Primary tabs

लेख ४: तेजस्वी शुक्र

share on:

लेख ४: तेजस्वी शुक्र

नमस्कार मंडळी, आत्तापर्यंत आपण आपल्या आकाशातील गमतीजमती ह्या लेखमालेत चंद्र, सूर्य आणि बुध या तीन अवकाशीय गोलांविषयी बऱ्याच गमती-जमती पाहिल्या. आता आपण वळणार आहोत सूर्यापासून असणाऱ्या द्वितीय ग्रहाकडे, म्हणजेच शुक्र.
शुक्र ह्या ग्रहाचे वर्णन आपण तेजस्वी तारा, शुक्राची चांदणी अशा प्रकारची अनेक विशेषणे लावून केलेले वाचले अथवा ऐकले असेलच. परंतु मित्रहो, शुक्र हा तारा नसून तो आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असणारा एक ग्रह आहे. मात्र आकाशात जर त्याचे आपण निरीक्षण केले तर वर्षाच्या काही दिवस तो सूर्य मावळल्यावर तर वर्षाच्या उर्वरित काळात तो सुर्योदयापूर्वी दिसतो. आपण जर कधी शुक्र अशा प्रकारे आकाशात पाहिला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की शुक्र हा आकाशात ठळक आणि अतिशय तेजस्वी असा दिसतो. त्यामुळेच या शुक्र ग्रहाचे वर्णन हे शुक्राची चांदणी असे केलेले असू शकेल.
शुक्र या ग्रहाचे इंग्रजी नाव हे ‘Venus’ असे आहे. हे नाव रोमन संस्कृतीमधील सौंदर्य आणि प्रेमाच्या देवतेवरून देण्यात आलेले आहे. शुक्र हा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा ही २२४ पृथ्वी दिवसांमध्ये पूर्ण करतो, तर तो स्वतःभोवती एक प्रदक्षिणा ही २४३ दिवसांमध्ये पूर्ण करतो. आपल्या सूर्यमालेमध्ये शुक्र ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास सर्वात जास्त म्हणजेच २४३ दिवस लागतात. आता शुक्रासंबंधी एक गंमत सांगायची झाली तर ती अशी की शुक्र हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा दिशेने एक प्रदक्षिणा पूर्ण करतो त्यामुळे गंमत अशी होते की जर आपण शुक्राच्या भूमीवर उभे राहिलो तर आपल्याला सूर्य हा पश्चिमेकडून उगवून पूर्वेला मावळताना दिसेल. बुध या ग्रहाप्रमाणेच शुक्राला सुद्धा स्वतःचा असा एकही उपग्रह नाही.
शुक्र ग्रहाला कधी कधी पृथ्वीचा भाऊ असे सुद्धा संबोधले जाते, कारण आपली पृथ्वी आणि शुक्र यांचे आकारमान जवळपास सारखेच आहे. शुक्राचे वातावरण सुद्धा अतिशय घन असे असून हे वातावरण सुमारे ९६ टक्के इतके कार्बन डायऑक्साईडपासून तयार झालेले आहे. तसेच शुक्राचे वातावरण हे सल्फ्युरिक आम्लापासून बनलेले आहे. त्यामुळे शुक्र सूर्यापासून दुसरा ग्रह असून देखील त्याचे तापमान हे बुध ग्रहापेक्षा जास्त म्हणजेच सुमारे ७०० अंश सेन्टीग्रेड इतके जास्त आहे.
शुक्र हा कदाचित पहिलाच ग्रह असेल ज्याच्या आकाशातील गतींचा अभ्यास करून त्याची निरीक्षणे सुमारे दुसऱ्या शतकाच्या सुमारास मांडली गेली. शुक्र हा पृथ्वी वगळता सूर्यमालेतील पहिला असा ग्रह आहे की ज्याचे निरीक्षण करण्यासाठी अवकाशयान पाठवले गेले. या अवकाशयानाचे नाव मरिनर-२ असे होते. हे १९६२ मध्ये शुक्र ग्रहाच्या भोवती कक्षेत फिरले आणि त्याने शुक्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी निरीक्षणे नोंदवली. व्हेनेरा-७ हे असे प्रथम यान आहे जे शुक्राच्या पृष्ठाभागावर १९७० साली यशस्वी रीतीने उतरले आणि त्याने शुक्र या ग्रहाच्या पृष्ठभागाची काही प्रकाशचित्र सुद्धा पृथ्वीवर पाठवली. ती शुक्राची आजपर्यंत मानवाकडे असणारी एकमेव प्रकाशचित्रे आहेत. कारण त्यानंतर शुक्राच्या भोवती अथवा जवळून अनेक याने पाठवण्यात आली, परंतु शुक्राच्या दाट वातावरणामुळे त्याच्या पृष्ठभागाची निरीक्षणे नोंदवणे त्यांना शक्य झाले नाही. येत्या कालखंडात भारताची अवकाश संस्था इस्रो ही अशाच एका यानाची बांधणी करणार आहे जे कदाचित शुक्रावर उतरेल आणि त्याची प्रकाशचित्रे सुद्धा आपल्यापर्यंत पाठवेल.
नुकत्याच २०२० साली झालेल्या अभ्यासानुसार शुक्र ग्रहावर जिवंत ज्वालामुखी असल्याची महत्त्वाची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे. शुक्राबद्दल आणखी दोन गमती सांगायच्या म्हणजे जसे आपण मागील लेखात पाहिले त्याचप्रमाणे शुक्र ग्रहसुद्धा सूर्य बिंबावरून जाताना दिसतो आणि अशी खगोलीय घटना अतिशय क्वचित घडते काही शतकांच्या फरकाने. तसेच दुसरी गंमत सांगायची म्हणजे शुक्र ग्रहाच्या सुद्धा चंद्राप्रमाणे कला दिसतात. म्हणजे जशी आपणास चंद्राची कोर दिसते, तर कधी अर्धा चंद्र आणि कधी पौर्णिमेला पूर्ण चंद्र, त्याचप्रमाणे जरा मोठ्या द्विनेत्रीमधून अथवा दूरदर्शकातून शुक्राच्या कला तुम्ही पाहू शकाल.
तर मंडळी या लेखात आपण पहिल्या शुक्र या सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाच्या ग्रहाविषयीच्या गमतीजमती, आता पुढच्या लेखात पाहू या अशाच एका खगोलीय गोष्टीविषयी रंजक माहिती. 

- अक्षय भिडे 
८०८७६९०३६५

लेखक: 

No comment

Leave a Response