Primary tabs

सेवा है यज्ञकुंड (भाग ४)

share on:

राष्ट्रभक्ति ले हृदय मे हो खडा यदि देश सारा

संकटो पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ॥

पद्याच्या या ओळी, करोनाच्या या वैश्विक महामारीमध्ये अतिशय समर्पक अशा आहेत. करोनाच्या भयामुळे घराच्या बाहेर पडणे मुश्किल असताना, रा. स्व. संघ- जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या गेलेल्या रेड झोन स्क्रिनिंग मोहिमेला समाजातील सर्व स्तरांतून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

 

कुठल्याही संकटाच्या प्रसंगी, सहभागी कुणाचेही मनोबल हे अत्यंत उंचावलेले असणे अतिशय गरजेचे असते. समोरचा शत्रू अतिशय प्रबळ आणि साधनसामग्रीने संपन्न असेल आणि आपल्याकडे त्याचीच कमतरता असेल, तरी फक्त मानसिक बळाच्या जोरावर अशी अस्मानी संकटे परतवून लावल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आपल्याला सापडतील. शिवरायांचा गनिमी कावा हे याचेच उत्तम उदाहरण होते. बाजीप्रभू देशपांडे, कोंडाजी फर्जंद किंवा हवालदार ईशरसिंग यांनी अतिशय कमी मनुष्यबळाच्या जोरावर अफाट अशा शत्रूला जेरीस आणल्याचे आपण पाहिले आहे.

करोनाविरुद्धच्या लढाईला सुद्धा, अशाच व्यस्त प्रमाणात आपल्याला सामोरे जायचे होते. रेड झोन आणि त्यातील हॉट स्पॉट्सची संख्या विचारात घेता सहभागी कार्यकर्त्यांचा आकडा हा तसा व्यस्तच होता. प्रत्येक वस्तीतील सहभागी स्थानिक कार्यकर्ते विचारात घेतले तरी, हे प्रमाण कमीच होते. त्यामुळे सहभागी स्वयंसेवकांचे मनोबल उंचावणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम होते.

 

गरवारे कॉलेजमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जात होती हे आपण पाहिलेच. त्याचबरोबर, अजूनही बरेचसे वेगवेगळे मार्ग हे सहभागी स्वयंसेवकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी अवलंबले जात होते. याचाच एक भाग म्हणून, कुणीही नवीन कार्यकर्ता या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी गरवारेमध्ये दाखल झाला की त्याचे स्वागत हे टाळ्यांच्या गजरात व्हायचे. त्याचबरोबर पहिले तीन दिवस जेव्हा सहभागी कार्यकर्त्यांची टीम प्रत्यक्ष तपासणीसाठी जायची किंवा ते काम संपवून परत यायची, तेव्हाही टाळ्यांच्या गजरात आणि विविध घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले जायचे.

सहभागी प्रत्येकासाठीच हा फार मोठा अभिमानाचा क्षण असायचा. अंगावर अक्षरशः शहारा यायचा आणि ऊर अभिमानाने भरून यायचा. आपण केलेल्या किंवा करत असलेल्या कामाचे हे असे कौतुक, प्रत्येकालाच एकदम आनंद देऊन जायचे. खरंच आपण काहीतरी खूप चांगले काम करतोय, ही जाणीवही त्यानिमित्ताने मनाला उभारी देऊन जायची. त्याचवेळी समाजमाध्यमांवरही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक डॉक्टर, परिचारिकांचे अशाप्रकारेच स्वागत होणाऱ्या अनेक चित्रफिती प्रसारित होत होत्या. आपलाही त्याचप्रकारे झालेला, होत असलेला सन्मान पाहून, सहभागी प्रत्येकाच्या अंगात दहा हत्तींचे बळ येत होते.

 

जे स्वागत, कौतुक सहभागी होताना किंवा तपासणीला जाता येताना होत होते, अगदी तसेच कौतुक हे स्वॅब टेस्टचा निकाल निगेटिव्ह आल्यावर, गरवारे सोडताना व्हायचे. संध्याकाळी सात नंतरच शक्यतो निकाल यायचे आणि कितीही नाही म्हटले तरी मनावर दोन दिवसांपासून असलेला ताण एकदम हलका व्हायचा. त्या आनंदाबरोबरच, बाहेर पडताना होत असलेल्या या कौतुकाने बऱ्याच लोकांच्या डोळ्यात चक्क पाणी यायचे. कौतुकाचा हा सोहळा नजरेत साठवूनच सगळे जण गरवारेचा निरोप घ्यायचे.

 

कौतुकाचा असाच सोहळा बऱ्याच करोना योद्ध्यांनी

घरी पोहोचल्यावरही अनुभवला. कार्यकर्ता राहत असलेल्या सोसायटीतील इतर सदस्यांनी, आपल्यातीलच कुणीतरी या एवढ्या संकटाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मोहिमेत सामील झाला म्हणून औक्षण करून, पुष्पवृष्टी करून या स्वयंसेवकांचे स्वागत केले. समाजातील सज्जनशक्तीचे हे फार विलक्षण दर्शन होते. करोनामुळे बदललेल्या सामाजिक जाणिवांचेच हे दर्शन होते. अपवादानेच एकदोघांना परतल्यावर बाकीच्यांच्या रोषाचा सामना करावा लागला, पण सद्यस्थितीत तो काही अंशी खराही होता.

सोसायटीबरोबरच, स्वतःच्या घरातही प्रत्येक कार्यकर्त्याचे अगदी मनापासून स्वागत झाले. आपला मुलगा, आपला पती, आपले आई/बाबा, आपला दादा/ ताई या एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात समाजासाठी, देशासाठी काहीतरी करून आला, ही भावना घरातल्या सगळ्यांसाठीही अभिमानास्पदच होती. खरेतर मोहिमेमध्ये सहभागी असताना होत असलेले कौतुक हे केवळ त्या कार्यकर्त्याचे नव्हते तर ते त्याला पाठिंबा देणाऱ्या त्याच्या घरातील प्रत्येकाचेच होते. त्यामुळे घरात झालेल्या या भावस्पर्शी स्वागतानेही बऱ्याच जणांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

खरेतर प्रत्येकालाच या काळात काहीतरी करायची मनापासून इच्छा होती, पण करोनाची दहशतच अशी होती की बराचसा वर्ग हा असे काहीतरी होऊ शकते, कुणी अशाप्रकारे काम करू शकतो याचा विचारच करू शकत नव्हता. त्यामुळे सहभागी स्वयंसेवकांच्या साहसाला हा एकप्रकारे केलेला प्रणामच होता. या कौतुकामध्येच अजूनही एक गोष्ट लपलेली होती. "अरे, हा जर या परिस्थितीत सगळी काळजी घेऊन अगदी रेड झोनमध्ये जाऊन काम करू शकतो, तर आवश्यक ती काळजी घेऊन मी माझीही दैनंदिन कामे नक्कीच करु शकतो" हा आत्मविश्वास बाकी सगळ्या लोकांना यानिमित्ताने मिळत होता.

आपल्याला आता अजून काही काळ तरी करोनाला सोबत घेऊन जगायचेच आहे. त्यावेळी या मोहिमेमध्ये सहभागी असलेले कार्यकर्ते हे निश्चितच बाकी सगळ्यांसाठी दिशादर्शक असतील यामध्ये कुठलाही संदेह नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनात ही चेतना पेटवण्याचे मोठे काम यानिमित्ताने झाले आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य माणसांच्या मनात वाढलेल्या आत्मविश्वासामध्येही या मोहिमेचे यश सामावलेले आहे.

 

हृषीकेश कापरे

 

No comment

Leave a Response