संक्रमण पोहोचलेल्या या वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी, तपासणी करणे अत्यंत गरजेचे होते.

एकूण चार किंवा पाच जणांची टीम वस्तीतील एकाएका गल्लीमध्ये जायची. एक डाॅक्टर, एक प्रत्येक कुटुंबाची नोंद घेणारा, एक गोळ्या आणि मास्क वाटणारा आणि एक किंवा दोन स्थानिक कार्यकर्ते अशा या टीम होत्या. आपल्या परिस्थितीचा काहीही विचार न करता, तिथे राहणारी सगळी लोकं त्या प्रत्येक टीमला अगदी मनापासून साथ देत होती. सहभागी टीममध्ये फक्त एकच डाॅक्टर असला, तरी प्रत्येकाने घातलेल्या त्या पीपीई कीटमुळे, नागरिकांसाठी आम्ही सगळे डाॅक्टरच होतो आणि या एवढ्या अडचणीच्या काळात हे सगळे आपल्याला तपासायला अगदी दारात आले आहेत याचे प्रचंड अप्रूप आणि कौतुक त्या प्रत्येकाला होते.

अगदी दारात जाऊन चाललेल्या या मोहिमेमुळे, खरच खूप फायदा झालेला आहे. लोक आपणहून आपल्याला होणारा त्रास सांगत होते किंवा डाॅक्टरांना त्या व्यक्तीच्या एकंदर देहबोलीवरून काही संशयित रुग्ण सापडत होते. त्यांची माहिती लगेचच सरकारी अधिकाऱ्यांना पाठवली जायची आणि सरकारी पातळीवर त्याची अजून छाननी होऊन, त्यांच्या पुढच्या चाचण्या आणि इतरही तपासण्या मार्गी लागत होत्या. संक्रमणाची दुष्ट साखळी तोडून, करोना मुक्तीच्या दृष्टीने या मोहिमेमुळे निश्चितच एक पाऊल पुढे पडलेले आहे.

पुणे मनपा आणि रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जात असलेल्या या मोहिमेमध्ये संघ स्वयंसेवकांबरोबरच अनेक महाविद्यालयीन तरुण तरुणी, मोठमोठे व्यावसायिक, प्रतिष्ठित डाॅक्टर, प्रतिथयश कलावंत सहभागी झाले होते. स्त्रीशक्तीचाही मोठा सहभाग या मोहिमेमध्ये होता. अनेक महिला डाॅक्टर यातील वेगवेगळ्या टीमचे नेतृत्व करत होत्या. अनेक स्वयंसेवकांच्या आई, बहिणी यामध्ये सहभागी झाल्या होत्या . अक्षरशः भुलभुलैय्या असणाऱ्या या वस्त्यांमध्ये तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय काम करायचा विचारच कुणी करू शकत नाही. या सगळ्या कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला मिळाला आहे.

या सर्वांबरोबरच, सहभागी प्रत्येकाच्या घरच्यांचा पाठिंबा हा या सगळ्या कामामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कुठलाही स्वयंसेवक हे काम स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करू शकला नसता. त्या सर्व अज्ञात हातांना माझा मनापासून प्रणाम.

ही मोहीम यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट योजनेची आवश्यकता होती. आपल्या पूर्वानुभवांमुळे संघाने याहीवेळी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने गरवारे महाविद्यालयात याचे व्यवस्थापन केले होते. येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची नोंदणी, आल्यावर त्यांची केलेली वैद्यकीय तपासणी, तिथल्याच वसतीगृहात राहण्यासाठी केलेली अप्रतिम अशी सोय (सर्वेक्षण करणारे आणि विलगीकरणात असलेले यांची सोय वेगवेगळ्या इमारतीत केलेली होती) , सहभागी स्वयंसेवकांची दिनचर्या, सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणानंतर दिल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक काढ्यापर्यंतच्या सगळ्या व्यवस्थापनात संघाचा तो एक विशिष्ट स्पर्श नवीन लोकांना तर प्रचंड भावत होता.

लहानपणापासूनच एक संघ स्वयंसेवक असल्याने, या सगळ्या अनुभवा दरम्यान एका पद्याच्या ओळी सारख्या सारख्या डोळ्यासमोर येत होत्या.

आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे I

उजळूनि आज दावू भवितव्य मातृभूचे II

या मोहिमेमध्ये सहभागी प्रत्येकाची भावना ही जंगलातील वणवा आपल्या चोचीतल्या पाण्याच्या थेंबांनी विझवायचा प्रयत्न करणाऱ्या त्या चिमणीसारखी होती. आमच्या या छोट्याशा सहभागाने, करोनाविरुद्धची लढाई पूर्णपणे नक्कीच जिंकता येणार नाही, पण जेव्हा जेव्हा करोनाच्या लढाईचा इतिहास लिहिला जाईल, त्या त्या वेळी सहभागी सर्व स्वयंसेवकांचे नाव हे अभिमानाने "करोना योद्धा" म्हणून घेतले जाईल आणि हा सहभागी सर्वांसाठीच अगदी अभिमानाचा क्षण असेल.

सेवा ही यज्ञकुंड, समिधासम हम जले,

ध्येय महासागर में, सरितरुप हम मिले II

- हृषीकेश कापरे

वारजेनगर महाविद्यालयीन प्रमुख

९६५७००३५७१

त. टी. - या सगळ्या मोहिमेची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष मोहीम चालू असतानाची सगळी व्यवस्था याचा लेखाजोखा पुढील लेखात.

शिलेदार

No comment

Leave a Response